Saturday 28 April 2012

"आहे ....सचिन आहे " !!


इतिहासाच्या पुस्तकावरची धूळ झटकली आणि थोडी पाने आठवायचा प्रयत्न केला की शाळेमध्ये कधीतरी नागरिक शास्त्र नावाचा विषय होळी साजरी करत पाठ केल्याचे आठवते ..मी शाळेतील "जोश्या " नसल्याने आणि आमच्या शाळेत कोणी केवडा नसल्याने  अभ्यासात चांगलेच लक्ष होते .. नागरिकशास्त्रात फार काही प्रगती झाली नसली तरी आमदारांची "विधानसभा " खासदारांची  " लोकसभा " आणि विशेष व्यक्तींची "राज्यसभा " असे कधीतरी कोठेतरी वाचल्याचे अंधुक अंधुक आठवते ....डॉक्टर झाल्यावर आणि मुलाचा /मुलीचा अभ्यास घेणे या अपरिहार्य  कारणाच्या मध्यंतरी पुन्हा शाळेची पुस्तके आठवायला लावल्याबद्दल सचिन रमेश तेंडूलकर याचे मनापासून आभार ... १० क्रमांकाच्या जर्सी पासून ते १० जनपथ पर्यंतचा प्रवास पार केल्याबद्दल विशेष कौतुक आणि कॉंग्रेस ने एका चेंडूतच ६ षटकार मारायचा भीमकाय पराक्रम केला याबद्दल त्यांचा सत्कार .... भारत रत्न ला बगल देऊन नवीन काटेरी मुकुट सचिन च्या डोक्यावर घालून त्याचा यथोचित सन्मान केल्या बद्दल मनापासून अभिनंदन ....
                               राजकारण आणि राजकारणी यांचे यश ते करत असलेल्या राजकारणात कधीच नसते  ते असते चालू विषयास छेद देऊन आपल्या सोयीचा आणि जनतेच्या आवडीचा विषय येन केन प्रकारे चर्चेस आणून  मागचा विषय विसरायला लावायचा ....सध्या भ्रष्टाचार या मुद्द्यावरून कॉंग्रेस त्रिफळाबाद होत असताना ,अण्णा आणि रामदेव यांची युती होऊन त्यांच्या आराखड्यानुसार एक भव्य आंदोलन उभे राहण्याच्या मार्गावर असताना ,जनता सरकार -दुष्काळ -भ्रष्टाचार-महागाई यावर पंडितासम मते मांडत असताना ,त्याचाच आजचा सवाल करून प्रसार माध्यमे आपणास समाजाची किती काळजी आहे हे दाखवत असताना सरकार ने सचिन ला राज्यसभेची उमेदवारी देऊन सर्व चित्र अचानक बदलून टाकले...आता सामान्य जनता पुन्हा सचिन चे गोडवे पुन्हा गाण्यात किंवा त्याने खासदारकी घ्यावी किंवा घेऊ नये यावर चर्चा करण्यात ,प्रसारमाध्यमे त्या चर्चेस फोडणी घालण्यात आणि काँग्रेसी "कसे (पुन्हा एकदा ) गंडवले म्हणून आनंद साजरा करण्यात व्यस्त झाले आहे ..या चर्चेत एक आठवडा सहज जाईल आणि स्वीडन चे माजी संरक्षण मंत्री स्टेनफोर्ड यांनी बोफोर्स चा पुन्हा उकरून काढलेला मुद्दा तोपार्येंत शिळा झाला असेल ....राजकारण असो वा क्रिकेट यात टायमिंग ला अनन्य साधारण महत्व आहे ... विरोधी गोलंदाजाने तेज तरार योर्कर टाकावा आणि फलंदाजाने आरामात पाय बाहेर काढून जोरदार फटका मारून "टाकशील का परत ?" अशा नजरेने गोलंदाजाकडे पाहून त्याची हवा टाइट करावी यासाठी कोणत्या वेळी कोणता चेंडू पडणार आहे याचा विचार करून ,आपला पवित्रा बदलून ,पकड आणि पायाच्या हालचाली नियंत्रित करून सामोरे जाणे फार महत्वाचे असते आणि यात थोडी जरी चूक झाली तर त्रिफळा उडणे हे निश्चित असते ...
                                सचिन नक्की काय करणार असा प्रश्न मनास पडायचे काहीच कारण नाही कारण या अधिच्यानी फार काही "करून दाखवलंय" अशातला काही भाग नाही ...राज्यसभा हे खरेतर विविध क्षेत्रामधील मान्यवर व्यक्तींसाठी निर्माण केलेली सभा आहे जेथे निवडणुका आणि त्याच्या अनुशंघाने येणारी हीन दर्जाची वैयक्तिक चिखलफेक करणाऱ्या निवडणुका टाळून गुणी व्यक्तींना आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो ..पण सध्या या सभेत आर्थिक दृष्ट्या मजबूत असणार्या आणि केलेल्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वृत्तीपलीकडे काही आशादायक चित्र आहे असे मला तरी वाटत नाही ..२५० सदस्यांपैकी १२ सदस्य राष्ट्रपतींच्या कोट्याने निवडले जातात ...आता सचिन राज्यसभेचे नियम ,घटना ,कायदे ,इतिहास या सर्वांचा गृहपाठ करेल ,प्रचंड मोठ्या वाचनालयात बसून टिप्पणे काढेल आणि मग राज्यसभेत एक सुंदर आणि विचारपूर्वक भाषण झोडेल कि ते राज्यसभेच्या इतिहासात क्रिकेट च्या चेंडू ने लिहिले जाईल अशी अपेक्षा करणे चूक आहे ..किंवा तसे अपेक्षितही नाही आहे ... आजपर्यंत काही अपवाद सोडले (एका हाताची मोजायची बोटे ५ ती सामन्यांसाठी आता कॉंग्रेस ६ वे  बोट उत्पन्न करून त्याला अंगठी केली म्हणून पैसे खायलाही कमी करणार नाही हा भाग अलाहिदा तर त्या बोटांमधील २-४ राखून ठेवावी इतके कमी सदस्य ) तर कोणी फार मोठे कार्य केले आहे असे माझ्या तरी ऐकिवात नाही ....त्यामुळे सचिन ने काय करावे .खासदारकी नाकारावी का घ्यावी ,तो तिकडे जाऊन काय करणार ? निवृत्ती नंतर घेता आली नसती का ? अशा प्रश्नावर विचार करण्यात वेळ न घालवता तो काहीच करणार नाही आहे याची मनास खुणगाठ बांधून घ्या ..कारण राजकारण हे त्याचे क्षेत्र न्हवे आणि तो राजकारणासाठी नाही तर मानसिक पाठीम्ब्यासाठी खासदार होतोय ....कारण समोरचा संघ कितीही तगडा असला , गोलंदाज कितीही खतरनाक असले ,खेळपट्टी कितीही भयंकर असली ,जबाबदारीचे ओझे कितीही जड असले ,समोरील  आव्हान कितीही अशक्यप्राय कोटी मधील असले तरी मनात एक विश्वास असतो ..... "आहे ....सचिन आहे " !!

No comments:

Post a Comment