Friday 19 July 2013

पोटोबा साठी विठोबा !!

आधी पोटोबा मग विठोबा असे का म्हणतात याचा एकादशीलाच (पुनश्च ) प्रत्यय आला . . आजच्या काकड आरतीला आजीला घेऊन जायचेच असा निश्चय करून काल २ तास लवकरच झोपलो . तसा मी निश्चयाचा महामेरू आहे . निश्चय /संकल्प करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही . . दरवर्षी संकल्पासाठी मी नवीन वही घेतो . पहिल्या पानावर श्री गणेशा लिहून शिस्तबद्ध आयुष्याचा संकल्प सोडतो . . सात आठ दिवस आणि पाच सहा पाने वाया गेल्यावर दैवी योजनेचा भाग म्हणून  ये जीना भी क्या जीना है लल्लू  चा 'दृष्टांत ' होतो . नव्या वहीची पाने फाडून आणि माझे 'निश्चय ' कोणाच्या हाती लागू नयेत म्हणून 'खुफिया ' जागेत लपवून वही वेगळ्या विषयाला घालून सत्कारणी लावतो . असे  माझे  फारसे बेशिस्त नसलेले  पण अती शिस्तबद्ध आणि साचेबद्ध जीवनाची आवड नसलेले   आयुष्य ! या पूर्वानुभवावर मी  निर्णय काय प्रतिज्ञा केली की उद्या  सकाळी ४ ला उठायचे . ३ , ३.१५ , ३. ३० , ३,४५ , ३ ,५० माझ्या मोबाईल ची लिमिट संपल्यावर आईचा घेतला आणि ३. ५ ५ ,३ . ५७ , ४ . ० ० , ४ . ५ असे "अलार्म '' लाऊन झोपी गेलो . . पण पावसाने घात केला . . रात्रभर चीर पीर ,पीर पीर ,बद बद चालू होते . . हवेत कमालीचा गारवा आणि झोपेला पोषक वातावरण निर्माण केले होते . ३ ला उठलो 'पंखा ' बंद , ३ ;४५ आणखी एक पांघरूण . . . काय उठतोय ? थोडा और विश करो , , या सवयीने लोळण्याचे किती तास गेले विठोबाला माहित . . मध्यंतरी आमचे कुत्रे हात पाय चाटून गेले , पांघरुणात थोडा वेळ झोपून गेले , मेसेज आले पण 'झोप ' काही उडाली नाही . . . जे काम हे करू शकले नाहीत ते कढइने केले . . कढइ वर उलतने फिरताना जो आवाज स्वर्गीय वाटतो , पाचक रसांचा ओवरफ्लो करतो , कुतूहल जागवतो , कढइत काय असेल ? अशी कल्पनाशक्तीला मुक्त वाव देतो , आज चैन आहे अशी शाश्वती देतो त्या आवाजाने मी जागा झालो . . झोपेत चालणारे किंवा मद्याचा अंमल निम्मा सरलाय पण निम्मा शिल्लक आहे अशा अवस्थेतले लोक झुकांड्या खात 'बरोबर ' जागी पोहोचतात तसे मी स्वयंपाक घरात पोहोचलो . . आणि समोर शुभ्र खिचडी पाहून "आनंद पोटात माझ्या मावेना . . " दात न घासलेल्या अवस्थेत दोन चार घास खाल्ल्यावर जशी दारुड्याची कोरी कॉफी पिल्यावर नशा जाते तशी झोप जायला लागली . . माझा आचरट आणि अधाशीपणा शांतपणे पहात उभारलेल्या नऊवारी साडीतल्या आणि कपाळाला बुक्का लावलेल्या आजीकडे लक्ष गेले . . बुक्के से याद आया . . . आईच्या गावात . . अरे आज एकादशी . . ४ ची काकड आरती . . घड्याळाकडे बघतो तर आता वाजले की सात . . फ (पुढचा शब्द आजी समोर असल्याने खिचडी समवेत गिळला ) . . चोरून दुध पिणारे मांजर अचानक मालक समोर आल्यावर बावरते आणि कलटी मारायचा रस्ता शोधू लागते तशी माझी अवस्था झाली . . कलटी मारणार तेवढ्यात कानावर शब्द आले 'आधी पोटोबा मग विठोबा का पोटोबाची सोय व्हावी म्हणून सोयीचा विठोबा " . . विकेट पडली . . आपले असेच असते . .तो दिवस साजरा का करतात हे जाणून घेण्या पेक्षा तो दिवस जास्तीत जास्त भपकेबाजपणे कसा साजरा करता येईल याकडे लक्ष असते ,  धार्मिक कृत्यांपेक्षा  पेक्षा दिवसाच्या मेनू वर अधिक लक्ष असते . . शतकानु शतके साजरा होणारा हा दिवस आपल्याला काय संदेश देतो याहून शुभेच्छाचे मेसेज पाठवायची गडबडच जास्ती असते . . सकाळी काकड आरतीला जाण्या पेक्षा खमंग काकडी खाण्यात जास्ती रस असतो . . निदान कळसाचे तरी दर्शन घेण्यापेक्षा कळसाला भिडलेल्या रताळ्याच्या भावाची घासाघीस करण्यात जास्त मोठेपणा असतो . . विठ्ठलाचा अभिषेक आणि वारकऱ्यांची श्रद्धा यासमोर नतमस्तक होण्यापेक्षा चंद्रभागेच्या वाळवंटातील गर्दीकडे बोट दाखवून हे गेल्यावर तेथील जैवविविधतेचे काय होईल ? यावर चर्चा करण्यात मोठेपणा असतो . . ना आपण एकादशी मानतो ना प्रमाणापेक्षा जास्ती त्यास महत्व देतो . . म्हाताऱ्या लोकांसाठी तो श्रद्धेचा विषय असतो अन इतरांसाठी सुट्टीचा . . . त्यामुळेच पोटोबा साठी विठोबा असा बदल ऐकायला ,वाचायला आणि पाहायला मिळतो . . .

                                     
 वारकरी संप्रदायाचे मनापासून अभिनंदन आणि प्रणाम . . . कारण ते माझ्यासारखे नाहीत म्हणून समाज माझ्यासारखा नाही . . झाडी लावलेल्या लाल माती टाकलेल्या आजूबाजूने हिरवळ असताना मी पण चालतो -जॉगिंग करतो .. . शेजारून कोणी गेले की 'वेग ' वाढवतो . . सगळे सोपस्कार पार पडल्यावर 'रेशो मेनटेन " करायला चीज सेंडविच खातो  . पण दर वर्षी दुरून पंढरीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची बातच काही और . . चालणे जरी एकच असले तरी दोन्हीच्या उद्दिष्टात मात्र फरक असतो .घरी मी खिचडी ,वरीचे तांदूळ ,दाण्याची आमटी ,खमंग काकडी ,लाडू -चिक्की खात असताना महिना दोन महिने चालत मिळेल ते खात पंढरीच्या ओढीने उन- पाऊस सहन करत चालणाऱ्या वारकऱ्यांचे महत्व काय वर्णावे ? या त्यागाच्या आणि ध्येयाच्या बाबतीत शिक्षण ,पैसा ,इत्यादी घटक येतच नाहीत कारण शिक्षण आणि पैसा माणसाचे विचार संकुचित करतो . . अर्थात सर्व वारकरी शिक्षण घेतलेले नसतात असा म्हणायचा अगोचरपणा मी करणार नाही . . पण ते 'स्टेटस 'च्या कर्करोगाने आजारी नसतात . आम्ही मात्र हा कर्करोग मनापासून जपतो ,वाढवतो . . तोंडी गाणी नाचवतो ,शेक्सपिअर वाचतो पण तुकाराम ,एकनाथ ,ज्ञानेश्वर उघडून बघायचे फारसे कष्ट घेत नाही कारण ते तर 'आजी 'साठी असतात . हाच फरक आहे विचारसरणीत आणि जीवनशैलीत  . याच फरकाला आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनाचा मुजरा !! मी सुद्धा अजून भागवत वाचले नाही पण या वर्षात तो नक्की वाचायचा संकल्प केला आहे . . आणि हा संकल्प मोडणार नाही कारण हा संकल्प संप्रदायाचा आहे , माणुसकीच्या धर्माचा आहे , त्यागाचा आहे ,विचाराचा आहे , पावित्र्याचा आहे आणि मला माणूस म्हणून समृद्ध करण्याचा आहे . आयुष्याचे सार आणि जीवनशैलीची समृद्ध परंपरा मला माहित असेल तरच माझ्या मुलांना सांगू शकेन कारण टी व्ही केवळ दर्शन घडवू शकते पण भाव तर अनुभवावा लागतो . .  .पण आज राहून राहून जाणून घ्यावे वाटते की  असे किती "मी '' तुमच्यात आणि तुमच्या आजू बाजूला दडले आहेत ? 

No comments:

Post a Comment