Sunday 17 June 2012

बाप ....

शाळेपासून बापाच्या धाकात तो राहात असतो 
कमी मार्क पडलेलं प्रगतीपुस्तक तो लपवत असतो 
आईच्या पाठी लपून बापाशी तो बोलत असतो 
बापाचा डोळा चुकवून हुंदडायला तो जात असतो 

शाळा संपते पाटी फुटते नवे जग मग समोर येत 
कोलेज नावाच्या भूल भूलैयात मन हरखून जात असत 
हाती आलेले मार्क घेऊन पायऱ्या झीझवत फिरत असत 
बाप पाहतो स्वप्न नवी हे मुखडा शोधत असत 

सुरु होत कोलेज नव दिवस भुरकन उडून जातात 
एटीकेटी च्या चक्रातून वर्ष पुढे सरत जातात 
ग्रौप जातो दोस्ती होते मारामाऱ्या दणाणतात 
माझा बाप ठावूक नाही म्हणून धमक्या गाजत असतात 

परीक्षा संपते  अभ्यास सरतो डिग्री पडते हाती याच्या 
नोकरी मिळवत नोकरी टिकवत कमवू लागतो चार दिडक्या 
आरामात पसरणारे बाजीराव मग घोड्यावरती स्वार होतात 
नोकरीच्या बाजारात मग नियमाने मोहिमा काढू लागतात 

नोकरी जमते छोकरी सापडते मग बर उडतो जोरात 
एकट्याचे दोघे होतात सुखी संसार करू लागतात 
दोघांच्या अंगणात मग तिसर बछड मग खेळू लागत 
नव्या कोऱ्या बापाला मग जुन्याच मन कळू लागत 

नवा कोरा बाप मग पोरासवे खेळू लागतो 
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो 
पोराशी खेळताना दोघेही जातात भूतकाळात 
एकाला दिसतो दुसरा लहान दुसरा पाहतो गोष्ट महान 

रंगलेल्या गोष्टीत मग शिरतो फ्लेशबेक 
बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ 
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा  बाप दिसतो 
त्याची लाल रेघ जो उरात घेऊन फिरत असतो 

कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणार पाणी असत 
भल्यासाठी लेकरांच्या झगडणार हाड असत 
दोन घास कमी खील पण पोरांना गोड देतो 
हट्टासाठी पोरांच्या ओवर टाइम तो मारत असतो 

डोक्यावरती उन झेलत सावली तो देत असतो 
दणाणणारया पावसापासून कुटुंब आपल जपत असतो 
घर नीट चालवण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो 
आईच्या मऊ तळव्यामागचा तो राकट हात असतो 

बाप कधी रडत नाही बाप कधी खचत नाही 
बाप कधी उतत नाही बाप कधी मातत नाही 
पोर सोडतात घरटी शोधू लागतात क्षितिजे नवी 
बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काडी

पोरांच्या यशासोबत  त्याच मन हसत असत 
अपयश पचवताना ते आतून रडत असत 
काहीही झाल कितीही झाल तरी कणा ताठ असतो 
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो 

सारी कथा समजायला फार मोठ व्हाव लागत 
बापाच मन कठीण फार चटकन हाती लागत नसत 
आकाशाहून भव्य अन सागराहून खोली असते 
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते 

कळत नाही बापाच मन स्वतः बाप झाल्या शिवाय 
बाप माणूस असतो तो बापाशिवाय कसा कळणार ?
असत न्यारच रसायन त्याची फोड उकलत नाही 
म्हणून तर बापावर कोणी कविता करत नाही 

करणार कशी कविता कोण चार ओळीत तो मावत नाही 
चार ओळीत सांगण्या सारखा बाप काही छोटा नाही 
सोनचाफ्याच फुल ते सुगंध कुपीत मावणार नाही 
बाप नावाच्या देवाचा थांग काही लागत नाही 


(संकलित )

No comments:

Post a Comment