Thursday 8 August 2013

शहीद होण्यासाठीपण नशीब लागते

शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 
भारतीय सैन्यात दाखल व्हावे लागते 
मिसरूडफुटलेले असो वा केस पांढरे झाले असो 
आयुष्यभर 'जवान ' म्हणून मिरवावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

सीमेवरची तार डोळ्यात प्राण आणून रक्षावी लागते 
प्राण जात असताना घरच्या तारेकडे प्राण जाईपर्यंत पहावे लागते  
कोण बाहेरचे अन कोण आतले 
दोहोसह सतत झुंजावे  लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

उगवतो एक दिवस, एक रात्र मावळते 
उलटतात आठवडे अन सरतात वर्षे 
काळावर एकदिवस काळच घाला घालतो 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते  

ज्या तिरंग्यासाठी केला अट्टाहास 
ज्याच्या सन्मानासाठी दिले आपले प्राण 
तोच तिरंगा अंगाभोवती लपेटल्यावर काय सुख मिळते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

कारण नसताना होते ते राजकारण 
कारण असताना होते ते सत्ताकारण 
राजकारण आणि सत्ताकारण अनुभवायला
 सीमेवर जावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

गोळी घुसेल बॉम्ब फुटेल 
शिरहीन देह भडाग्नित जळेल 
अक्रोशांच्या फैरी आणि अश्रूंची सलामी मिळेल 
हे बघून क्रियाकर्म करणाऱ्या पोराला वाटेल 
मला पोरका करून बा कायतर करून गेला 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

तिरंग्याच्या भगव्यात दिसतो बाचा पटका 
हिरव्यात दिसते गावचे शेत अन हिरवा चुडा 
चक्रात दिसतं मायचा तवा अन भाकर खरडा 
पांढऱ्यात दिसते माझ्या बायकोचे कपाळ 
हे सगळे काही क्षणात अनुभवायला मरावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

मोर्चे निघण्यास सभा भरण्यास 
कमानी उभारण्यास अन पुरस्कार मिळण्यास 
दहनाचा सोहळा 'लाइव ' होण्यास 
सीमेवर जावे लागते 
लढता लढता मरावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

कितीदिवस मरायचे अन सोसायचे ?
वळणाऱ्या मुठी अन स्फुरणारे बाहू किती दिवस रोखायचे ?
समोर दिसणाऱ्या शत्रूला कितीदिवस मोकाट सोडायचे 
सोडलेल्या शत्रूकडून किती दिवस 'चकमकीत ' मरायचे ?
अहिंसा मानणाऱ्या देशाचे हेच तर दुखणे  असते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते  

मी वर जाईपर्यंत अजून दोन चार येतील 
ते येईपरेंत अक्खी रेजिमेंट येईल 
वरच भरेल मग शहिदांचा मेळा
जो एकमुखाने गरजेल 
आता तरी कबुतरे उडवायचे थांबवा 
कमी जवानांची नाही तर 
धोरणांची आहे 
भीती मरणाची नाही तर
 मेल्यानंतरच्या राजकारणाची आहे 
एकदिवस शहिदांची रेजिमेंट करेल हल्ला 
सोडवेल काश्मीर अन भयमुक्त करेल तिरंगा 
तेवाच अखंड भारत बोलेल ,
''शहीद होण्यासाठीपण नशीब लागते "


पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांत वारंवार शहीद होणाऱ्या जवानांना हतबल भारतीयाचा मानाचा मुजरा . . तुमची घरे मोडतात म्हणून आमची उभी राहतात . . तुमच्या घरी चुडे फुटतात म्हणून आमच्या घरी येतात . त्यागाने सुरु होणारे आणि शहीद होऊन संपणारे तुमचे आयुष्य म्हणजे दुराभिमान आणि अभिमान यात सुरु असलेले अखंड युद्ध . कदाचित कधीच न संपणारे . . . सार्थ अभिमान आहे मला तुमचा आणि सीमेवर अखंड पाहरा देणाऱ्या जवानांचा . . तुमचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही , तुमच्या यशोगाथा केवळ एखादी कमान ,चक्र किंवा समाधीपुरती मर्यादित राहणार नाही . .जात -धर्म विसरून  ती प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या धमन्यातून त्यागाची आणि लढ्याची प्रेरणा देत वाहेल . . एकदिवस तुमचे आमचे देशाचे स्वप्न साकार करेल तेव्हा आपण अभिमानाने म्हणू ' व्यर्थ न गेले बलिदान ' 

अंकुर 

No comments:

Post a Comment