Saturday 8 December 2012

मास मधला क्लास



ए  तो पोपटी  शर्ट  घातलेला माणूस बघ ..काय पोपट दिसतोय ..हाहा !! काय तेल लावलंय त्या बाईने ?  इतके तेल जर गावातल्या प्रत्येक बाईने लावले तर लवकरच "तेलयुद्ध " भडकेल ..हा हा !! निळी  जीन्स घातलेली ती मुलगी वर गोविंदा पिवळा टी शर्ट आणि यात कमी म्हणून कि काय करकचून बांधलेल्या वेणीत माळलेला अबोलीचा गजरा ...वा .... !! " अर  त्या *** बंड्याने ५०० रुपये बुडवल माझ ...त्याच्या आईच्या *** ..घावूदेत एक डाव ..आयची आण  भोसकतोच रा**च्याला " समज खरच भोसकले तर रक्ताची चिळकांडी किती लांब उडेल हे दाखवायला म्हणून कि काय पानाने भरलेल्या  तोंडातून दूरवर  टाकलेली लालभडक पिंक .....EWWW ....सायकलवरून फाटक धोतर सांभाळत आलेला मामा ,कासऱ्याने सजवलेल्या गाडीवरून गळ्यात  सोन्यासारख्या दिसणाऱ्या ४-५ चेन आणि हातात ७-८ अंगठ्या घालून आलेला तात्या , कट्ट्यावर अडकित्त्याने सुपारी फोडत बसलेला अण्णा , केसाच्या कोंबड्या वर सिगारेट चा धूर जाईल याची काळजी घेत फुकणारा पक्या , बसायला जागा नाही म्हणून पोरा टोरांसह जमिनीवर फतकुल मारून बसलेली अक्का ,केळ आणि पेरू खायची सोडा पुन्हा पहायची सुद्धा इच्छा होऊ नये अशा विलक्षण पद्धतीने खाणारी कार्टी .... हाताने काही गोष्टींची सफाई केल्यावर हातालाही सफाईची गरज असते हे विसरून माल विकणारा सरबतवाला आणि भडंग वाला .....या सर्वाचे निरीक्षण करत एका कोपऱ्यात उभा राहून त्यांच्या अवतारावरून त्यांच्या नावाची आणि एकंदरीत आर्थिक -सामाजिक -वैचारिक स्थितीची तलाश करायचा प्रयत्न करणारा मी  ....तलाश  पुरते ठीक आहे पण यांच्यासोबत " तलाश " पहायचा ?? "मी " ????????

                            मी .......तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला . परंतु "कोणाच्या डोळ्यावर येऊ नये " म्हणून चांदीचा चमचा  "लॉकर " मध्ये आणि स्टीलचा चमचा "तोंडामध्ये " अशा  मध्यमवर्गीय मानसिकतेत वाढलेला सामान्य तरुण . आहे ते दाखवायचं नाही आणि जे दाखवाल त्याचा माज करायचा नाही असे संस्कार झालेला . त्यामुळे वयाच्या १८ -१९ वर्षापर्यंत कधी अवास्तव अपेक्षा केल्या आहेत किंवा गरज नाही तिकडे पैसा खर्च केला आहे अशातला भाग नाही .पुण्या -मुंबईत माहित नाही पण  सांगलीत माझ्या लहानपणापासून  थेटर चे ४ स्क्रीन होते ... प्रताप ,स्वरूप ,त्रिमूर्ती आणि  समर्थ  आणखी १-२ असतील . ही  चार थेटर चालत १०-१५ मिनिटाच्या अंतरावर . एक स्क्रीन फुल असेल तर दुसरे ... कोणता न कोणता सिनेमा  बघायला मिळायचाच . ते पण ५० रुपयात ... ३०-३५ रुपये तिकीट , ५-७  रुपयाचे पॉप कोर्न / वडा पाव आणि १० रुपयांचे आईस क्रीम .... इतके करूनही गोळ्या /शेंगा घ्यायला १-२ रुपये शिल्लक राहायचे .. जुना काळ तो ..१-२ रुपयात चांगल्या मुठभर शेंगा किंवा कांदा -लिंबू घालून दिलेली खारी डाळ मिळायची ....मजा असायची . तेव्हा  एकच ध्यास असायचा सिनेमाचा ..आणि सिनेमात हिरो जसा खलनायकाला बदडतो अगदी तसेच घरी येऊन बहिणींना बदडायचा ( लहान असल्याचा फायदा ) त्यामुळे थेटर कसे आहे ,समोरचा माणूस त्याच्या समोरची सीट कशी रंगवतोय ,माझ्या बाजूला कोण बसले आहे , कोणत्यातरी अती उत्साही माणसाने फाडलेल्या सीट मधून ऊर्ध्व दिशेला आलेल्या तारा अधोभागाला किती टोचत आहेत , छतावर लावलेला पंखा शोभेचा आहे कि खरच  कार्यरत आहे ,थेटर ची भिंत पांढरी  पण  कोपरे लाल कसे  ? असे प्रश्न मनाला कधी पडलेच नाहीत ...कारण आजूबाजूच्या मास मध्ये मला क्लास दिसायचा ... त्यांच्या आचरट प्रतिक्रियेवर मनापासून दाद द्यावी वाटायची , हा असा मी असा तरीही हा माझ्या बाजूला कसा ? असे स्टेटस डोक्यात शिरले नवते . नुकतीच शाळा संपल्याने " सारे भारतीय माझे बांधव  आहेत  " हे ज्ञान ताजे होते .. त्यामुळे समोरचा ,बाजूचा  कसाही असला तरी तो माझा गावकरी आहे आणि मी त्यांच्यातीलच एक आहे अशी प्रेमळ भावना मनात होती ..पण ...
                             वेगवेगळ्या ठिकाणी असलेली चार स्क्रीन जेव्हा एका छता खाली आली तेव्हा विचारातले वैविध्य संपुष्टात आले .. सिनेमाच्या कथेपेक्षा थेटरच्या टाप टिपीला महत्व आले . माझे  स्वागत पानाने रंगवलेल्या मुळच्या सफेद पण तूर्त लाल असलेल्या फरशीने नाही तर लाल  मखमली वेलवेट ने करावे , खुर्च्या माऊ आणि साफ असाव्यात , जास्तीत जास्त सुखासन असावे , २०-२५ जास्त गेले तरी चालतील पण शीतपेय आणि खाद्य पदार्थ जागेवर मिळावेत ,पोप कोर्न - पाणीपुरी चेंबट असले तरी चालतील पण ते ग्लोव्ज घालून किंवा बिसलेरी च्या पाण्यात बनवलेले असावेत , माझ्या पलीकडे तंग कपड्यातली टंच मुलगी बसावी अगदीच नाही तर उंची कपडे घातलेला "साहेब " बसावा ... अशा अपेक्षांचे रुपांतर माजात झाले आणि जवळ पास शेकडो सिनेमे ज्या सिंगल स्क्रीन वर पहिले त्या स्क्रीन ला मी दुरावलो ..वरवरच्या सौंदर्याला भुललो . ५० रुपयात सिनेमा पाहणारा मी आता किती शे रुपये एका सिनेमावर घालवतो माझे मलाच समजत नाही ...कारण काय तर मास ला दर्जा नसतो क्लास ला दर्जा असतो ..आणि दर्जा हवा तर किंमत मोजायलाच हवी न ??
                              सिनेमा पाहायला जाताना क्लास किंवा दर्जा कशात असावा ?? सिनेमाच्या कथेत की सिनेमा पाहायला आलेल्या गर्दीत  ?   अभिनयाच्या सादरीकरणात की थेटरच्या सजावटीत ?? यातील मुलभूत फरकच मी विसरलोय का  काय असा प्रश्न मला सतावत आहे . क्लास  फोन आणि आता हातातील TAB यातून सवड मिळाली तर सिनेमा कडे पाहतो  ... पण मास  ....हिरोच्या आगमना वेळी चढत्या  क्रमात   शिट्ट्या वाजवतो   , विनोदाना दिलखुलास  दाद देतो , भावनात्मक प्रसंग सुरु असताना अस्फुट हुंदके काढतो  ,  नायक -नायिका यांच्या जवळीकीच्या प्रसंग रेकॉर्ड करायला हळूच मोबाईल वर काढतो , कागदी वास असलेले लाल किंवा पिवळे तिकीट  आनंदाने मिरवतो आणि सिनेमा संपला कि मित्राच्या खांद्यावर हात टाकून संवादाची उजळणी करत घरी जातो .. मध्यंतर होण्या आधी ५-१० मिनिट शीतपेयांच्या बाटलीवर ओपनर फिरवून होणारा आवाज , मडक्यात विस्तव करून गरम केलेले शेंगदाणे , आताच भट्टीतून आणलेत यावर विश्वास ठेऊन विकत घेतलेले  ७ दिवसा पूर्वीचे पॉपकोर्न आणि " अरे डॉक्टरांचा मुलगा न तू ?? तू एवढा ( प्रमाण व्यक्तिपरत्वे इंचा पासून फुटा पर्यंत बदलते ) असल्या  पासून ओळखतो मी तुला एकटाच आलास ?? "  अशा आपुलकीच्या प्रश्नांची देवाणघेवाण आणि हा माणूस कोण ?? या विचारात  गेलेला मध्यंतर.... असे अनुभव केवळ सिंगल स्क्रीन मधेच येतात .तलाश च्या वेळी मी पुन्हा "मास " मध्ये मिसळायचा प्रयत्न केला पण जमले नाही ..पुढे कोणतातरी सिनेमा सिंगल स्क्रीन मध्ये पहायचाय  ...मास मधला क्लास अनुभवायचाय  ....

No comments:

Post a Comment