Monday 18 November 2013

'नकळत दिसले सारे . . . '


ती एक प्रशांत सायंकाळ होती . घड्याळात किती वाजले होते आठवत नाही . कारण डोळे निकामी झाले होते . कान दुप्पट वेगाने कार्यरत झाले होते .. समोरून कोणीतरी येतंय , बाजूने कोणीतरी सरकतंय , मागून कोणीतरी ढकलतय , पुढून कोणीतरी ओरडतय हे सारे जाणवत होते पण दिसत नवते . . . मी अंधळा झालो होतो का ?? डोळ्यासमोर केवळ अंधार . . ओळखीचा रंग एकच . . सोबतीचा रंग एकच . . ज्ञात असलेला रंग एकच . . 'काळा ' . . कधीपासून होतंय मला असे ?? समोरचे दिसूनही दिसत नाही , असूनही जाणवत नाही , बघूनही बघवत नाही . . . का ?? माझी दृष्टी गेली होती का डोळसपणा हरपला होता ? मी माझ्या आयुष्याकडे शेवटी कधी 'डोळसपणे ' डोकावून पहिले होते ? माझे आजपर्यंतचे आयुष्य कधी 'डोळ्याखालून ' घातले होते ? मला सुंदर डोळे दिल्या बद्दल मी ईश्वराचे कधी आभार मानले होते ? ज्यांना डोळे नाहीत त्यांना मी कधी मदत केली होती ? डोळे मिटण्या पूर्वी जर डोळेच काम करेनासे झाले तर आयुष्य कसे असेल याचा मी कधी विचार केला होता ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर म्हणजे भावनांना हात घालून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारे नाटक ' नकळत सारे दिसले . . . '

                 अजय (प्रशांत दामले ) हा प्रथीतशय आणि प्रतिष्ठित अभिनेता . . नटसम्राट नाटक सादर करत असताना त्याला अचानक दिसेनासे होते अन नाटकाची सुरुवात होते . डोळ्यावर काळ्या काचा अन हातात काठी घेतलेला अजय रंगमंचावर येतो , तेव्हा इतर अनेक रंगांपेक्षा 'काळा ' रंग अधिक गडद होतो . . .  अजयचे धडपडत वावरणे , मदतीसाठी सहाय्यकाला बोलावणे , ' अजय पुन्हा बघू शकेल का ? ' या आशयाच्या बातम्या ऐकून संमिश्र भावना व्यक्त करणे असे काही प्रसंग झाल्यावर रिया (देव ) चा प्रवेश होतो . . परावलंबी ते स्वावलंबी असा प्रवास सुरु होतो . . एखादी गोष्ट बघायला डोळ्यांची गरज नसते हे शिकत असताना अजय आजपर्यंत डोळ्याने न बघितलेल्या गोष्टी बघायला शिकतो . . . रिया त्याला 'तिच्यासारखी ' स्वावलंबी बनवते . . एक अंध एका अंधाला दृष्टी देते . . कोण ही रिया ?? तिला अजय बद्दल इतके ममत्व का ? अजयला दृष्टी देण्यासाठी तिची धडपड का ? तर ती एक 'परतफेड ' . . . . कोण्या एका आश्रमाला आयकर चूकवण्यास भरलेल्या पाच लाखाच्या दानातून आयुष्य सापडलेल्या पाच अनाथांपैकी ती एक . . . आयुष्याचे रंग न बघताही जीवनाची कलाकुसर अनुभवलेली एक व्यक्ती . . अजयला आत्मविश्वास देणारी , त्याला त्याच्या पावलातून जग बघायला शिकवणारी . . .लहान आणि छोट्या प्रसंगातून आयुष्याचा मोठा आनंद मिळवता येतो . अजय याने डोळस माणसाचा अभिनय करून जिंकलेली पत्रकार परिषद , काठीच्या आधाराशिवाय काही पावले टाकल्या नंतर येणारा आत्मविश्वास , रियाच्या विविध खेळातून रचलेला स्वावलंबीत्वाचा पाया असे प्रसंग मनात घर करतात . . रिया आणि अजय यांनी एकमेकांना एकमेकांच्या अंधत्वाची जाणीव करून देणारे प्रसंग मनाला घरे पाडतात . . . .
                 श्वास सिनेमा जिथे संपतो तिथून हे नाटक सुरु होते असे मला वाटते . . दृष्टी गेल्यावर आपण अंधळे आहोत हे स्वीकारणे अन त्यावर मात करण्यास प्रयत्न करणे हा प्रवास नाटकातून मांडला आहे . नेत्रदान तसेच अनाथाश्रम /सामाजिक संस्था यांना दान देण्याचे महत्व अधोरेखीत करायचा चांगला प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शक सोमण यांनी केला आहे . अभिनयाच्या बाबतीत प्रशांत दामले नेहमी सारखा सहज आणि सुंदर . . गंभीर विषयाला विनोदाची अचूक फोडणी दिल्याने नाटक कंटाळवाणे होत नाही . . रियाची भूमिका करणाऱ्या देव मात्र प्रशांत दामले समोर फीक्या वाटतात . . अभिनय मनात भरत नाही . प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य उत्तम . प्रशांत दामले यांच्या अभिनया सोबतच अशोक पत्की यांचे संगीत मनात खोलवर उतरते . .
                 आपण सर्वकाही बघू शकतो हा भ्रम असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे नाटक जरूर बघावे . . खरी दृष्टी अंधांना असते का आपल्याला यावर एकदा चिंतन करावे . . त्यासाठीच आहे हे नाटक . . कारण इथे आजवर न दिसलेल्या , न अनुभवलेल्या , न कल्पिलेल्या अनेक गोष्टी नकळत दिसून जातात . . दुसऱ्या अंका नंतर जेव्हा रंगभूमीवरचा पडदा पडतो तेव्हा डोळ्यावरची झापडे उघडतात . . एक सारे काही वेगळेच दिसू लागते . . अगदी नकळत . . ! 

No comments:

Post a Comment