Saturday 10 August 2013

चेन्नई एक्सप्रेस - सुटलेलीच बरी !!


कधी शेट्टी च्या हॉटेल मध्ये गेलाय ?? इडली ,मेदू वडा , डोसा ,उत्तप्पा ,अप्पम  असे काहीही मागितले तरी 'सांबर ' मात्र कॉमन असते . . एकदाच बनवून ठेवलेले . . वाटीत भरून ठेवलेले . घरोघरी ओरड असतेच . . इडली जमते हो . . पण सांबर 'शेट्टी 'चच . . असे हे शेट्टी एकदा व्यवस्थित शिजलेल्या डाळीत 'लोकांची मागणी ' म्हणून पाणी वाढवत जातात अन एक दिवस सांबर पेक्षा घरची कटाची आमटी बरी वाटू लागते ..  वापरून वापरून बुरा आलेली डाळ आणि रंगीत पाणी एकदा चवीने ,दुसऱ्यांदा कौतुकाने , तिसऱ्यांदा नाईलाजाने खाल्ली जाते पण चौथ्यांदा खाताना त्या 'शेट्टी ' च्या कुळाचा उद्धार नक्कीच होतो . . तद्दन गल्लाभरू ताज्या इडल्या वर्षानुवर्षे वापरून पाणचट झालेल्या सांबाराबरोबर वाढणाऱ्या रोहित नामक शेट्टीची ताजी इडली म्हणजे ' चेन्नई एक्सप्रेस' . . हॉटेल वाले शेट्टी आपल्या ग्राहकांची आणि मालाच्या दर्ज्याची काळजी घेतात पण सिनेमावाला शेट्टी मात्र नेहमीच 'गोलमाल ' करतो !! 
                   
बन के तितली दिल उडा कही दूर 
हिंदी सिनेमात जितक्या वेळा 'गाजर का हलवा ' बनला असेल त्यात एखादा डझन 'मा की /खानदानी चुडिया ' मिसळल्या तर जो आकडा येईल तितक्या वेळा 'दादाजी -दादिजी की अस्थियोंका विसर्जन झाले असेल . हा सिनेमा सुरु होतो दादाजीके अस्थियोंके कलश से आणि संपतो खाली कलश मै लोगोंकी गालीया भरके . कथा एकदम सिंपल आहे . आजीच्या भावना ,नातवाचे प्लानिंग , हिरोइन ची एन्ट्री , हीरोचे हृदयपरिवर्तन , अचानक झालेला प्रेमाचा साक्षात्कार आणि हेपी एंडिंग . . सिम्पल आहे न ? मधून मधून शेट्टी साहेब फुटाणे उडवल्या सारखे गाड्या उडवतात , चिप्स खाऊन पिशवी फोडतो तशा गाड्या फोडतात , पाणचट विनोद आचरट अभिनयावर शिंपडतात , गाण्याच्या भेंड्या लाऊन बेर्डे टाईप गाण्यांची आठवण करून देतात , मरतुकड्या हिरोकडून दांड सांड व्हिलनला  चिरकुट असल्या सारखे बडवून घेतात , मिसळीला जरा चव आली म्हणे परेंत दाताखाली फरसाण्यातला बेदाणा यावा तशी गाणी घुसडतात आणि सुंदर लोकेशन दाखवून थक्क करून सोडतात . . त्यांच्या सांबाराचा हाच 'हिट फोर्मुला ' आहे . त्यामुळे चेन्नई मध्ये नवीन काही पाहतोय असे वाटतच नाही . . .  इडली शिळी झाल्यावर त्याचे इडली फ्राय करून पैसे मिळवतात तसा हा प्रकार आहे . त्यामुळे यावेळी आकर्षण शेट्टी चे नवते तर शाहरुख खानचे होते . आकर्षण का प्रतीक्षा याबाबत मी तितकाच संभ्रमात आहे जितका सिनेमाचा कथा (?) लेखक सिनेमा रिलीज झाल्यावरही असेल . . असो . . 
                 
राहुल . . इल्ला परफोरमन्सा 
रिअल लाईफ मध्ये अनेक विवादात लीड रोल केल्यावर अखेर शाहरुख खान ला रिल लाइफ मध्ये जायला वेळ मिळाला . रा वन , डॉन २ , जब तक है जान सणकून आपटल्यावर आपली बादशाहत टिकवण्यासाठी धडपडणारा किंग संपूर्ण सिनेमात बावचळल्या आणि बावरल्यासारखा वाटतो . काही प्रसंगी फिल्मफ़ेअर पुरस्कार सोहळ्यातील  वाह्यातपणा कॉपी -पेस्ट करताना दिसतो . 'मै हु डॉन ' याची लोकांना आठवण करून द्यायला आपल्या सुपरहिट सिनेमातील दृश्यांचा आधार घेतो . तरीही तो बघवत नाही . वारंवार गॉगल घालण , 'कॉमन मेन ' चा डायलॉग आपल्या 'बाहे फैलाकर ' स्टाइल मध्ये फेकणे , नेहमीप्रमाणे नाका तोंडातून रक्त येई परेंत बुकलून मार खाणे आणि नायिकेचा आवाज ऐकल्यावर अंगात रेम्बो चा आत्मा शिरल्या सारखे खलनायकाला तुडवणे हा फोर्मुला शेट्टीच्या सांबारा इतका शिळा आणि पाणचट आहे . 'राहुल ' च्या वलयाला शाहरुख न्याय देऊ शकत नाही . बऱ्याच ठिकाणी आलेले दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे , कुछ कुछ होता है चे संदर्भ 'नॉस्टाल्जिक ' करतात आणि शेट्टीकथे पासून काही क्षण वाचवतात .झकास  राहुल रंगवायच्या नादात कुठल्या कथेतून किती अनावश्यक प्रसंग उचलतोय यात 'गोलमाल ' झाल्याने बोलबच्चन राहुल बुडीतखाती निघतो . बौद्धिक देणे आणि सवईचे डायलॉग नवीनच काहीतरी करत आहोत अशा अभिनयातून सादर करणे यापलीकडे राहुल जात नाही . असेच एक दोन सिनेमे शाहरुख ने केले तर शाहरुख खानचा कादरखान व्हायला वेळ लागणार नाही . 
                 
मिनम्मा . . दीपिका एक्सप्रेस सुसाट धावतीये 
अभिनयाच्या बाबतीत दीपिका बाजी मारते . तमिळस्टाईल हिंदी लवकरच युथ मध्ये 'इन ' होईल . विनोदाचे टायमिंग आणि सेंटी होण्यातला सेन्स तिने अचूक पकडलाय . त्यामुळे सिनेमा सबकुछ शाहरुख न राहता दीपिका ने अपनी जगह बनाली है बॉस . . बाकी सिनेमाबद्दल सांगण्या सारखे काहीही नाही . राज ठाकरे यांनी थोडा धीर धरला असता तर दुनियादारी साठी आंदोलन करायची वेळच आली नसती . बाकी कोणता सिनेमा रिलीज न झाल्याने शेट्टी सांबर पासून रिलीफ मिळवण्यासाठी लोकांनी दुनियादारी आवर्जून पाहिला असता . थेटरमालकांनी मोकळ्या खुर्च्यांना चेन्नई एक्सप्रेस दाखवण्या पेक्षा भरलेल्या खुर्च्यांना दुनियादारी दाखवण्याचे फायद्याचे गणित नक्कीच मांडले असते . सिनेमाची एक आणि एकमेव उत्तम बाब म्हणजे सिनेफोटोग्राफी . . ज्यांनी दक्षिण पाहिला नाही त्यांना मोहात पाडणारे  आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांना पुनश्च प्रेमात पाडणारे सीन यात आहेत . संगीत यथा तथा . अभिनय  'यालाच  अभिनय म्हणतात माइंड इट ' या पठडीतला . . दिग्दर्शन आपल्या आणि दिग्दर्शकाच्या सवईचे . . त्यामुळे एसी हॉल मध्ये, मऊ खुर्च्यांवर बसून बचकं  भर पॉपकॉर्न पोतभर पैसे ओतून खायचे असतील तरच (डोकेदुखी थांबण्याची गोळी घेऊन ) चेन्नई एक्सप्रेस मध्ये बसावे . . . नाहीतर चेन्नई एक्सप्रेस सुटलेलीच बरी !! 

चित्रपट - चेन्नई एक्सप्रेस
कलाकार - शाहरुख खान , दीपिका पदुकोण , सत्यराज 
दिग्दर्शक -रोहित शेट्टी 
निर्माता - गौरी खान 
              रॉनी स्क्रूवाला 
              सिद्धार्थ रॉय कपूर 
संगीत -विशाल शेखर 


टाळ्या शिट्ट्या फेटे - २  / ५ 


(खुलासा - तमाम उडपी हॉटेल चालवणाऱ्या शेट्टी लोकांबद्दल मला आदर आहे . अनेकदा मी त्यांच्या हॉटेलात जाऊन त्यांच्या इडली सांबर चा आस्वाद घेतो . केवळ विषयाची गरज आणि आडनावाचे सार्धम्य यामुळे उल्लेख केला आहे .हॉटेल वाले  शेट्टी त्यांच्या खाद्य पदार्थात चुकीचे पदार्थ वापरतात असे माझे म्हणणे नाही . कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी )

2 comments:

  1. You are a writing freak and you know that.... (y)
    lmao..... :D :D

    ReplyDelete
  2. wait till diwali, we can view it on television for free.......

    ReplyDelete