Saturday 22 December 2012

सातच्या आत घरात ?

 " काय आताच्या मुली ? काय ते कपडे ? केसाला तेल नाही , वेणी नाही झिंझ्या उडवत हिंडायचे ....वेळेचे भान नाही बापाचा धाक नाही . धाक ठेवायला बाप घरात आहे कोठे ? आणि पोरगी काय उद्योग करते ते बघायला आई घरी आहे कोठे ??  पैसे पैसे  करत संसाराच्याकडे दुर्लक्ष ..... मुलीनी कसे दिवे लागणीच्या वेळी घरी असावे ....  आम्ही लहान असताना खूप मजा केली पण सात च्या आत घरात ....पण आताच्या मुली ?? सात नंतर घरा  बाहेर ..... "  एक सत्तरीची फळविक्रेती बाजूच्या बाईला  ओरडून सांगत होती .... माझी खरेदी झाली होती पण दिल्ली सामुहिक बलात्काराचे परिणाम किती खोलवर झाले आहेत  हे ऐकून घ्यायला थांबलो होतो ... आपले कोणीतरी ऐकून घेते आहे हे बघून म्हातारीला चेव चढला ... मलाही सामाऊन घेत म्हणाली " दादा आता तुमीच सांगा ..... तुमची नजर कोणावर जाते ?? साडीतील बाई वर की ओढणीचा ड्रेस शिवलेल्या टवळी वर ?? " अरे बापरे .... तो अर्णब  किंवा निखिल वागळे पण इतका " स्पष्ट " प्रश्न विचारत नाही . बर उत्तर काय देणार ?? साडीतील असो वा तोडक्या कपड्यातील "स्त्री " वर नजर जाणे वाईटच न ? मी स्त्रियांकडे बघतच नाही म्हणजे नकळत दिलेला वेगळा संदेश आणि हो अमुक अमुक वेशातील स्त्री कडे पाहतो सांगणे म्हणजे  निर्लज्जपणे आपणच आपल्या संस्कारांचा ,मुल्यांचा केलेला बलात्कार आणि " बघा आताच्या मुलांना काही लाजच राहिली नाही .... " असे त्या म्हातारीला पुरवलेले मोफत इंधन . त्यामुळे प्रसंगावधान राखून फोन आल्याचे नाटक केले आणि सटकलो .....
                                     त्यांची पुढे चर्चा काय झाली, अंतिम निष्कर्ष काय  निघाला आणि  आणखी किती दादांना  तिने " बोल्ड " केले  याची उत्सुकता मनात कायम होती . त्याहून अधिक एक शल्य मनात बोचत होते ते म्हणजे स्त्रियांवरील अत्याचारांना स्त्रियांनाच जबाबदार धरायची आपल्या समाजाची मानसिकता . त्याची तुझ्यावर नजर का गेली ? कारण तू  त्याच्या नजरेत भरलीस , त्याने तुझा हात का पकडला ? कारण तू त्याला आवडलीस , त्याने शिट्टी का मारली ? कारण तू टंच कपडे घातलेस ...आम्हीही शिकलो आम्हाला नाही मारली कोणी शिट्टी , त्याने छेड काढली ? तूच पहिले असशील कधीतरी त्याच्याकडे म्हणूनच हिम्मत झाली त्याची , तू हसलीस ,तू बोललीस , तू ओळख वाढवलीस , तू प्रतिसाद दिलास , तू कमी कपडे घातलेस तू हे केलेस तू ते केलेस म्हणून त्याने असे केले .... तुझ्यावर बलात्कार झाला ? सांगितले होते कोणी अर्ध्या रात्री हिंडायला ? लाज सोडून हिंडायचे मग लाज जाणारच .....आठवा ... तुमच्या घरात , सोसायटीत , कट्ट्यावर , ओळखीच्या घरात ,किंवा समाजात वावरत असताना एकदा न एकदा तुम्ही नक्कीच या वाक्यांना सामोरे गेला असाल , क्वचित यासम वाक्यांचा प्रयोगही केला असेल ...कारण एकदा  शारीरिक अत्याचार झाल्यावर पुढे आयुष्यभर मानसिक अत्याचार करण्यात आपण माहीर असतो . तिच्यावर कोणती वेळ आली आहे याचा विचार न करता " सात " ची वेळ दाखवण्यात आपण तत्पर असतो ....
                                         तिने कोणा कोणापासून स्वतःला जपायचे ? टपरीवर बसलेला पक्या ? बस मधला चालक -वाहक ? कॉलेज  मधील त्याच्या  पासून ? की कॉलेज मध्ये  नसूनही पाठलाग करणाऱ्या उनाडांपासून ? वर्गातील मास्तरापासून की  प्यून पासून ? खाकी वेशातील पोलिसापासून की खादीतील नेत्या पासून ? स्वतःच्या भावा पासून की जन्मदात्या बापा पासून ?ओरबाडायला टपलेल्या समाजापासून की काही पैशासाठी अमुल्य अब्रू विकणाऱ्या आई पासून ? कोणापासून जपायचे ..... ? आणि कोणत्या वयापर्यंत ? ४-५ वर्षापासून ते ७०-७५ वर्षापर्यंतच्या सर्वच महिलांनी आपली अब्रू वाचवायला धडपडायचे ? काही आकडेवारी देतो National Crime Records Bureau data for 2011 नुसार २०११  साली  नोंद  झालेल्या २२,५४९  घटनात पालक किंवा  जवळचे मित्र  यांचा सहभाग १.२% ( २६७/२२,५४९ ) ,शेजारी ३४.७ % ( ७८३५ /२२,५४९ ) , नातेवाईक ६.९% (१,५६० /२२,५४९ ) . आता यावर विचार केला पाहिजे कि तिने विश्वास ठेवायचा कोणावर ? आता " विश्वास "म्हणजे पण "पुल्लिंगी " शब्द .....कधी दगा देईल सांगता येत नाही . अशा वेळी करायचे काय ? सात चे बंधन येथे कसे लावायचे ? कि नवीन कायदा करायचा ( तसेही आपल्या देशात सध्या अतर्क्य कायदे संमत करून घेण्याचे सत्रच सुरु आहे ..त्यात आणखी एकाची भर ) की  कोणत्याही स्त्रीला संध्याकाळी ७ नंतर भेटू नये , तिला बाहेर घेऊन जाऊ नये ..तसे करताना कोणी आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल ...करायचे ? बंधने हि तिच्या पाचवीला पुजलेली आहेत .... तुला कोणी चुकीचे समजू नये म्हणून किंवा तुझ्यासोबत कोणी काही चुकीचे करू नये म्हणून बंधन हे महत्वाचे ....
                                            पण त्याचे काय ?? " पाखरू आलय नवीन ओढ फडात किंवा वाड्यावर " पासून " दिल सांड हो तो हर औरत भैस दिखाई देती है मेरी जान  " इथ पर्यंतचा स्वैर आणि स्वैराचारी प्रवास विसरून जायचा का ? क्वचित प्रसंगी तिचे मन पाहणारा आणि दाखवणारा आपला समाज ,चित्रपट , आपण स्वतः आपली मानसिकता कधी बदलणार ? लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी अजून किती पाशवी प्रकार करणार ? " दिल्ली मध्ये झालेल्या घटनेतून सुद्धा पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मिडिया ने दिसेल त्या बाईला  " स्त्री म्हणून कसे वाटते ? " विचारून मगरीचे अश्रू काढण्या पेक्षा त्या  लोखंडी सळीची केवळ कल्पना करून पहावी ..कसे वाटते ते कोणाला विचारायची गरज नाही भासणार . आपली , आपल्या मानसिकतेची , लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची एक विकृत मानसिकता आहे कि एक घटना झाल्यापासून दुसरी होई  पर्यंत आपण निद्रिस्त असतो .झालेल्या घटनेतून धडा न घेता केवळ उसासे टाकत बसतो . गुवाहाटी येथे झालेल्या घटने नंतर काही कडक पावले उचलली असती तर इतका भयंकर प्रकार आता झाला असता का ? पण झाला ... एक दिवस राष्ट्रीय प्रश्न झालेली पिडीत मोदी यांच्या विजया नंतर  गायब झाली ...काही दिवसांनी सचिनची निवृत्ती पुन्हा उचल खील आणखी काहीतरी होईल आणि ती पिडीत विस्मृतीत जाईल ...फेसबुक वर काळे ठिपके लाऊन , काही मेणबत्त्या  पेटवून , मोर्चात नाममात्र सहभाग नोंदवून आपण आपले आणि राजकीय लोकांनी नेहमी प्रमाणे  देऊन आपले कर्तव्य पार पडलेच आहे ....
                                               या पिडीतेचे पुढे काय होईल , तिचे पुनर्वसन होईल का ? , मानसिक आघातातून ती सावरेल का , समाज तिला स्वीकारेल का ? फाशी हे बलात्काराचे उत्तर आहे का ? कि मानसिकता सुधारण्यास काही करावे लागेल ? शिक्षेने कदाचित प्रकार कमी होतील पण थांबतील का ? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न  डोळ्यासमोर नाचत आहेत आणि त्याहून अस्वस्थ करत आहे ती स्त्रियांची आपल्या मनातील खालावलेली प्रतिमा ज्यांनी सात च्या आत घरात पहिला असेल त्यांना एक वाक्य नक्कीच आठवत असेल कि " साहेब माझी चूक फ़क़्त इतकीच झाली कि झाकण सारलेल्या भांड्यावर माझी नजर गेली " .... आपल्या चुकीचे याहून निर्लज्ज समर्थन काय असू शकते ??  पण काय करू शकतो आपण ?? स्त्रियांवरील अत्याचाराला स्त्री जबाबदार नसते इतकी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आली तर " मग कोण जबाबदार असतो ? " यावर विचार करायला वेळ मिळेल आणि " सात च्या आत घरात " या मानसिकतेतून आपली  सुटका होईल ....
                                        
 data  ref - the hindu - executing the neighbour                  

1 comment:

  1. ankur

    yaa madhe sagataat be jabaaba dara aahe aajachi tarun pidhi. malaa he many aahe ki jagaa varovar rahele pahije. pan tyachaa varo bar aapalyaa saankrutik jabaabdarichi jani nako kaa podhilaa?

    adhunikatechaa navaa khali je hidis prakaar mi roj sakal sadhyakal jogging trak , ani parak madhe baghato tyalaa kon thabavanar. tya phalvalaa aajii kahi khote bolalayaa nahit.tumhi sagaa naa KI tumhi konaa kade baghala? purn veshatalaa stri kadhe ki mini skirt ghatalelaa muli kadhe.
    control ha dohani bajun havaa. fakt mulani aapale vichar badalale tari kahi honaaar nahi.

    swatantra sagalanaach dile pahije pan tya chaa kiti fayadaa ghaychaa te aapn taravale pahije.

    mazya ghari dekhil malaa aai vadilani purn taravaani dili aahe daru payalaa pan yacha arth aasa anhi hot ki mi roj talli hovun ghari yevu.

    ReplyDelete