Saturday 1 December 2012

सायकल....


 रस्त्यावरून तुफान वेगाने गाडी चालवत असताना वाटेत कोणी सायकलवाला आला की चाकांची गती कमी होऊन अचानक जिभेची गती वाढते . सायकलस्वार वयस्कर असेल तर  इज्जतीत इज्जत काढणे आणि समवयस्कर ,त्यातल्या त्यात पेंद्या असेल तर ठेवणीतले शब्द बाहेर काढून त्याच्या कानाखाली शाब्दिक ठेऊन देणे नेहमिचेच ....हे नियम  उन्हाने  रापलेल्या मजबूत दंडावर ताईत बांधलेल्या ,घनदाट केसात ओतलेले  एक वाटी तेल ओघळून जाडजूड कल्ले आणि  मिशांच्या आकड्यापर्यंत येणाऱ्या ,पान चघळत ,केरेज वर फावडे किंवा चमकणारी कुऱ्हाड लाऊन रस्त्याच्या मधोमध मुजोरीने मजुरीसाठी  जात असलेल्या सायकलवाल्याला लागू होत नाहीत . यड लागलय काय राव ?? त्याला थांबवले तर आधी त्याची भेदक नजर पाहून पसार झालेली हिम्मत एकत्र करून काही बोलेपर्यंत त्याच्या तोंडून आजपर्यंत कधीही न ऐकलेले शब्द कानावर आदळतात .... त्याचा अर्थ कळेपर्यंत ओळखीचा एक (अप )शब्द तोंडावर आणि लालभडक पिचकारी जमिनीवर मारून तो पुढे गेलेला असतो ...जाऊदेरे  गडबड होती म्हणून सोडला ...नाहीतर आज कापलाच असता ... ( ब आणि भ ची बाराखडी ) .... हा प्रसंग शहरात राहणाऱ्या लोकांना खूप कमी वेळा आला असेल पण ....विचार करा .. ऑफिस (एकदाचे ) सुटलंय .. घरी जायची गडबड आहे .. समोर १२० सेकंदांचा सिग्नल पडायची वाट पाहतोय .. ५..४..३..२ अरे सुटलो ..अचानक एक सायकलवाला "कट " मारून पुढे जातो आणि .....पोलिसाच्या ढेरीहून थोडासा लहान लाल दिवा कशी मजा झाली म्हणून तुमच्याकडे पाहून हसत असतो .... अशावेळी काय विचार येतात डोक्यात ?? चा मारी एक फालतू सायकलवाला मला कट मारतो ?मला ?? लायकी आहे का त्याची ? साल्यांना बोंबलत फिरण्याशिवाय काही काम असते का ? एखादी ऑडी पुढे गेली असती चालले असते पण सायकल ???

                   सायकल .....आता "नकोशी " असणारी सायकल कधीकाळी किती "हवीशी " होती ... लहान असताना पायाने ढकलत पुढे नेत असलेली सायकल , शाळेत ३ चाकी सायकल स्पर्धा जिंकल्यावर मिरवणारे आपण .... मोठी सायकल शिकतानाची धडपड , फुटलेले गुडघे आणि खरचटलेली कोपरं , सीटवर बसून पायडल मारण्याचे अयशस्वी प्रयत्न आणि अखेर नळीतून  मधून पाय घालून कोपर सीट वर टेकवून सायकल चालवल्याचे मिळवलेले समाधान ....मला आता येते सायकल चालवायला लहान नाही मी ..मला मोठीच हवी सायकल ..म्हणून रुसून मिळवलेली नवी कोरी सायकल ...तिचे चकाकणारे फोक्स , ट्रिंग ट्रिंग वाजणारी घंटी , अनेक दिवस जपून ठेवलेला सायकलीवरचा कागद ,चिमुकल्या हातानी  सर्व ताकद लाऊन सर्फ ने घासलेली सायकल आणि अक्खा  डबा संपवला म्हणून आईचा खाल्लेला धपाटा .... आठवतोय ?? आज गाडीनेही लांब वाटणारी अंतरे  सायकलवरून हाश हुष न होता पार व्हायची ... स्टंप म्हणून माझी सायकल लावणार नाही म्हणून भांडणे व्हायची ... गेअर च्या सायकलीचा कसा रुबाब असायचा ??  त्यात जो जिता वही सिकंदर ज्यांनी पाहिला होता ते सायकल साधी असली तरी खाली वाकून गेअर टाकल्याचे नाटक करायचे आणि कुतुन कुतून सायकल मारायचे ....
                         मुल्यशिक्षणा पासून नागरिकशस्त्र पर्यंत सर्व वह्या पुस्तकांनी भरलेले पोते पाठीवर घेऊन अर्ध्या चड्डीतील होतकरू विद्यार्थी काय धावपळ करायचे ... आताच्या मुलांच्या नशिबात जे सुरुवातीपासून रिक्षा -चार चाकी गाड्यातून  शाळेला शिकवणीला (क्लास ) जायचे भाग्य आहे ते माझ्या नशिबी केवळ १०वी आणि १२वी अंतिम परीक्षेत आले . . मुलाचे पाय दुखतात ,उन फारच असते , काय प्रदूषण झालंय व्हायरल इन्फेक्शन झाले तर ? अशा फाजील काळजीला माझ्या घरी अजूनही स्थान नाही ..त्यामुळे माझी सायकल माझे विश्व होते ...जपलेले , सांभाळलेले ...अमावास्येला  मिरची-लिंबू जितक्या हक्काने बांधले त्याहून अधिक लाथा कोणाचातरी राग आल्यावर सायकलला मारल्या ... पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात मागचे चाक फिरवून अनेकदा कारंजे तयार केले तर माझ्यात भरपूर शक्ती आली आहे आता बस झाला तो पोळीचा लाडू हे आईला पटवून देण्यासाठी अनेकदा ती उचलूनही झाली ...अगदी १२वी पर्यंत मनसोक्त सायकल वापरली ..पळवली ... पण गाडी घेतल्यापासून ती अडगळीत  पडली ...
                          कधीकाळी चकाचक असलेली रिम आता धुळीने माखली आहे , फोक्स गंजून गेले आहेत .... सीटवर अनेक पक्ष्यांनी शिट केली आहे ..कोळ्याची कोष्टके  सहन करत घराच्या एका कोपऱ्यात पडली आहे .. आमच्या आठवणी आठवत....फुस्स झालेल्या टयूब  मध्ये मी हवा भरून पुन्हा घराबाहेर काढीन याची वाट पाहत ..मधल्या कितेक वर्षात शहर किती बदलले असेल याचा विचार करत ...आजच सकाळी तिला पहिले ..वाटले पुन्हा तिला वापरात आणावे ....पण आता लवकरच नवीन वाहन खरेदी होणार आहे मग हिला वापरायला होईल का ? बघू पुढच्या सुट्टीत ....म्हणून विचार रहित केला .... पण  पुढच्या सुट्टी पर्यंत तीची अवस्था काय होईल ? वापरण्यायोग्य असेल ? नसली तर भंगारात घालायची ...कोणत्या जगात आहेस भाऊ ? इथे माणसांचा कोणी इतका विचार करत नाही ... त्यांचे प्रेम ,विश्वास ,भावना , नात्यातील जवळीक काम झाले की  भंगारात काढतात .आठवणीही कोणी जपत नाही ...म्हणे अडगळ होते आणि आयुष्यात पुढे जाता येत नाही ...अरे माणसाचे आयुष्य जर भंगाराच्या काट्यावर उभे राहू शकते तर ही तर फ़क़्त  सायकल ....फालतू ,बोंबलत फिरणाऱ्या लोकांची .....

No comments:

Post a Comment