Monday 15 July 2013

" जिंदा " मिल्खा !!

दिलो मै अपनी बेताबिया लेके चल रहे हो

 तो जिंदा हो तुम !
नजर मै ख्वाबोकी बिजलीया लेके चल रहे हो 
तो जिंदा हो तुम !
जो अपनी आखोमे हैरानिया लेके चल रहे हो 
तो जिंदा हो तुम ! 
दिलोमे तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो 
तो जिंदा हो तुम ! 

रोम ऑलिम्पिक मधील अपयशापासून ते पाकिस्तान मधील यशापर्यंतचा मिल्खा सिंग यांचा 'जिंदा ' प्रवास म्हणजे भाग मिल्खा भाग . . ! फाळणीचा राग ,दुक्ख , अगतिकता याचे घाव सोबत घेऊन पाळणाऱ्या सामान्य व्यक्तीचा असामान्य प्रवास म्हणजे भाग मिल्खा भाग . . .  १०० वर्षे पूर्ण केलेल्या भारतीय सिनेसृष्टीत 'व्यक्तिप्रधान ' चित्रपट क्वचितच होतात . त्यातल्यात्यात 'क्रीडा ' क्षेत्रातील आणि त्यातूनही ' athletics '  मधील व्यक्तीवर चित्रपट काढणे म्हणजे 'दुर्मिळ ' घटना . हे धाडस केल्याबद्दल राकेश ओमप्रकाश मेहरा याचे विशेष कौतुक करायला हवे . व्यक्तिप्रधान चित्रपट करताना ती 'डॉक्युमेंटरी ' होण्याचा संभव असतो . चित्रपट बघायला आलेल्या व्यक्तीला बहुतांशी ती रटाळ वाटते आणि चित्रपट  गल्ला पेटीवर आपटतो . 
चांगली कथा हाती असताना नेमके आणि वेचक काय दाखवायचे याची दृष्टी  वास्तववादी चित्रपटांचे  दिग्दर्शक मेहरा यांना असल्याने मिल्खा मनास  भावतो . . . 
                 
सिनेमाची सुरुवात होते रोम ऑलिम्पिक पासून . . . भारताचे आशास्थान असलेला मिल्खा काही सेकंदाने अपयशी ठरतो आणि कथेला सुरुवात होते . . अपयशी खेळाडूचे पुतळे जाळणे इत्यादी प्रकार ६० च्या दशकात सुद्धा होते हे पाहून आपल्या समृद्ध परंपरेचे दर्शन होते . . मिल्खाला पाकिस्तानात जाण्यासाठी मनवायला दिल्ली - चंदीगड असा प्रवास करणाऱ्या ३ व्यक्तींच्या बोलण्यातून मिल्खाचा प्रवास उलगडतो . . गोविंदपूर नामक गावात राहणाऱ्या मिल्खा (जपतेज सिंग ) आणि त्याची बहिण इसरि  (दिव्या दत्त ) यांच्यातील प्रेमाचा धागा , टुई , इंग्लिश ने विनोद निर्माण करणारे  मोजके प्रसंग मिल्खाचे बालपण  दाखवतात .  फाळणी नंतर मील्खाच्या कुटुंबाची झालेली वाताहात  आणि आईच्या प्रेतावर मिल्खाने केलेला आक्रोश फाळणीचे परिणाम बटबटीतपणा टाळून प्रभावीपणे समोर येतात . छावणीत बहिणीवरील अत्याचार बघून अस्वस्थ झालेला मिल्खा बालकलाकाराने उत्कृष्ठ वटवला आहे . पोटासाठी ' चक्कु -छुरी ' चालवणारा मिल्खा बिरोशी (सोनम कपूर )च्या प्रेमात पडतो आणि कथेला वळण मिळते .  मिल्खावर प्रेमकथा वरचढ ठरते काय अशी शंका येते . पण मर्यादित अभिनय करणाऱ्या बिरोशीची लांबी मर्यादित ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे . त्यांच्या प्रेमकथेतील बॉल मधून संदेश पाठवायचे प्रसंग , पाणी भरणे , नन्हा मुन्हा राही हु गाणे प्रेम रंगवते . मिल्खाला " तुम मेरे टाइप के नही हो " असे खिजवून बिरोशी निघून जाते . तिथूनच सुरु होतो मील्खाचा प्रवास . . काहीतरी बनण्यासाठीची धडपड ! मिल्खा आर्मीत नक्की कसा जातो ते शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही . परंतु तेथे प्रकाशराज याने आपली छोटेखानी भूमिका चोख पार पाडत दाद मिळवली आहे . दुध दुध म्हणत मिल्खाने आपली पहिली शर्यत जिंकणे , भारताचा ब्लेझर घातला म्हणून झालेला अपमान आणि तो मिळवण्याचा घेतलेला ध्यास आणि त्याची पूर्तता या सूत्राभोवती मिल्खा पळतो  . धावपटू होण्यासाठी मिल्खाचा खडतर प्रवास कात्री न लावता दाखवला आहे . पायात दगड घुसणे , राष्ट्रीय स्पर्धेत जखमी असतानाही धावणे आणि जिंकणे , ४०० मीटर जागतिक विश्वविक्रम करण्यासाठीचे मिल्खाची मेहनत , मिल्खाचे चरित्र आणखीनच रंगवते . . . सामान्य माणूस ते १ दिवसाची सुट्टी नेहृंकडून मंजूर करून घेणारा असामान्य मिल्खा हा प्रवास म्हणजे मिल्खा . . यात कष्ट आहेत , मेहनत आहे , भावना आहेत , आक्रोश आहे , राग आहे , द्वेष आहे , प्रेम आहे , सेक्स आहे पण 'मर्यादित ' . . सिनेमा 'मील्खा 'चा असल्यामुळे इतर गोष्टी गौण ठरतात आणि लक्षात राहतो तो केवळ मिल्खा . . 
             
लांबीची पर्वा न करता खोलीला प्राधान्य दिल्याबाबत दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि लेखक प्रसून जोशी यांचे कौतुक केले पाहिजे . माझ्या माहितीप्रमाणे जोधा अकबर नंतर लांबीने मोठा असा हा पहिलाच चित्रपट आहे . कथा आणि सादरीकरण 'जिंदा ' असेल तर प्रेक्षक चित्रपटगृहात ३ तास बसतो याचे उदाहरण म्हणजे 'मिल्खा ' ! फरहान अख्तर याने मिल्खा अप्रतिम साकारला आहे . त्याने कमावलेली शरीरयष्टी त्याच्या अभिनयाइतकीच मजबूत आहे . कथा आणि कथेचा आवाका समजून घेतल्याने अभिनय किती सहज आणि सुंदर होतो ते फरहानने दाखवून दिले . सोनम कपूर ला मर्यादित वाव आहे . पण अभिनयात अजून बरीच मजल मारावी लागेल ते स्पष्ट होते . . दिव्या दत्ता ने भूमिकेचे सोने केले आहे . पवन मल्होत्राचा गुरुजी आणि योगराज सिंग यांचा ट्रेनर , प्रकाशराज यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत . . . चित्रपटाची गाणी श्रवणीय आणि मोजकी . . त्यामुळे चित्रपट पाहताना कोठेही रटाळपणा येत नाही . . मिल्खाने तुपाचे २ डबे पिणे यासारखी अतिशयोक्ती टाळता आली असती तर बरे झाले असते पण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे . . कारण हा सिनेमा मिल्खाचा आहे . . त्याच्या प्रवासाचा आहे । पाकिस्तानातील सामना जिंकून जेवा तो मैदानाला फेरी मारतो तेवा आपल्यातील मिल्खा आठवल्याशिवाय रहात नाही . . पळत आणि पळवत राहणारे आयुष्य ३ तासात अनुभवायला मिळते . केवळ 'फ्लाइंग सिख ' म्हणून कधीतरी वाचलेला मिल्खा आयुष्यात काय होते आणि त्यांचे आयुष्य काय होते हे या निम्मिताने बघायला मिळाले . खेळाडूंवर चित्रपट निघाले पाहिजेत कारण त्यांचा खडतर प्रवास अनेक जीवाना प्रेरणा देत राहतो . प्रसिद्धीत राहण्याचा हक्क त्यानाही असतो . सिनेमा संपल्यावर डोळ्यासमोर राहतो तो मिल्खा आणि कानात घुमत राहते . . उल्जे क्यून पैरो मै ये ख्वाब . . आंख जुबान पे रख ले फिर चोट के होठ भी गायेंगे , घाव गुनगुनायेंगे तेरे दर्द गीत बन जायेंगे . . "जिंदा ' ' है  तो प्याला पुरा भर ले . . . " जिंदा ' मिल्खाला सलाम !! 

भाग मिल्खा भाग 
रोम्प प्रोडक्शन 
निर्माते - वायकॉम १८ , राकेश ओमप्रकाश मेहरा 
दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा 
लेखक - प्रसून जोशी 
संगीत - शंकर एहसान लॉय 
कलाकार - फरहान अख्तर , सोनम कपूर ,दिव्या दत्ता , पवन मल्होत्रा , योगराज सिंग , दिलीप ताहिल इत्यादी 

टाळ्या शिट्ट्या फेटे = ५ /५  

No comments:

Post a Comment