Sunday 14 July 2013

लॉर्डसचा ' दादा '

लॉर्डस ! इतिहास , परंपरा ,शिष्टाचार , विक्रम आणि सौंदर्य यांचा मिलाफ . . जुलै १८१८ पासून प्रत्येक ध्येयवेड्या क्रिकेट खेळाडूचा स्वप्नात दिसणारे मैदान . . या मैदानावर शतक ठोकून साहेबांनी टाळ्यांच्या गजरात दिलेली मानवंदना स्वीकारत वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या पेव्हेलिअन मध्ये ताठ मानेने जाव किंवा ५ विकेट मिळवत लाल चेंडू लॉर्डस च्या हिरवळीला , सभ्य वेशात आणि आवेशात बसलेल्या प्रेक्षकांना दाखवावा हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न . . home of cricket . . . mecca of cricket . . क्रिकेट चे माहेरघर कोणत्याही भाषेतले नाव दिले तरी त्याच्या सन्मानात भरच पडते . . . पण प्रत्येक अलौकिक गोष्ट शापित असते ! जागतिक क्रिकेट मध्ये धावांचे रतीब घालणारे आणि शतकाचे ढीग  लावणारे सुनील -सचिन यांचे एकही शतक लॉर्डस वर नसावे हे प्रत्येक भारतीयाच्या मनातील शल्य !  २५ जून १९८३ रोजी कपिल देव याने विश्वचषक उंचावला तो क्षण आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरला आहे .. आताच्या पिढीला तो क्षण यु ट्यूब वर बघून समाधान मानावे लागते . . पण . . याच लॉर्डस च्या ऐतिहासिक बाल्कनीत शर्ट काढून झळकावणारा 'दादा ' आमच्या मनावर अजूनही राज्य करत आहे . . १९९६ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून याच लॉर्डस वर सुरु केलेल्या 'दादागिरीला ' १३ जुलै २००२ रोजी नवा मुलामा चढला . . . आक्रमकतेचा !! 


               
The Lords 
 भारत . . क्रिकेटला धर्म मानणारा देश ! धर्म म्हंटले की व्यक्तिपूजा आलीच . . ठराविक खेळाडूंवर वर्षानुवर्षे  भिस्त ठेऊन आशावाद बाळगणारा देश . . प्रचंड गुणवत्ता असलेले खेळाडू असूनही सांघिक खेळाचा आणि आक्रमकतेचा किंचित अभाव असल्याने केवळ वैयक्तिक यशाची तोरणे मिरवणारा देश . . अपयशी नाही पण जिंकायची जिद्द आणि जीद्दीसाठी आवशयक आक्रमकता नसलेला संघ . . . या सर्व उणीवांवर मात करत लॉर्डस वर मिळवलेला विजय म्हणूनच मोलाचा ठरतो . . ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ खचतो या आजपर्यंतच्या समजुतीला झुगारून देणारा हा विजय . . सचिन खेळला नाही तर भारतीय फलंदाजी कोलमडते या भासाचे उत्तर म्हणजे हा विजय . . युवराज - कैफ -हरभजन यांसारख्या ' नवोदितांकडून ' विजयाचा झेंडा अटकेपार लॉर्डस वर लावता येतो याचे प्रतिक म्हणजे हा विजय . . . शर्ट आणि मैदानावर तो काढून फिरवण्याचा ठेका केवळ ब्रिटीशाना नाही असे फ्लीन्टोफ समवेत सर्व क्रिकेट जगातला संदेश देणारा हा विजय . . भारतीय क्रिकेट ने आतापर्यंत न पाहिलेल्या न अनुभवलेल्या आक्रमक दादागिरीचा उदय म्हणजे हा विजय . . . या सर्व भविष्यात इतिहास घडवणाऱ्या घटनांचा साक्षीदार . . . ऐतिहासिक 'लॉर्डस ' !! 
               
M.trescothiCk & N.Hussian 
 १३ जुलै २००२   मागील ९ मालिकांचे अंतिम सामने हरल्याचा वारसा घेऊन भारत लॉर्डस वर उतरला . . . प्रथम ग्रासे मक्षिका पतन याप्रमाणे सलामी जोडीतील ट्रेस्कोथीक ने भारतीय गोलंदाजीतील कमकुवत आत्मविश्वासाची पिसे काढायला सुरुवात केली . . १०९ धावा चोपत त्याने इंग्लंड चा पाया भक्कम केला . . कर्णधार हुसेनने वाहत्या थेम्स मध्ये हात धुवून घेत भारतीय गोलंदाजाना आणखीनच फोडून काढले . . त्याने कुटलेल्या ११५ धावा भारतीय मानसिकतेचे खच्चीकरण करण्यास पुरेशा होत्या . . इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांकडून धावांच्या रुपात ३ गुना ' लगान ' वसूल केला होता . . भारताच्या 'आघाडीच्या ' गोलंदाजांची कामगिरी प्रत्येकी १० ओवर मध्ये - नेहरा -६६ /१ , झहीर ६२ /३ , कुंबळे ५४ /१  प्रत्येक गोलंदाजाने 'अर्धशतक ' साजरे केले होते . . पण हे अर्धशतक 'दाद ' देण्यासारखे निश्चितच नवते . . . गोलंदाजांनी 'स्वाहा ' केलेल्या ३१ अवांतर आणि अनावशाय्क धावा म्हणजे आधीच कर्जबाजारी असलेल्या सरकारने  अन्नसुरक्षा विधेयक लागू करण्यासारखे होते . . आधीच उल्हास त्यात . . असो . . गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या कामगिरीने इंग्लंड ने ५० षटकात ५ बाद ३२५ धावांचा डोंगर उभारला . . . प्रत्येक भारतीय एकमेकाला फक्त ३२५ . . हुष . . कठीण आहे . . हरणार राव आपण . . तत्सम चर्चा करण्यात व्यस्त होता . . पण भारतीयांचा अपेक्षाभंग करायला 'दादा ' आणि "विरु " मैदानात उतरले . . 
                   
M.Kaif &Yuvraj 
 फलंदाजीत आक्रमकता काय असते किंवा दडपण कसे झुगारून द्यायचे असते ते दादा ने दाखवून दिले … त्याचा प्रत्येक फटका जबरदस्त होता … ऑफचे त्याचे हुकुमी फटके डोळ्याचे पारणे फेडत होते . . त्याने मारलेला उत्तुंग षटकार म्हणजे ' क्या बात ' . . . लॉर्डस सुनामीचा तडाखा अनुभवत होते . . एका बाजूने गांगुलीचे फटके तर दुसरीकडून विरु चे चौके . . खाली ठेवलेले तिरंगे पुन्हा हाती आले होते . . इंग्लंडच्या विमानतळावर परतीच्या प्रवासासाठी गेलेली आशा /होप परत मैदानावर आली होती . . . गांगुलीने ४३ चेंडूत झोडपलेल्या ६० धावा त्याच्या आक्रमकतेची साक्ष देण्यास पुरेशा होत्या . . सांघिक  १०६ धावांवर गांगुली बाद झाला . . त्याने निराशेने आणि रागाने bat वर मारलेला पंच मला आजही आठवतो . . हजेरी लावणे किंवा हुजरेगिरी करणे हे पिढ्यानपिढ्या आपल्या रक्तात भिनलेले असल्याने 'भारतीय ' खेळाडूंनी आपले काम चोख पार पाडले  . . सांघिक ११४ वर सेहवाग (४५ ) , १२६ वर दिनेश मोंगिया (९ ) , १३२ वर द्रविड (५ ) , १४६ वर तेंडूलकर (१४ ) वर बाद झाले . . . भारतीयांनी आपापले टी व्ही शिव्या घालत बंद केले . . मा ,बे शब्दांची गल्लोगल्लीत आवर्तने व्हायला सुरुवात झाली . . पण कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे निराशेचा सागर कितीही अथ्यांग असला तरी त्यात प्रकाशाची काही बेटे असतातच . . त्या बेटांनी आपले काम सुरु केले होते . .  विजयाचा कैफ चढलेला युवराज मैदानावर तळपत होता . . अतापरेंत अभावाने पाहायला मिळालेले उत्तम Running between the wicket , कडकडीत फटके , उंचच उंच चौकार आणि षटकार यांनी पराभवालाही विजयाचे स्वप्न पाहायला 'भाग ' पाडले . . ६३ चेंडूत ६९ धावा ( ४ X ९ , ६ x १ ) फोडून युवराज बाद झाला . . धावसंख्या ६ बाद २५७ . . जिंकण्यासाठी अजूनही ६८ धावांची गरज . . हरभजनच्या १५ धावा . . आणि मोहमद कैफ च्या नाबाद ८७ धावांमुळे भारत जिंकला . . पण विजयाचा आनंद अजून साजरा व्हायचा होता . . 
                         जिंकण्यासाठी २ धावा हव्या असताना झहीर एका धावेसाठी पळाला आणि ओवर थ्रो ने दुसरी धाव कैफ ने पूर्ण केल्यावर त्याने मारलेल्या विजयी उडी पेक्षा लॉर्डस  च्या लाल gallery   मधील गांगुलीचा विजयोत्सव अधिक महत्वाचा होता आणि त्याहून महत्वाचे होते ते फ़्लिनटोफ चा चेहेरा . . . या एका विजयाने भारताची महत्वाच्या सामन्यात कच खायची वृत्ती   , आक्रमकता शक्यतो टाळायची मानसिकता , एखाद्या खेळाडूवर विसंबून राहायची सवय मोडीत निघाली आणि दादागिरीचा उदय झाला . . याच दादागिरीने भारतीय क्रिकेट बदलले , घडवले . . . आज संघाला मिळत असलेला विजय याचा दादागिरीच्या संस्कारातून मिळत आहे . . म्हणूनच १३ जुलै २००२ हा दिवस प्रत्येकासाठी महत्वाचा आहे . . कारण आज जागतिक क्रिकेट मध्ये भारत करत असलेल्या दादागिरीचा पाया याच दिवशी घातला गेला होता . . . दादाने !! 

No comments:

Post a Comment