Saturday 31 August 2013

दाभोलकर : मला माफ करा !


पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन १० दिवस उलटून गेले . या दहा दिवसात बरेच काही घडून -बिघडून गेले . घडून अशासाठी की अनेकांना दाभोलकर प्रेमाचा उमाळा आला . मेल्यानंतर शत्रू सुद्धा अजातशत्रू होतो याचे ताजे उदाहरण मिळाले . बिघडून अशासाठी की ओंकारेश्वर पुलावर पडलेले दाभोलकर यांच्या रक्ताचे डाग अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत . घडलेला गुन्हा आणि बिघडलेले राजकारण यावर सहानुभूतीचा आणि कावेबाजपणाचा मुलामा म्हणून 'ते ' विधेयक संमत करून घेण्यात आले . वर्तमान पत्राचे रकाने आणि चेनेल वरचे 'प्राइम टाइम ' दाभोलकर महतीने सजू लागले . . इतके 'महान ' होते का दाभोलकर ? जर होते तर आपण त्यांचे महानपण कोठे लपवले होते ?का मृत्यूपश्चात त्यांना 'महान ' बनवून किंवा त्यांचे महानपण मान्य करून  , आपण आयुष्यभर केलेले कोडगेपण महानतेच्या मुलायम वस्त्रात लपवू पहात आहोत  ? हे प्रश्न मला रोज पडतात . दाभोलकरांच्या कार्यावर शंका म्हणून नाही तर आपल्या वृत्तीवर शंका म्हणून .  मोकळ्या घरात घोंघावणारा वारा आपल्या अस्तित्वाने घर भरून टाकतो . . चार पाने उचलून आणून आणि घरातली चार पाने दोन जळमटे बाहेर टाकून रिकाम्या घरास काहीतरी सजीवत्व देतो . . पण . . बधिर झालेल्या संवेदनांना आपल्या शेपटाला बांधून मोकळ्या मनात फिरणारा पश्चात्तापाचा वारा  यांचा मृत्यू 'स्वीकारणारा ,पचवणारा ' मी जिवंत का आहे ? याची बोच देतो . माझे सजीवत्व निर्जीव करून टाकतो  . . याच बोचऱ्या मनाने मी रोज म्हणतो ' दाभोलकर : मला माफ करा ! ''

           
   फेसबुक वरच्या नवलाईच्या आणि माझ्या मानसिक अपरिपक्वतेच्या दिवसात मी कट्टर हिंदू आणि कर्मठ ब्राह्मण होतो . रस्त्यावर उतरून धर्म किंवा जातीसाठी काही करणे मला जमले नाही पण फेसबुक वरून शब्दांचे वार करण्यात मी कोठेही कमी पडत नसे . आपले ते अमरत्व आणि दुसर्याचे ते पामरत्व या न्यायाने  (?) माझी निसरड्या वाटेने वेगवान वाटचाल सुरु होती . मी , माझा धर्म आणि माझी जात कधी चुकूच शकत नाही या अहंकाराने इतर जाती धर्मावर कायद्याची चौकट सांभाळून कधीमधी युद्धात उतरायचो . . या काळात अनेक मित्र झाले . 'वास्तवाचे ' भान मला आल्यावर मी तो रस्ता सोडला . त्या मित्रांनी मला सोडले . या मानसिक 'अस्वस्थतेच्या आणि अस्थिरतेच्या  ' काळात माझा अन दाभोलकर यांचा परिचय झाला . कोण्या एका तत्कालीन मित्राने ' जादू टोणा विधेयक ' हिंदू धर्माच्या कसे मुळावर उठणार , सत्यनारायण , रोजच्या पूजा , धार्मिक आन्हिके कशी बंद होणार याचे 'बौद्धिक ' घेतले अन त्याला पुरावे म्हणून काही 'लिंक ' दिल्या . कोणत्या लिंक होत्या आणि कोणी दिल्या होत्या ते आता आठवूनही आठवत नाहीये . कारण पुलाखालून बरेच पाणी काळाला , विचारांना आणि कट्टरतेच्या जळमटाना घेऊन वाहून गेले आहे . . . पण त्याच काळात दाभोलकर 'खलनायक ' म्हणून माझ्या समोर आले . आणले गेले . माणसाने एकदा विवेक झाकून ठेवला की  सतसतविवेकबुद्धी असहकार पुकारते . आपल्या सोयी आणि समजुती विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी मनात द्वेष निर्माण करतात . त्याच द्वेषाने मी पछाडलेला होतो . इतका , की दाभोलकर यांना इतर  धर्मातून हिंदू धर्माला नष्ट करायला 'मदत ' मिळते हे म्हणण्यापर्यंत माझी मजल गेली होती . कालांतराने हे खलनायकत्व नष्ट झाले पण मनापासून त्यांना 'नायक ' कधी मानलेच नाही .. . .
                       भारतीय प्रसार माध्यमांचा एक फार मोठा दोष आहे . आठ कोटी जनतेचा आवाज किंवा देशाचा /महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून मिरवणाऱ्या आणि आपले मिरवलेपण विकणाऱ्या प्रसारमाध्यमात 'जिवंत ' असणे ही 'बातमी ' नसते . एखद्या अभिनेत्रीने बिकिनी घातल्याने किती वाद झाला हे दाखवण्यात त्यांना जितका 'रस ' असतो तितकी एखाद्या समाज सेवकाने दुर्गम भागात काय कार्य केले हे दाखवण्यात /छापण्यात 'रुची ' नसते . मी जरी ५ वर्षे 'व्यवस्थित ' वृत्त पत्र /वाहिन्या पाहतो असे गृहीत धरले तर या पाच वर्षात एकदाही दाभोलकर यांच्या कार्याचा आढावा घेण्याचे कार्य कोणी केले आहे असे माझ्या स्मरणात नाही . कदाचित 'साधना ' मधून ते होत असावे पण दुर्दैवाने मी साधनाचा साधक नवतो . . कारण अशी काही साधना सुरु आहे हे माहीतच नवते . . माहित होते ते केवळ 'हिंदू धर्माला मोडीत काढायला ' येऊ घातलेले विधेयक आणि तो विधेयक आणू पाहणारा दाभोलकर . . . ( विरोधकाला मान वगैरे द्यायची पद्धत नसते न आपल्यात ?) . अतिशय त्रोटक माहितीवर आधारलेले दाभोलकर यांच्या बद्दलचे मत मी जपत आलो . त्यामुळेच दाभोलकर गेले तेव्हा मला इतका धक्का बसला नाही जितका आज बसतो आहे . अर्थात त्यांचा खून होणे किंवा आव्हाडी भाषेत गोडसेंची पिलावळ इत्यादी ठेवणीतले बोथट झालेले आरोप रेमटून करणे याला मी विरोध केलाच होता . पण दाभोलकर जाण्याने 'पोकळी ' निर्माण झाली आहे . पोकळी निर्माण झाली आहे हे जे ऐकत / वाचत होतो तर ती 'पोकळी ' म्हणजे काय याची उकल मला होत नवती . कारण दाभोलकर मला समजलेच नवते . दाभोलकर समजावे म्हणून प्रयत्न झालेच नवते . आज दाभोलकर प्रेमाची महती गाणारी प्रसारमाध्यमे योग्य वेळी बोलली असती तर मला पोकळीचा अर्थ समजायला पश्चात्तापाच्या वाटेवरून जावे लागले नसते . असो . . कोणी 'मिडिया ' वाल्याने हा ब्लॉग वाचला तर माझी त्यांना 'कोपरा पासून ढोपरा पर्यंत ' विनंती आहे की समाजसेवक आणि सामाजिक संघटना यांच्या कार्याची माहिती आणि गैरसमजाचे खंडन करणारे 'नियमित / साप्ताहिक ' सदर सुरु करा . आपल्या बाजूला सामान्य जीवन जगणारे असामान्य कोण आहेत ते आम्हाला त्यांच्या जिवंतपणीच समजूद्या . हे काम तुमचेच आहे . .
                 
दाभोलकर गेल्यानंतर त्यांच्या बद्दल जे प्रकाशित झाले किंवा जे सनातनी विचार पाहिले -ऐकले त्यावरून माझ्या निर्णयक्षमतेवर आणि नीरक्षीरविवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले . द्वेष एखाद्या व्यक्तीचा करायचा का त्याच्या कार्याचा ? मुळात द्वेष करावाच का ? त्या व्यक्तीचे विचार आपले पटत नाहीत म्हणून ? आपण ते पटवून घेऊ शकत नाही म्हणून ? काळाच्या पुढचे विचार ती व्यक्ती करते म्हणून का काळाच्या एक काळ मागे आपली विचारसरणी आहे म्हणून ? या प्रश्नांशी अजून मी झुंज देतो आहे . 'नरबळी ' हा किती भयंकर असतो ते 'रोंग टर्न ' हा सिनेमा पाहिल्यावर समजले . तुलना कदाचित अयोग्य असेल पण दाहकता बदलत नाही . कापलेलं  कोंबड आणि सोललेला माणूस यातली 'कापाकापीची ' समानता सोडली तर श्वापदस्वभावाच्या हिंसाचाराचे पदर भिन्न असतात . दाभोलकरांनी काय कार्य केले त्याचा उल्लेख मी करणार नाही . त्यांचे कार्य मी आताशी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय . समाजाने त्यांच्याविषयी उपस्थित केलेले प्रश्न आणि माझे उपप्रश्न हे कितपत खरे खोटे याबाबत माझ्या पातळीवर पडताळणी करत आहे . त्यामुळे अपुऱ्या माहितीनिशी त्यांच्या कार्याला विशिष्ट बांबूला बांधणे आणि त्या बांबूला आणखी एक दोन बांबू उसने आणून 'दाभोलकर कार्यशिल्पाचा ' तंबू ठोकणे मला मान्य नाही . या तंबूलाच नंतर स्वार्थाचा कळस चढतो आणि एक मंदिर /मशीद / चर्च तयार होऊन अंधश्रद्धेचा आणि व्याक्तीपुजेचा बाजार भरतो . निदान हे दाभोलकरांच्या बाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे . त्यांना देवत्व देऊ नये . . एक माणूस म्हणून एक विचार म्हणून त्यांचे अस्तित्व मान्य केले तरी ते पुरेसे आहे . ते एक उदाहरण म्हणून कायम समाजात राहावेत . . . फोटोवर फुली मारली म्हणजे कार्यावर फुली मारता येत नाही हे संपूर्ण समाजाला सांगण्यासाठी ते जगावेत
              मृत्यू . . तो आजारी होऊन आलेला असो वा शस्त्रकर्मानंतरच्या वेदनेने . तो अपघाती असो वा घातपाती . तो 'अटळ ' असतो . .हे सांगायला कोणाची गरज नाही .

'समाधानाने मिटतो डोळे
आता कार्य माझे संपले
अंधकार दूर करावयास
सरपण देहाचे जाहले  . .

असा समाधान देणारा मृत्यू असेल तर जाणाऱ्याच्या आणि मागे राहणारयाच्या मनात अपूर्णत्वाची भावना शिल्लक रहात नाही . पण दाभोलकर कार्य अर्धवट सोडून गेले .म्हणूनच दुक्ख अधिक होते . त्यांच्या मृत्यूचेही आणि मरेपर्यंत त्यांना समजून न घेतल्याचेही . . म्हणूनच म्हणावेसे वाटते  ' दाभोलकर : मला माफ करा '

No comments:

Post a Comment