Monday 30 April 2012

दिन महाराष्ट्र

"दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा " " जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा " " लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे " " सेवेच्या ठाई तत्पर .." " जय जय रघुवीर समर्थ " " ताटी उघडा ज्ञानेश्वरा " "आता विश्वात ..." " राकट देशा...." " खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंधड्या ..." " वेडात दौडले वीर मराठे " " काशिया त्यजू पदाला " पासून "भैरवी " पर्यंत नटलेला ,सजलेला आणि कृतकृत्य झालेला " महाराष्ट्र माझा " सह्याद्रीच्या कड्यांनी वेढलेला , देवगिरी पासून ते रायगडापर्यंत संरक्षणाचा अभेद्य कोट उभा करणारा, शोर्याच्या आणि त्यागाच्या गाथा सांगणारा , वीररसाने तृप्त करणाऱ्या शाहिरी ऐकणारा तर ढोलकीच्या थापेने आणि रमणीच्या नाचाने शृंगाररसात डोलणारा ,ज्ञानेश्वरांपासून ते समर्थ रामदास पर्यंत भक्तीची ,श्रद्धेची आणि उपासनेची शिकवण देणारा , आई महालक्ष्मी आणि तुळजाभवानी यांनी आशीर्वाद दिलेला ,विठोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि देवराष्ट्र म्हणून ख्याती पावलेला , तमाशाच्या फडात आणि कुस्तीच्या आखाड्यात सम तन्मयतेने रमलेला ,देवालांपासून ते गडकरी यांचे पर्यंत आणि दादासाहेब फाळके यांचेपासून मांजरेकरापर्यंत... माडगूळकरांपासून ते खरे पर्यंत ,दर्पण  पासून ते सकाळ /लोकसत्ता पर्यंत , खाशाबा जाधावांपासून ते चंद्रहार पाटला पर्यंत ,दुर्गा खोटे पासून माधुरी दीक्षित पर्यंत , फुले पासून रयत पर्यंत ,रमा रानडे पासून बाबा आमटे पर्यंत ,किर्लोस्करांपासून ते डी.एस .के पर्यंत ,आनंदी जोशींपासून तात्याराव लहाने पर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक विभागात अनेक नररत्ने प्रसवून आनंद घेणारा माझा महाराष्ट्र ! प्रत्येकाने हेवा वाटावा असा माझा महाराष्ट्र ! अश्या या माझ्या महाराष्ट्राचा आज निर्मिती दिवस ... प्रत्येक सुखाला एक दुखाची किनार असते ...कितीही प्रयत्न केला तरी तिला नजर अंदाज करता येत नाही ..शुभ दिनी कटू बोलू नये असा प्रघात आहे पण जर पाडव्याला आपण कडू निम्बाचे पान खाऊन समतोल साधतो तर इतर दिवशी तसे का करू नये ? 
             आज महाराष्ट्रदिनी एक सच्चा मराठी माणूस म्हणून मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमात दिनकर मारुतराव भोसले याला जो संवाद दिला होता तो मलाही म्हणावासा वाटतोय ...कवडीचीही किंमत नाही आज मराठी माणसास ,अटकेपार झेंडे लावले त्याचे आता दांडके उरलेत आणि ते आमच्याच ढुंगणावर वापरले जात आहेत ...साले आम्ही खेकडे ,आम्ही गांडूळ अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किमत आहे गांडूळ खताला मागणी आहे पण मराठी माणसाला किंमत नाही ...तुम्ही डाऊन मार्केट ...आता मराठी माणूस रोगा पेक्षा धसक्याने मारतोय ..धसका भूतकाळाचा ,वर्तमान काळाचा आणि भविष्याचाही ...शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती काय ? अरे आम्हाला सगळ्यांची भीती ..मराठी पाऊल पडते पुढे ...मराठी पाऊल पडतेच कोठे ? मुळात मराठी पाऊल उरलाच आहे कोठे ? माझ्या ५०० पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केलंय म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो ....लाज वाटते आता लाज वाटते या महाराष्ट्राची आणि आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या कणा नसलेल्या जनतेची , संकुचित विचारसरणीच्या राज्यकर्त्यांची आणि त्यांना निवडून देणाऱ्या लाचार मतदारांची ...लाज वाटते या महाराष्ट्रास महापुरुषांची भूमी म्हणायची ...लाज वाटते ....काहीच शकते गेली मध्ये ...काहीच पिढ्या गेल्या मध्ये अभिमानाने मिरवून ...काहीच लोक जगले ताठ मानेने आणि ताठ कण्याने ....आता कणा आहेच कोठे ? सह्याद्रीचाही कणा मोडून आमी त्यातून प्रवास करतोय माणसांचे काय घेऊन बसलाय ? माणसाचे सोडा देवांचेही आता अपहरण होऊ लागलय आणि त्याची खंत कोणासही नाही ...वीरगाव /कोठेवाडी सारख्या घटना राजरोज होत आहेत पण त्याची कोणास फिकीर नाही ...नक्षलवादी सरकारचे रोज लाज्जाहरण करत आहेत त्याची कोणास लाज नाही , चरायला चारा ,खायला भाकरी आणि पिण्यास पाण्याचा थेंब नाही त्याची कोणास फिकीर नाही ...पाण्यासाठी शेतकरी गोळ्या खातोय तर विजेचे प्रकल्प राजकीय विरोधाने अडकून पडत आहेत ..तयार झालेले प्रकल्प श्रेयावादाच्या भानगडीत नादुरुस्त होत आहेत ..न्यायलाच आता न्याय मागायची वेळ आली आहे ..समाजकारणी राजकारणात तळ्यात मळ्यात खेळत आहेत  मोघली दौरे बरे पण राजकारणी लोकांचे नकोत अशी सद्यस्थिती आहे ...लाचार नागरिक रोज मारतोय आणि पुन्हा उद्याची स्वप्ने पाहत जन्म घेतोय ... इतिहास हा वर्तमानकाळात बदलला जातोय..शिवाजी महाराजांनी आफ्जाल्यास मारले हे आता दबक्या आवाजाने बोलावे लागत आहे . जाती धर्माच्या नावाखाली धार्मिक द्वेष पसरवण्याचे उद्योग जोमाने चालू आहेत ...गुन्ह्याचे प्रमाण इतके वाढले आहे कि प्रत्येक गुन्हेगारास टकमक टोक दाखवायचे म्हंटले तर त्यांच्या कलेवराच्या धीगार्यापासून प्रती टकमक टोक तयार होईल ....भ्रष्टाचार इतका कि काही जिल्हे खणले तर १० सुरत विकत घेता येतील ...उद्योग परराज्यात जात आहेत आणि पर राज्यातील माणसे आपल्या राज्यात मार खाण्यासाठी येत आहेत ....कार्यक्रम /नाटक/चित्रपट सादर करण्यास सरकारची नाही तर राजकीय पक्षांची परवानगी घ्यावी लागत आहे ...अशा महाराष्ट्राचा दिन आपण साजरा करायचा का ?
                काही आशावाद निर्माण करणारे लोक आहेत पण तितके पुरेसे नाहीत ...एकमेकाच्या धर्मावर आणि जातीवर टीका करत स्वताला कट्टर सिद्ध करण्यास आसुसलेली तरुणाई ही खरी समस्या आहे ...आणि त्याला खतपाणी घालणारे राजकारणी ही महाराष्ट्राची कीड आहे ...काही होत नाही दासबोध /मनुस्मृती जाळून ,दादोजी /वाघ्या  याचे पुतळे हलवून किंवा ठराविक जातीच्या नावाने शिमगा करून ...उत्तम विचार हे जात ठरवत नसते तर ते संस्कार ठरवत असतात ..विघटनाच्या दिशेने आपले राज्य वेगाने वाटचाल करत आहे ..कधी सांस्कृतिक /ऐतिहासिक विषय तर कधी भौगोलिक समस्या ...कधी राजकीय भूकंप तर कधी भ्रष्टाचाराची सुनामी , कधी कुपोषण तर कधी (राजकीय /उद्योगपती लोकांचे ) अतिपोषण ,अजूनही चालू असलेले हुंडाबळी , संसार कसे टिकवायचे यापेक्षा ते कसे मोडायचे याचे उत्तम १०१ सल्ले देणाऱ्या मालिका आणि भलत्याच गोष्टींचा प्रसार करणारी प्रसार माध्यमे ... अत्यंत निराशाजनक चित्र सध्या महाराष्ट्रात आहे ... झाकले म्हणून झाकले जाण्या सारखे नाही आणि ठिगळ लावायला पुरेसे कापड नाही अशी गत आहे .... अशा परिस्थिती मध्ये मी तरी पूर्वजांचे गोडवे गात आणि वर्तमान झाकत कोडगेपणाने दिन साजरा करू शकत नाही .... कारण मी सामान्य माणूस आहे राजकीय पुढारी नाही ... माझ्या मतदारसंघातून माझा मुलगा /मुलगी कसा निवडून येईल ,साडूस नगरसेवक पद कसे मिळवून देता येईल ,मेहुणीस जिल्हा मध्यवर्ती बँक आंदण म्हणून कशी देता येईल आणि बायकोस एखादे बेट कसे भेट देता येईल इतके मोठे प्रश्न माझ्या समोर नाहीत ...माझ्या समोर माझ्या बुद्धीला झेपेल असा एकच प्रश्न आहे ... माझ्या मुलांना आपल्या महाराष्ट्रा बद्दल काय सांगायचे आणि त्यांनी महाराष्ट्रा बद्दल काय लिहायचे ?? 

1 comment: