Saturday 22 June 2013

पुरातही मी कोरडा !!

भीती पुराची वाटत नाही 
पूर ओसरायची वाटते 
पोरं उराशी कवटाळून 
मेलेल्या प्रेतांना बघायची वाटते !! 

धडधड काळे आकाश बघून वाढत नाही 
आकाशात घिरट्या घालणाऱ्या हेलीकॉपटरला बघून वाढते 
पुराचेही जन्मभर पुरेल असे राजकारण करणाऱ्या 
राजकारण्यांना बघून वाढते !!

राग ढिम्म शासनाचा येत नाही 
तर मिडियाचा येतो 
माणूस मेल्याचीही बातमी करणाऱ्या 
' आप को कैसा लग रहा है ? ' प्रश्नाचा येतो !! 

लाज अंगावरच्या फाटक्या कपड्याची नाही 
तर शासनाकडून मिळणाऱ्या २ -४ लाखाची वाटते 
पै पै जोडून उभारलेला संसार आणि संसाराला अर्थ देणारी माणसे 
२ - ४ लाखात विकत मिळतील का ? या विचाराची वाटते !! 

किळस कुजलेल्या बेवारस प्रेतांची येत नाही 
तर सर्वस्व गमावलेल्या जिवंत प्रेतांना लुटणाऱ्याची येते 
प्रत्यक्ष देवाच्या भूमीत स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्या 
चांडाळांची आणि षंढपणे बघत बसणाऱ्या लोकांची येते !! 

हेवा सुखरूप वाचलेल्या लोकांचा वाटत नाही 
तर दोन घास पोटात ढकलणाऱ्याचा वाटतो 
आता अन्नाच्या दाण्यासाठी भिक मागणाऱ्या 
माझ्या हाताच्या भूतकाळाचा वाटतो !! 

प्रेम जगण्यावर  नाही तर आयुष्यावर आहे 
अनेकदा जगणे सोडूनही आयुष्य वाढवणाऱ्या 
दैवावर आणि माझ्या कर्मावर आहे 
कदाचित माझी वाट पाहणाऱ्या अप्तांवर आहे !! 
पाण्याचा पूर ओसरल्यावर 
एक सहानुभूतीची लाट येईल 
पाण्यात एकरूप झालेले अश्रू 
पुन्हा डोळ्यात येतील 
एक दिवस ती लाट पण सरेल 
कसे जगला यापेक्षा का जगला ? 
असा प्रश्न ती मला विचारेल !!

काळजी या प्रश्नाची नाही 
तर उत्तरातून निर्माण होणाऱ्या प्रश्नाची आहे 
'तुमच्याच कल्याणासाठी गेलो होतो ' असे म्हटल्यावर 
नातलगांच्या चेहेऱ्यावर उमटणाऱ्या भावनांची आहे !! 

भीती ,धडधड ,राग ,किळस ,हेवा , प्रेम 
या भावनांवरच तर आयुष्य चालते 
माणसात आणि नात्यात ओलावा आणायचे काम 
याच तर भावनांचे असते !! 

 पाण्यातून  सुरु झालेला प्रवास 
 पाण्यात येउन संपतो 
त्या पाण्याची काय भीती अन पुराचे काय दुक्ख 
भीती  तर आयुष्यात नसलेल्या ओलाव्याची  आहे 
दुक्ख तर मरणाची बातमी ऐकुनही कोरड्या राहिलेल्या 
पापण्यांचे आहे . . . !! 


अंकुर  देशपांडे 

No comments:

Post a Comment