Saturday 15 December 2012

त्रिफळा ...

माझे उनाड बालपण  दोन गोष्टीनी व्यापून टाकले होते . एक फळा आणि दुसरा त्रिफळा . एक घरच्यांनी ,समाजानी माझ्यावर लादलेला तर दुसरा मी स्वतः स्वीकारलेला . मैदान खेळाचे असो वा अभ्यासाचे दोन्ही ठिकाणी " त्रिफळा " उडू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागायची . अर्थात त्रिफळा म्हणजे काय याची जाण असायचे ते वयच नवते पण  मार खायची व्यवस्थित शारीरिक आणि मानसिक तयारी करून घरी "प्रगतिपुस्तक " दाखवताना वादळा पूर्वीच्या शांततेत आणि हात-पट्टी-पट्टा -काठी किंवा प्रसंगी हाती सापडेल ते साधन माझ्या नाजूक अंगावर आदळायच्या  आधी " काय ? यंदा पण उडला का त्रिफळा " हे शब्द कानावर  आदळायचे. बाबांच्या मांडीवर बसून क्रिकेट सामना बघत असताना त्यांना आपल्या खेळाडूचा त्रिफळा उडल्यावर होणारे दुक्ख आणि प्रतिस्पर्धी खेळाडूचा उडल्यावर होणारा आनंद ....सामना  खेळायला  गेल्यावर  फलंदाजाचा त्रिफळा उडवण्यासाठी  केलेले प्रयत्न ...म्हणजे रबरी चेंडूवर थुंकी लाऊन अर्ध्या चड्डीच्या कोणत्यातरी कोपऱ्यावर रगडल्याने त्रिफळा उडतो का ? पण जर "वानखेडे " वर उडू शकतो तर येथे का नाही ?? हि बाल मानसिकता असो ... पुढे मित्रांच्या तोंडून अरे यार तिने "बोल्डच  " केले मला ...अशा एकंदरीत प्रसंगातून त्रिफळा हा माणसाच्या यश -अपयश , अस्तित्व , ओळख , प्राक्तन आणि जीवनशैली  यांच्याशी निगडीत असतो अशी मानसिकता तयार झाली ... आणि त्रिफळा हा वैगुण्य ,कमतरता ,दुर्दैव यासारख्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीचा प्रतिक बनला .....

                                           मी जर शाळेत शिक्षक असतो आणि मुलांना विचारले असते कि " मुलानो , कमतरता ,दुर्दैव आणि निराशा यांना एकत्रित करून काही उदाहरण देऊ शकता का ?? " इतर वेळी बर्गर गिळून गप बसलेली कार्टी एका सुरत किरटली असती .. " सर , सचिन तेंडूलकर " ..... इतिहास असो वा मानवी स्वभाव चांगल्याच्या कौतुकापेक्षा वाईटाची चर्चा करणे आपल्याला अधिक पटते ,रुचते आणि परवडते . एखादी महान व्यक्ती महान कशी नाही हे सिद्ध करण्यात आपल्या अनेक पिढ्या खर्ची पडतात . परंतु ती व्यक्ती महान का झाली याचा अभ्यास करून येणाऱ्या पिढ्यात ते गुण  संक्रमित करायची ,वाढवायची तसदी अर्धी पिढीही घेत नाही . यामुळेच की काय साहेबांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नाही . साहेब मग तो गोरा असो वा गोरे (पांढरे ) कपडे घातलेला आपल्यातीलच कोणी .आज सकाळी जेव्हा सकाळ (पुणे आवृत्ती ) उघडला तर मुखपृष्ठा वर सचिनचा काल (ता . १४-१२-२०१२)उडलेल्या  " त्रिफळा "चे छायाचित्र , कारकिर्दीत उडलेल्या त्रिफळ्याची संख्या , पैकी जेम्स ने  उडवलेले त्रिफळे याची यादीच आहे . वीरेंद्र सेहवाग चा त्रिफळा उडाला याची कोणाला दखलही घ्यावी वाटली नाही . अर्थात राग सकाळ वृत्तपत्रावर नाही तर भारतीय मानसिकतेवर आहे . एखाद्या खेळाडूने निवृत्ती कधी घ्यावी हे ठरवणारी प्रसारमाध्यमे कोण ? सत्याची जाणीव करून देणे हे प्रसार माध्यमांचे स्तुत्य काम ..पण आपले सत्य लोकांच्या आणि खेळाडूंच्या मनावर थोपवणे आणि आमची बातमी किती खरी किंवा आमच्या बातमीचा परिणाम अशा प्रसिद्धीपिपासू वृत्तीने चालवली जाणारी चर्चासत्रे , त्यातील मोजकेच मान्यवर बाकीचे उठावळे आणि पाणके आणि त्यांच्या "मतावर " ३० ते ६० मिनिटात ठरवले जाणारे खेळाडूचे भविष्य हा प्रकारच हास्यास्पद आहे . त्रिफळा उडाला म्हणून त्याच्या footwork मध्ये कमतरता मान्य , वाढत्या वयाचा परिणाम मान्य , शरीर साथ देत नाही एकदम मान्य पण म्हणून त्याने तडका फडकी निवृत्ती घ्यावी हे अमान्य . क्रिकेट असो वा आयुष्य यात टायमिंग ला अतोनात महत्व आहे . एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यावर सचिन ने किमान एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घ्यायला हवी होती पण त्याचे टायमिंग चुकले . कारण प्रत्येक खेळाडू चे " यशस्वी सन्यास " हे स्वप्न असते ... अनेक महान खेळाडूंच्या यशस्वी कसोटी कारकीर्दीचा शेवट अयशस्वीच झाला आहे . मग ते डॉन असो वा पोंटिंग  . अनेक विक्रम केलेल्या सचिन ला जर हा विक्रम मोडायचा असेल तर त्याला संधी द्यायला काय हरकत ??
                                           खेळाडू पेक्षा खेळ महत्वाचा हे मान्य ... हाच नियम इतर खेळाडूंसाठी का लागू होत नाही ? केवळ क्रिकेट हा आपला एकमेव खेळ आहे का ? सायना असो वा अडवाणी ...बिंद्रा असो वा मेरी कोम अनेक ठिकाणी विक्रम करत असलेल्या या खेळाडूंसाठी सरकारचे धोरण , उपाय योजना आणि या खेळाडूंचे तसेच खेळाचे भविष्य यावर कोणालाही आणि कोणत्याही प्रसार माध्यमाला चर्चा का करावीशी वाटत नाही ? साहेब देशातील सोने घेऊन गेले पण जाताना क्रिकेट रुपी धुराडे मागे ठेऊन गेले . अनेकांचे आयुष्य ,संसार ,टी .आर .पी . या धुराड्या वर चालू आहेत ...आणि जेव्हा इंधन म्हणून सचिन ची निवृत्ती वापरले जाईल तेव्हा ते अधिकच जोमाने पेटते .. पण भारतीय संकुचित मनोवृत्तीचा , तद्दन विकसित पणाचा , अधून मधून उफाळून येणाऱ्या कलात्मकतेचा आणि  अभिमानाचा त्रिफळा भानू अथय्या यांनी उडवला आहे . आता हि भानू कोण ? आणि मधेच कशी काय आली ? सचिन ची निवृत्ती हा आता राष्ट्रीय प्रश्न आहे तो प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने चर्चिला पाहिजे तरच तुमचे "भारतीयत्व " सिद्ध होईल अशा वातावरणात ....१९८३  साली लॉर्ड अटन्बारो यांच्या "गांधी " सिनेमासाठी भारताला प्रथम ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार  भानू अथय्या यांनी ऑस्कर परत केला आहे .... कारण " आपल्या देशातील अनेक मूल्यवान वस्तूंबाबत आपण कमालीचे उदासीन असतो .अशा मौल्यवान  वस्तूंची किंमत आपल्या लेखी शून्य आहे " ( संदर्भ महाराष्ट्र टाइम्स ता १५ -१२-१२ पृष्ठ १० पुणे आवृत्ती ) अगदी बरोबर .. तुम्ही ऑस्कर परत करा किंवा टागोरांचा नोबेल चोरीला जाऊदेत ..ठेवायला जागा नाहीत इतके ऑस्कर ,नोबेल आणि ऑलिम्पिक पदके आहेत आमच्या कडे ....एक दोन गेली , गहाळ झाली तर फरक नाही पडत ...आमच्या दृष्टीने मौल्यवान गोष्ट म्हणजे सचिन ...आणि त्याचा उडलेला त्रिफळा .... इतर अनेक क्षेत्रातील त्रिफळे आम्हाला  पचतील मान्य होतील पण सचिन चा त्रिफळा आम्हास कदापि मान्य नाही . कारण सचिन आमचा देव आहे ...आणि देव कधी त्रिफळाबाद होत नाही ....

No comments:

Post a Comment