Thursday 19 April 2012

देवा तुला शोधू कुठ ??

     उंच कळस त्यावर मानाने फडकणारा भगवा ,सडा-रांगोळी करून तोरणे बांधून पावित्र्य आणलेला परिसर, धुपाचा सुवास,शांतपणे किण किण वाजणारी घंटा,मंत्रांचे -वेदांचे अखंडित पठण, सुरु असलेले होम-यज्ञ ,नैवेद्याची तयारी ,सुवासिनींची लगबग ,विधिवत  होणाऱ्या पूजा ,मनापासून नमस्कार करणारा भक्त ,दक्षिणेकडे डोळा न ठेवता मनापासून आशीर्वाद आणि प्रसाद देणारे गुरुजी ,तुपाच्या समयीच्या मंद तेवणाऱ्या वातीच्या उजेडात दिसणारे  देवाचे लोभस  रूप अन हे पाहून अनुभवून चिंतेच्या आणि काळजीच्या काळोखी सागरावर उमटणारे भक्तीचे ,आशेचे आणि श्रद्धेचे तरंग ....हे सर्व समाधानाने पाहत असणारा भक्तांच्या भक्तीने श्रीमंत झालेला देव !! लहानपणी आजी/आई आपल्या मनाचे समाधान व्हावे म्हणून जे काल्पनिक आटपाट नगर तयार करायच्या त्या नगरातील मंदिर वाटतय न ? जसे आटपाट नगर शोधण्यात सर्व बालपण संपले तसेच या आटपाट नगरातील मंदिर शोधण्यात पुढचे सर्व आयुष्य संपेल काय अशी भीती आताशी वाटू लागली आहे ..देवाचा शोध घेण्य इतकी माझी पात्रता निश्चितच नाही कारण त्यासाठी लागणारे ज्ञान ,इंद्रियांवर लागणारे नियंत्रण, शट चक्रांवर मिळवलेला विजय ,जागृत कुंडलिनी , पाठांतर , षडरीपुंवर मिळवलेला विजय ,निस्सीम उपासना आणि त्याग यासारख्या ज्या  गोष्टी आवश्यक असतात त्या माझ्याजवळ किंवा माझ्या पिढीतील बहुतेक कोणाजवळही नाहीत पण मनास एक प्रश्न नेहमी पडतो कि समज देव असला तर तो कोठे असेल ? जागृत देवस्थानात देव खरच असतो का ? तेथे त्याचा जीव रमतो का ? चालू असलेले सर्व प्रकार त्याला सहन होतात का ? 
 "३३ कोटी रूपे तुझी ३३ कोटी नावे तुझी परी तू अज्ञात ....कोठे असशी तू आकाशी कुठल्या गावी कोठे वसशी कुण्या देवळात ..देवा ..देवा तुला शोधू कुठ ?? " 
             देवाने माणसाची निर्मिती केली कि माणसाने देवाची निर्मिती केली असा प्रश्न आता मनास पडू लागला आहे ..कारण अमिबा पासून कस्तुरबा पर्यंत आणि कस्तुरबा पासून ओबामा पर्यंत झालेला मानवाचा विकास आणि प्रवास उलगडणे एखाद्या वेळेस शक्य आहे पण देवा पासून बाबा /मामा पर्यंत झालेला ,चालू असलेला आणि चालूच राहणारा प्रवास कोणी उलगडू शकतो का ? आपल्या फायद्यासाठी माणूस ठराविक काळाने एखाद्या देवास किंवा माणसास जन्म घालत आहे आणि स्वघोषित अवतार म्हणवून घेण्यात समाधान मनात आहे ..सोन्याच्या मुर्त्या ,हिर्यांचे /पाचूंचे डोळे ,चांदीच्या गदा /शस्त्रे भांडी आणि पूजेचे साहित्य ,जरीची किंवा रेशमाची वस्त्रे ,उंची अत्तरे ,ए.सी ., मोठाले हलोजन दिवे , सेवकांची (?) रेलचेल , सामान्य माणसास रांग आणि महत्वाच्या व्यक्तीस पास ,बस म्हणून उतरल्यावर पोटासाठी चणे -फुटणे ,वडा पाव विकणाऱ्या फेरीवाल्याससुद्धा लाज वाटावी आणि पोटे पाहून अरे यांची भूक तरी किती असा प्रश्न पडायचाही अवसर न देता विविध स्कीम सांगणारी पुजारी मंडळी ,धर्मावर आणि धर्म ज्ञानावर किती पकड आहे याहून राजकारणात किती वचक आहे या निकषावर निवडून आलेले आणि अधर्माचे धर्माच्या नावावर टेंडर काढणारे विश्वस्त , १० रुपयांच्या आत खडीसाखर ,११-२१ अंगारा ,२१-५१ पेढा /नारळाचे बक्कल , ५१-१०१  अंगारा + पेढा ,५०१-१००१  देवाच्या अंगावरील फुल/हार, नारळ + पेढे + अंगारा + प्रसाद आणि १००१ च्या वर ठेवले तर साक्षात देवाचे दर्शन अशी प्रतवारी करून वागणारे आणि धर्मास विकणारे पुजारी ,देवासमोर ठेवलेले नारळ ,हार, खडीसाखर ,उदबत्ती मागच्या दाराने पुन्हा दुकानात विकायला पाठवणारे सेवक (?) , देवाच्या समोर उभे असताना देवा पेक्षा बाहेर ठेवलेल्या चपलेकडे जास्ती लक्ष असणारा सामान्य तर कोटी  रुपयांपर्यंत दान करून अब्जावधी रुपयांचे मला मिळावे म्हणून नवस बोलणारा आणि पूर्ण नाही झाला कि देवालाच दूषण देऊन पुढच्या मंदिराकडे सरकणारा श्रीमंत भक्त ...या सगळ्या गजबजाटात पैशाचे ,हिरे माणिक ,सोने -चांदी , नव रत्ने , श्रीमंती ,लाचारी ,अधर्म ,सर्वाचे दर्शन होते पण श्रद्धेचे आणि भक्तीचे दर्शन होतच नाही ..देव दर्शन घ्यायला आलेला भक्त देवासमोर माणसाने मांडलेला बटबटीत झगमगाट,ऐश्वर्य आणि श्रीमंती पाहून हरखून जातो आणि "देव दर्शन " घेतल्याचा बेगडी आनंदात बाहेर पडतो ..येथेच देवाचा ,भक्तीचा ,श्रद्धेचा ,धर्माचा पराभव होतो आणि देवाच्या नावाने दानवाचे कार्य करून मयसभा  चालवणाऱ्या मानवाचा विजय होतो ....
                         काही मंदिरांचे उत्पन्न पहिले कि माणूस किती दानशूर आहे याचा प्रत्यय येतो ..नुकताच सापडलेला पद्मनाभ स्वामी यांचा १००० कोटींचा खजिना ,८६ किलो सोने ७२३ किलो चांदी ६६८ हेक्टर जमीन २७ कोटीची गुंतवणूक आणि आणखी ५० किलो सोने रिजर्व बँकेत असणारी तुळजाभवानी ,बँकेत ७२९ कोटी रोज ५० लाख जमा व वार्षिक २५० कोटीचे बजेट असणारे साई बाबा ,वार्षिक ८ कोटी मिळवणारी सप्तशृंगी ,१२२ कोटीचा सिद्धिविनायक ,४० कोटींचा विठोबा ,३ कोटींचे अक्कलकोट स्वामी ,फ़क़्त रामनवमीला ५ कोटी ७३ लाख जमा होणारे आणि २०११ वर्षी १७०० कोटी उलाढाल असलेला बालाजी हे देवांचे आकडे तर त्यांचे अवतार म्हणवले जाणारे बुवा /बाबा कसे मागे असणार ? एकट्या सत्य साई बाबांची संपत्ती ९८ किलो सोने ,३४० किलो चांदी आणि ११.५६ कोटी रोकड अशी प्रचंड प्रमाणात आहे इतरांचीही याहून अधिक असेल ...अशी संपत्ती पहिली कि ब्राह्मण समाजास किती लुबाडतात पिळवणूक करतात अशी टीका ग्रेड नसलेल्या विचारसरणीचे आणि १० रुपयांची पुस्तके वाचून स्वतास ज्ञानी समजणारे आणि ब्राह्मण द्वेषाच्या दलदलीत आकंठ बुडालेले  "विचारवंत " करतच असतात पण आता कोणतेही मंदिर खाजगी मालमत्ता न राहता त्याची ट्रस्ट झाली आहे आणि लोकांचा ट्रस्ट मोडून त्यांना त्रस्त करणारे ट्रस्टी ब्राह्मण नसतातच ..शिर्डी संस्थानाच्या ट्रस्टी साठी चालू असलेला वाद सर्वाना माहित आहेच ..पण म्हणून गरज नसताना लघु/महा रुद्र ,शांत ,नागबळी इत्यादी विधी करायला लावणार्यांचे समर्थन करताच येणार नाही असो ! आणि हा सर्व पैसा खाल्ला जातो असे नाही त्याने अनेक समाजउपयोगी कार्ये केली जातात पण येणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा यात प्रचंड तफावत असते त्यामुळे एका हाताने घ्यावे आणि दुसऱ्या हाताने द्यावे या उच्च विचारस कोठेतरी छेद जातो....
                          धार्मिक कार्ये ,पूजा ,उत्सव ,धर्म प्रसार इत्यादी कारणासाठी पैसा हा लागतोच पण तो पैसा जेव्हा दिसायला लागतो तेव्हा एकंदरीत वातावरण बटबटीत होते ,वास्तु मधील पावित्र्य -मांगल्य लोप पावू लागते ...नक्की कशाचे दर्शन घ्यायचे असा प्रश्न भाविकांना पडू लागतो ..प्रत्येक जागृत देवस्थान मानवी वस्तीपासून दूर का होते या प्रश्नाची उकल होऊ लागते ..पण अखेर माणूसच तो ..देवास हुडकून काढून अखेर भक्तीचा ,धर्माचा आणि श्रद्धेचा बाजार मांडलाच ....
"भले बुरे जे दिसते भवती भले बुरे जे घडती भवती तिथे तुझा वास देवा तुला.....स्वछंदी तू स्वताचास का यथे रमसी सांग उगा का या बाजारात ..देवा तुला शोधू कुठ ?? "

No comments:

Post a Comment