Monday 24 December 2012

देव निवृत्त झाला ..

काय म्हणू तुला ? अनेक जागतिक विक्रमाना गवसणी घालणारा विक्रमादित्य ? की  म्हणू तुला मास्टर ब्लास्टर ? अनेक क्रिकेट खेळाडूंसह जगातील सर्वच समीक्षकांनी ठरवलेला  डॉन यांचा वारसदार म्हणू ? की अनेक क्रिकेट खेळाडूंनी ज्याला पाहून आपली कारकीर्द सुरु केली , कारकीर्द सुरु करायचे स्वप्न पहिले म्हणून जागतिक आदर्श म्हणू ? म्हणू तुला तमाम गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा निष्ठुर फलंदाज की त्याच गोलंदाजांच्या मनात प्रेम निर्माण करणारा सच्चा माणूस ? म्हणू तुला मला , माझ्या वयाच्या साऱ्यांनाच क्रिकेट ची आवड लावणारा महान माणूस की करोडो लोकांप्रमाणे देव ? म्हणू तुला शतकवीर की म्हणू तुला टीकांचा बादशाह ? म्हणू तुला स्वतःच्या पुतळ्याचे  दहन स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही पुन्हा नव्या दमाने आणि ताकदीने आपल्याच लोकांची स्वप्ने पूर्ण करणारा अवलिया की  लोकांची प्रत्येक स्वप्ने पूर्ण करणारा शिल्पकार ? म्हणू तुला कॉंग्रेस चा खासदार की रंगीत खेळाला सभ्यतेचे आणि आक्रमकतेचे कोंदण देणारा चित्रकार ? म्हणू तुला तिकीट विक्रीचे हमखास साधन की माध्यमांच्या टी .आर.पी.चे माध्यम ? की  म्हणू तुला ...... वेळ आल्यावर आपले कर्तुत्व , कामगिरी ,विश्वविक्रम , कौतुक आणि टीका ,अजूनही खेळायची असलेली इच्छा आणि मोह मागे सोडून  सामान्य  खेळाडू प्रमाणे  शांतपणे २२ यार्डाची खेळपट्टी सोडून  जाणारा असामान्य जादुगार ..... सचिन रमेश तेंडूलकर !!

                                  सचिन रमेश तेंडूलकर .... एका व्यक्तीने , एका खेळाने आणि एका तपस्येने व्यापलेली  त्याच्या कारकिर्दीची आणि माझ्या आयुष्याची २३ वर्षे !! आज सकाळ नेहमी सारखीच झाली पण त्यात नेहमीचा उत्साह नवता , कॉफी तीच होती पण त्याला चव नवती , पेपर तोच होता पण त्यात मजा नवती , वृत्त वाहिन्या त्याच होत्या पण त्यात बातमीच नवती ? का ?? आयुष्याची अनेक वर्षे व्यापलेला , त्याला घ्यायची तेवा घेउदे निवृत्ती तुझा बापाच काय जातंय ? म्हणून कट्ट्यावर वादाचा विषय बनलेला , माध्यमे आणि रोजंदारीवर घेतलेले काही समीक्षक यांनी राष्ट्रीय प्रश्न बनवलेला , अनेकांना क्रिकेट समजत नसूनही केवळ "तो " कसा खेळतो म्हणून अनेकांनी खेळ  पाहायला , समजून घ्यायला सुरुवात केलेला , वृत्तपत्रात आलेल्या छायाचित्रांनी माझ्या खोलीच्या भिंती व्यापलेला , काही गोलंदाजाना स्वप्नात दिसणारा आणि तमाम क्रिकेट रसिकांची स्वप्ने पूर्ण करणारा तेंडल्या आज नवता .... यापुढेही नसणार !! सचिन शिवाय भारतीय संघ ही कल्पना करणे म्हणजे शुमाकर विना एफ वन , वूड्स विना गोल्फ , फेडरर विना टेनिस ,मोहमद अली विना मुष्टीयुद्ध (boxing ) , रोनाल्डो  विना फुटबॉल इत्यादी यांची कल्पना करण्यासारखे आहे .यांनी खेळासाठी किंवा देशासाठी काय योगदान दिले हे सर्वच जाणतात पण मी जाणतो यांनी मला " खेळ " बघायला शिकवले ... इतर कोण आहेत याहून "तो " आहे कि नाही हे महत्वाचे मानणाऱ्या फार मोठ्या वर्गातील मी एक सामान्य माणूस ..
                                  मान्य ....अगदी बिनशर्त मान्य की खेळाडू पेक्षा खेळ मोठा . पण जर एखादा खेळाडू मोठा होत असताना खेळालासुद्धा मोठा करत असेल तर ? २२ वर्षे ९१ दिवसांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ४६३ सामने खेळून १८,४२६ धावांचा पाऊस पाडणारा , ४९ शतके ठोकणारा ,६२ वेळा सामनावीर आणि १५ वेळा मालिकावीर किताब मिळवूनही सचिन खेळतो तेव्हा देश हरतो अशी टीका सहन करणारा खेळाडू जर एका खेळला मिळत असेल तर सांगा पाहू ..खेळाडू मोठा कि खेळ ?? यातील भावना  गली  कडे टोलवून तर्रार वेगाने येणाऱ्या टीकेच्या चेंडूला स्ट्रेट ड्राइव्ह मारायचाच म्हंटले तर .....क्रिकेट ने जगाला अनेक महान खेळाडू दिले ... सी .के .नायडू पासून गावस्कर  पर्यंत ,डॉन पासून रिचर्डस पर्यंत आणि यादी लांबतच जाणार आहे ... पण या सर्वात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली ती सचिन तेंडूलकर याला ..आणि टीकेचा सर्वाधिक सामना करायला लागला तोही यालाच ..त्यामुळे सचिन ने आपल्याला काय दिले याचा विचार केला तर ...सचिन ने आपल्याला दिले ..खेळाविषयी प्रेम , खेळ पहिल्याचा आनंद , कलात्मक फटक्यांची मेजवानी , अप्रतिम क्षेत्ररक्षण , गुगली टाकून दांडी  उडवल्याचे सुख , अपेक्षांचे ओझे टाकून निर्धास्त व्हायचा हक्काचा खांदा , पंचांच्या चुकीचा निर्णय  मान्य करून शांतपणे मैदान सोडायची सभ्यता , ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वादाच्या प्रसंगात खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे राहायची जेष्ठता , शतकपुर्तीचा अभिमान आणि शून्यावर बाद होण्याची नामुष्की ... (सचिन मैदानात आहे आणि त्याने शतक नाही केले तर ज्या धावा असतील त्या आपण शून्यच पकडतो नाही का ? ) आणि अपेक्षाभंगाचे दुक्ख ...
                                 मी नेहमीच  म्हणतो कि सचिन च्या देवत्वापुढे , त्याच्या वलयापुढे संघातील इतर बिग ३ नेहमीच दुर्लक्षित राहिले .. इंग्लंड दौऱ्यात सचिन यशस्वी ठरला असता तर द्रविड अनेकांना समजलाच नसता ..गांगुली यांचे दुर्दैव तर याहून मोठे ....१९८० च्या दशकात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले पण सारा जमाना बच्चन का दिवाना असल्याने शशी चे योगदान कोणी गृहीत धरलेच नाही ..तसेच गांगुलीचे झाले ...सचिन च्या साथीत  सलामीचे  अनेक विक्रम करूनही तो एक फलंदाज म्हणून दुर्लक्षित राहिला ..आजही चर्चा होते ती त्याच्या कप्तानीची ...फलंदाजीची ?? मी तरी नाही पाहिली ,वाचली किंवा ऐकली ...लक्ष्मण चेही तसेच ..यात सचिन चा दोष आहे का ? नक्कीच नाही ....दोष आहे आपला आणि आपल्या मानसिकतेचा ...जे काही करावे ते सचिन ने ...शतक  त्यानेच करावे , सामना जिंकूनही त्यानेच द्यावा इतर खेळले तर चांगलेच पण सचिन ने खेळलेच पाहिजे .. म्हणूनच इंग्लंड दौऱ्या  नंतर सचिन च्या निवृत्तीने पुन्हा एकदा उचल खाल्ली ..त्याचे वय वाढले मान्य , हालचाली काहीश्या मंदावल्या मान्य , धावांचे डोंगर उभा करणारा आज धावांचे ढेकूळ सुद्धा उभे करू शकत नाही हे सुद्धा मान्य आणि खेळाडूला कधीतरी निवृत्ती घ्यावीच लागते हे तर त्रिकालाबाधित सत्य ! पण ..... पण ...मेख इथेच आहे ... सत्याला अपेक्षांची पालवी फुटू लागली तर वाट्याला येते ती रुखरुख आणि  बोचत राहते ते शल्य ... ४९ एकदिवसीय शतकात एकाची भर पडली असती तर ? पाकिस्तान विरुद्ध एखादा सामना खेळून निवृत्ती घेतली असती तर ? कसोटी आणि एकदिवसीय दोन्हीतून एकदम निवृत्ती घेतली असती तर ?तर....... विश्वचषक जिंकल्या नंतर लगेच सचिन ने निवृत्ती घेतली असती तर ?? चुकले ....टायमिंग चुकले ... एकदिवसीय सामन्यातील कप्तानीतील , इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील फलंदाजीतील अपयशा प्रमाणेच निवृत्तीचे टायमिंग चुकले ..पण आता तो निवृत्त झाला आहे ....
                                तिरंगा लावलेले हेल्मेट , आधीचा  एम .आर.एफ आणि आता एस.टी चा लोगो , आकाशाकडे पाहत मैदानात झालेले आगमन ,सचिन सचिन चा घोष , पायांची ठराविक हालचाल करत उभा राहिलेला तो , चेंडू आणि bat याचा सामना झाल्यावर येणारा सुंदर आवाज , बंदुकीच्या गोळीहून वेगाने जाणारा चेंडू , हतबलतेने चेंडूकडे पाहणारा क्षेत्ररक्षक , आश्चर्ययुक्त रागाने सचिन कडे पाहणारा गोलंदाज , चेंडू सीमापार गेला आहे याची खात्री करून ठराविक लयीत मान हलवून साथीदार फलंदाजाच्या ग्लोव्ज वर पंच मारणारा सचिन , मैदान किंवा घर /ऑफिस याचे भान विसरून जल्लोष करणारे रसिक , शतका नंतर एका हाती हेल्मेट आणि दुसऱ्या हाती bat घेऊन आकाशाकडे पाहणारा निळ्या वेशातील १० क्रमांक मिरवणारा सचिन आता आपल्याला दिसणार नाही ....कारण सचिन आता निवृत्त झालाय ... क्रिकेट च्या खेळपट्टीवर तळपणारा सूर्य आता रंगाचा  त्याग करून संन्यासाची सफेद वस्त्रे स्वीकारू लागलाय .... पण देव कधी निवृत्त होतो ? तो तर अमर असतो .... देव तर केवळ माध्यम असते ... जे क्लिष्ट आहे ते सोपे करून सांगण्याचे आणि जे माहित नाही ते ज्ञात करून देण्याचे ... अनेकांना घडवण्याचे पण घडवल्याचे श्रेय नाकारण्याचे , सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायचे पण इतरांच्या फायद्यासाठी आपल्या अपेक्षांवर पाणी सोडायचे ...आपल्या कार्याने अनेकांसमोर आदर्श ठेऊन स्वतः मात्र पडद्या मागे राहण्याचे कार्य देवा शिवाय कोणाला जमणार ? देव वय वाढले म्हणून कधीच निवृत्त होत नाही तूर्त आपले कार्य आणि गरज संपली आहे हे स्वीकारून निवृत्त होतो ....पुन्हा वेगळ्या स्वरुपात जन्म घेण्या साठी ...पण हेच जर राजकारणी लोकांना समजले तर....तर..मेख इथेच आहे ... सत्याला अपेक्षांची पालवी फुटू लागली तर वाट्याला येते ती रुखरुख आणि  बोचत राहते ते शल्य ...

2 comments: