Friday 15 June 2012

"ती" ....




आज वातावरण थोडेसे ढगाळच होते ....पाऊस येणार असे वाटत होते कारण सोसाट्याचा वारा सोबत काही वाळलेली पाने घेऊन पिंगा घालत होता ,मधूनच थोडेसे अंधारून येत होते काही क्षणातच त्या काळ्याकुट्ट ढगांच्या आड लपलेला सुर्यनारायण आपले अस्तित्व दाखवत होता ... मधूनच एखादा म्हातारा डोक्यावर मुडपलेला पंजा ठेऊन पावसाचा अंदाज घेत होता ...झाले असतील संध्याकाळचे ५-६ ...अचानक अंधारून आल्याने सूर्यास आपले अस्तित्व लपवावे कागले , विजांच्या कडकडाटाने म्हाताऱ्याने मुडपलेला पंजा कानावर ठेवला ...वाराही आता पानांची संग सोडून कधी मोगऱ्याच्या तर कधी जुईच्या झाडाशी सलगी करू लागला ...झाडही हरखून आनंदाने डोलू लागले आणि संगतीची आठवण म्हणून कि काय आपल्या फुलांचा मंद सुवास वाऱ्यास भेट देऊ लागले ...आणखी एक जोरात वीज कडाडली आणि ढगातून काही थेंब जमिनीवर कोसळू लागले ...तप्त झालेल्या मातीवर पावसाचे थेंब पडल्यावर येणारा टीप टीप आवाज ...मातकट गंध सोबतीस मोगऱ्याचा सुगंध ...झाडाशी -पानाशी खेळून मातीत मिसळायला आतुर झालेले अवखळ पाण्याचे थेंब ...कुठल्याश्या झाडाच्या आश्रयाला आलेलेली गाय  आणि धावपळ करणारी माणसे अश्या धुंध वातावरणात तो शांतपणे आपल्या घराच्या ग्यालारी मध्ये बसून कॉफी च्या घुटक्याचा आस्वाद घेत निसर्गसौन्दर्य पाहत होता ...वातावरणास साजेशी गाणी आई.पॉड वर सुरूच होती ...आणि अचानक ते गाणे लागले ...भरत आलेल्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या ...त्या दिवशीचा पाऊस पुन्हा आठवू लागला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ...."ती ".....
                                 त्याच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करणारी ती .... लहानसर पण रेखीव ... शब्दांपेक्षा डोळ्यानेच जास्ती बोलणारी ..एकदा बोलायला लागली कि थांबूच  नये अशी मधाळ वाणी असलेली ...गालावर खळी असलेली आणि त्याचा पुरेपूर वापर करून त्याला सुखावणारी ...खांद्यावर डोके ठेवायची तेव्हा त्याच्या चेहेऱ्याशी सलगी करणारे तिचे किंचित सोनेरी केस  ...एक सुंदर परी ...आणि .... इतका काळ लोटूनही तिच्याबद्दल इतके लक्षात आहे पाहून त्याचे त्यालाच हसू आले ...आणि पुन्हा एकदा भूतकाळाचा प्रवास सुरु झाला ....इंटरनेट वरून प्रेम जुळते असे फ़क़्त पेपर मध्ये /मित्रांकडून ऐकले होते आणि या प्रकारची भयंकर टर उडवली होती पण आपल्या नशिबी हेच आहे याची जाणीव त्यावेळी न्हवती ...एक दिवस  कोणत्या तरी साईट  वर बोलणे होते काय नंबर घेतो काय आणि एक दोन भेटीत प्रेम जमते काय ...सारेच स्वप्नवत आणि अविश्वसनीय ...हळू हळू प्रेम फुलत होते बहरत होते ...छोट्या मोठ्या भांडणातून दोघांना एकमेकांच्या आणखी जवळ आणत होते..... पहिले "प्रेमपत्र " लिहायचा खटाटोप तर वर्णनीय होता ...शाळेत सगळी पत्रे लिहायला शिकवली पण हे "गरजेचे " पत्र लिहायला का शिकवले नाही म्हणून आलेला राग तर मजेशीर होता ...तिच्यापेक्षा माझे पत्र सरस कसे असेल यासाठी जंग जंग पछाडली जात होती पण सुरवात मात्र होत न्हवती ...कारण त्यासाठी कागद गुलाबी वापरायचा कि वहीचे मधले पान कधी न्हवे ते "सत्कारणी " लावायचे यावर बुद्धी आणि मन यांचे एकमत होत न्हवते आणि सुरुवात माझ्या रसिक प्रेम पाखरा म्हणून करायची कि शेवट तीन बदाम तीन फुल्या यांनी करायचा हे काही ठरत न्हवते ...अखेर लिहून झाले ...ते वाचत असताना तिच्या चेहेऱ्यावरील भाव पाहून जन्माचे सार्थक झाले असे क्षणभर वाटून गेले ...वाऱ्याने चांगला जोर पकडला होता ..पावसाचे काही थेंब अंगावर येऊ लागले होते ...तंद्री भंग पावली ...खुर्ची थोडी आत घेताना मनात पुन्हा विचार आला ...रोज जवळपास १०-१२ वेळी वाचले जात असलेले आणि ओळ न ओळ पाठ झालेले ते पत्र आता कोठे असेल ?? काही पैशाच्या काडीने भस्मसात केले असेल कि अनावश्यक वस्तूंच्या हक्काच्या घरात (कचरा कुंडी ) विसावले असेल का अजूनही असेल कोठेतरी आत ...कोणाला दिसू नये अशा जागी लपवून ठेवलेले ... फ़क़्त ती जाणे.... अनेक पत्र अनेक ग्रीटिंग अगदी एकत्र खाल्लेल्या कॅडबरी च्या चांदी (wrapper ) पासून ते दिलेल्या असंख्य गुलाबंपर्यंत सर्व गोष्टींच्या साठ्याचे आता काय झाले असेल फ़क़्त ती जाणे .....
                                   सोनेरी होते ते दिवस ...एकमेकांची काळजी -प्रेम -ओढ यात गुरफटलेले ... भांडणांनी बरबटलेले आणि एकत्र पाहिलेल्या स्वप्नांनी भारलेले... तो आणि ती ....बाकी सारे शून्य ...घेतलेल्या आणाभाका ,पाहिलेली स्वप्ने ,फोन वर घालवलेले शेकडो तास एकमेकांना पाठवलेले हजारो एस.एम.एस. आणि चाटिंग हे कमी पडले का असा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा थैमान घालू लागला ..... कडाडणाऱ्या विजांचा परिणाम म्हणून कि काय मनामध्ये अनेक विचार एकमेकांशी युद्ध करू लागले ...हजारदा मांडूनही न सुटलेले आणि नक्की कोठे चुकले हे न उमगलेले गणित मन पुन्हा मांडू लागले ...नाही ....ते गणित आता मांडून चालणार न्हवते ...म्हणून शांतपणे त्याने डोके भिंतीवर टेकवले ....उगाचच  कोणालातरी ४-५ एस .एम .एस करून लक्ष वळवायचा प्रयत्न केला पण आज तिचा दिवस होता ...कोसळणाऱ्या पावसाकडे पाहून त्याला तो दिवस आठवला ....कुठल्याश्या हॉटेलातील ९ व्या मजल्यावर तिने सांगितलेला निर्णय ...भर पावसात झालेली वादावादी ...आणि रागाने केलेला घात .... पुन्हा जखमावरची खपली काढली जात होती ...खूप प्रयत्न करूनही यातून बाहेर पडता येत न्हवते ..अनेक महिने दाबून ठेवलेले दुक्ख आज बाहेर येत होते ...नकळत त्याचा हात खिशाकडे गेला ...पाकिटातून तिचा फोटो काढून तिच्याशी तो बोलता झाला ....अनेक मिनिटे ... पण  सजीव असूनही ती जशी अबोल झाली हा तर निर्जीव फोटो होता ....काय बोलणार ? नेहमी हवे हवे वाटणारे हास्य आज त्याला नकोसे वाटत होते .... त्या दिवसानंतर त्याची झालेली हालत,भिजवलेल्या अनेक उश्या ,आठवणीत वाया घालवलेले अनेक दिवस-महिने ,तिच्यासाठी केलेले अनेक नवस ,एकदा तरी दिसुदेत म्हणून घातलेले असंख्य खेटे ,एकदातरी भेट म्हणून केलेल्या अगणित विनवण्या ,वाढदिनी तिच्या एका मेसेज साठी पाहिलेली वाट आणि व्हेलेनटाइन डे ती कोणसोबत साजरा करत असेल म्हणून तळमळत काढलेला दिवस ....असंख्य आठवणी ...असे कधीतरी तिला वाटले असेल का ?? तिलाच माहित ....
                                   पाऊस आता थोडासा ओसरला होता ......ढगाळ वातावरण जाऊन हळू हळू सूर्यकिरणे जमिनीवर पडत होती ....वार्याचाही वेग आता कमी झाला होता ....पण मनात विचारांचे थैमान अजूनही चालूच होते ...इतकी वर्षे एकत्र घालवलेले क्षण ,एकमेकांच्या सहवासाची झालेली सवय ,गुंतलेले मन आणि अडकलेल्या भावना कशा सोडवायच्या याचे उत्तर अजून सापडत न्हवते ...भेटायला यायला उशीर झाला कि जशी तिची नजर सैर भैर त्याला शोधात असायची तशीच आजही माणसांच्या गर्दीत त्याला शोधत असेल का याचे उत्तर सापडत न्हवते ..अजूनही ती तितकीच मोहक दिसते का ? अजूनही तिच्या आवडी निवडी-सवई त्याच आहेत का ?अजूनही ती तशीच निरागस ,अवखळ आणि लाघवी आहे का ? असे प्रश्न त्याला  भंडावून सोडत होते ...कितीही प्रयत्न केला तरी तिचा चेहेरा डोळ्यासमोरून हलत नवता ...ती चुकली असेल पण आपण सामोपचाराने का घेतले नाही हि खंत मनास पुन्हा छिद्रे पाडत होती ..ती पुन्हा कधीतरी येऊन बघ आता समजली न माझी किंमत म्हणून मिठी मारेल हा कुचकामी आशावाद त्याला छळत होता ...अखेर कणखरपणाचे उसने कवच गळून पडले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले ...गाल अनुष्ण झाले तोंड खारट झाले आणि तेवढ्यात खांद्यावर परिचित माउली  स्पर्श झाला .... भावनावेग अनावर झाला ....आणि तो कुशीत झेपावला ...आता तर पाऊस सुरु झाला होता ...अजून एक पदर भिजायचा बाकी होता ....


तो कोण होता ?? तिला ठाऊक.....ती कोण आहे ? त्याला ठाऊक .....कोठेतरी वास्तव जीवन जगत असलेली दोनीही पात्रे आपल्याला मात्र काल्पनिकच ....अगदी परीकथेतील पात्रा सारखी ...आपलीच वाटणारी पण काल्पनिक असणारी .... अशा अनेक ती /तो यांना समर्पित ..

No comments:

Post a Comment