Tuesday 20 August 2013

समदुक्खी . .

भविष्य मांडणारे आणि भविष्यालाच अंधश्रद्धा मानणारे एकाच दिवशी गेले.  हा 'योगायोग ' मानायचा का ? योगायोग मानला तर एकाच्या कार्याला सलाम मिळेल तर एकाच्या कार्याचा विनोद होईल . हेमंत करकरे मारले गेल्यानंतर ज्या भावना 'कट्टर ' लोकांच्या मनात असतील . त्या आज पुन्हा उचंबळून वर आल्या असतील . या भावना जपायला भगवा टिळा , गोल टोपी , चंदनाचा उभी रेघ , पांढरी आडवी रेघ , निळा किंवा जांभळा पटका , पिवळा शेला इत्यादी लागत नाही . मार्ग चुकलेल्या लोकांना धर्म नसतो . जात नसते . आत्मभान नसते . विवेक नसतो . विचार नसतो . मन असते - नसते . डोके असते पण मेंदू जळमटानी भरलेला आणि भारलेला असतो . 'श्रेष्ठत्वाचा ' किडा त्याच्या संक्रामक क्षमतेनुसार सदसदविवेक बुद्धी आणि बुद्धी यात पूर्वग्रहदुषीततेचे 'जाळे ' विणायला सुरुवात करतो . स्वतः कोणाच्यातरी वैचारिक जाळ्यात अडकलेले आपल्याही डोक्यात 'नेत्या ' सारखे जाळे तयार होत आहे या दुराभिमानाने बिथरतात आणि मानवतेचा त्याग करतात . ज्यांच्यात पावलीभर माणुसकी शिल्लक आहे त्यांना धर्माची योग्य शिकवण योग्य मार्गाने देऊन वाचवता येते . ज्यांना धर्मांधतेचा लकवा मारला आहे त्यास इलाज नाही . निकामी असे अवयव आणि वासलात लागलेले मुद्दे घेऊन समाजात वावरणे आणि आपल्या लाकव्याचे उदात्तीकरण करणे याहून दुसरा मार्ग त्यास दिसत नाही . त्यास वास्तवाची गोळी द्यायला लागते . पहिल्याला जयंतरावांनी वाचवले तर दुसऱ्याला नरेंद्रजी नी !
                   लोकशाहिची दिन -दिशा दर्शिका रक्ताने लिहिली जात असेल तर ते लिहिताना  आपले हात बरबटायला नको म्हणून जयंतराव गेले . आणि दर्शिका आपल्या च मतानुसार आणि मनानुसार लिहिता यावी म्हणून दाभोळकराना पाठवले . दोन्ही लोकांचे कार्यकर्ते दुक्खी असतील पण शोकाकुलतेत फरक आहे . काही दिवस सामाजिक सभ्यतेचे नियम म्हणून दाभोळकर 'हिरो ' होतील . नंतर व्यक्तीस्वातंत्र्याचा उपभोग घेण्या साठीच आपला आणि आपल्या इंद्रियाचा जन्म झाला आहे या श्वान गणातील मनुष्य गोत्री मनसोक्त उपभोग घेतील . 'आपला धर्म ' सुटला म्हणून आनंद साजरा करतील . हे चक्र थांबणारे नाही . . . मुद्दे चार्चीण्यातले थोरत्व , त्यांचे खंडन करण्यातले पांडित्य , माघार स्वीकारण्यातले नम्रत्व याचा लोप पावून पुचाट मुद्दे अन विचार घेऊन शाब्दिक -शारीरिक वार करण्याचे षंढत्व वाढल्याने साधनेत खंड पडते . आज महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य हरपले . भूतकाळातील भुते आज चंद्राला झाकोळून अमावस्या साजरी करण्याच्या प्रयत्नात असतील . त्यांचे महत्व आणि दरारा कदाचित पुन्हा वाढेल .कदाचित विधेयक कायमचे 'स्वाहा ' झाले म्हणून नारळ फोडतील . आपले कार्य मनुष्य व्यवस्थित करत असल्याने आपण 'व्ही . आर . एस ' घ्यावी या मतावर एकमत होईल . अदृश्य भुते आणि दृश्य मानव (?) यांना आनंद साजरा करायचे आणखी एक कारण मिळेल . 
                  
                    जयंतराव आणि दाभोलकर अनंतात एकमेकांची निश्चित भेट घेतील . दाभोळकर म्हणतील ' जयंतराव भविष्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही . माणूस कर्तुत्वाने घडतो आणि कर्तुत्वानेच बिघडतो . कार्य हे जरी अंतिम सत्य असले तरी 'ध्येय ' माणसाचे रस्ते बदलवते . गती मिळावी म्हणून बांधलेले गंडे दोरे , लावलेले कुंकू गुलाल , कापलेले कोंबडे बोकड आणि ठेवलेला पिंडा समोरचा भात खरच गती देतो का ? मला मुक्ती मिळावी म्हणून शेकडो जण अनेकविध प्रयत्न करतील . आश्वासनांची शिडी बांधून येथपर्यंत येतील . स्व इच्छा माझ्या इच्छा म्हणून पूर्ण करून घेतील . माझी इच्छा कदाचित पूर्ण होईल पण कार्य अपूर्णच राहील . माणसाला पूर्णत्व मिळाले की त्याचा देव होतो म्हणतात . . . तो व्हायची मला लालसा नाही . पण कार्याला पूर्णत्व मिळवून कार्यपूर्ण होण्याचा मानस अधुरा राहिला . . . ' ' जयंतराव हसून म्हणतील ' दोन समदुक्ख्यांची एकाच वेळी सुटका झाली "

भिन्न किंवा परस्पर विरोधी क्षेत्रातील दोहोंच्या कार्यास 'सलाम ' !! 

No comments:

Post a Comment