Saturday 23 November 2013

नामांतर - एक वाद . . एक संधी !

'नावात काय आहे ? ' असा सवाल निर्माण करून थोर नाटककार शेक्सपिअर सोळाव्या शतकात निवर्तला . तोच जर विसाव्या शतकात अन त्यातल्या त्यात भारतात जन्माला आला असता अन नावात काय आहे ? असे काहीबाही बोलता झाला असता , तर निश्चित 'प्रतिगामी ' ठरवला गेला असता . चौका चौकात त्याच्या नावाने शिमगा झाला असता , त्याचेच साहित्य जाळून त्या भोवती सुधारणावादी पुरोगामी कार्यकर्त्यांनी फेर धरला असता , शाई आणि डांबराच्या रंगात तो न्हावून निघाला असता . तो तिकडेच महान म्हणून (होऊन ) गेला ते बरे झाले . . भारतापुरता विचार करावयाचा झाला तर नावात काय नसते ?? नावात वर्ण ,वर्ग , वलय , वर्चस्व , जात ,धर्म  , राग ,द्वेष , अनुनय ,असूये पासून अस्मिते पर्यंत सर्वकाही असते . म्हणूनच भारतीय 'नावावर ' चालतो , विकतो अन खपतो सुद्धा . . याच नावाला एकदा आडनाव चिटकले की आडमार्गाने वेगळेच राजकारण सुरु होते . आमचे अन तुमचे या भांडणात ते 'आपलेच ' आहेत हा विस्तृत दृष्टीकोन संकुचित होतो . अमुक एक नावा आडनावाची व्यक्ती म्हणजे तमुक जातीची /धर्माची अस्मिता . . इतरांना त्यावर बोलायचा किंवा तात्विक विरोध करायचा अधिकार नाही . . कारण . . कार्याला अडगळीत टाकून केवळ नावाचे भांडवल करणे , अस्मितेचा मुद्दा बनवून समाजाला एकमेकात झुंजवणे , व्यक्तीची प्रतीके बनवून त्यांचे अमर्याद कार्य ठराविक जाती धर्माच्या 'मर्यादित ' चौकटीत बंदिस्त करणे अन त्या बंदिस्त चौकटीचा एकमेव रखवालदार , वारसदार म्हणून बहुसंखेने समाजात वावरणे किंबहुना समाजात आपल्यासारख्याच संकुचित विचारसरणीच्या लोकांचा समूह तयार करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे हेच या शतकाचे ' नामी ' राजकारण आहे . . . .


                           भारतातील एक प्रथितशय विद्यापीठ असलेल्या 'पुणे विद्यापीठ ' याच्या नामांतराचा मुद्दा सध्या अकारण पेटला आहे . पुणे विद्यापीठाचे 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ' असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे . माफ करा होता . या नामकरणास विरोध करण्याचे कार्य काही स्वयंघोषित 'सुधारक / पुरोगामी ' मंडळीनी आरंभले आहे . त्यांचा आक्षेप 'पुणे ' या शब्दाला आले . . पुणे म्हणे पेशव्यांचे . संकुचित विचारसरणी , जाती व्यवस्था , शोषण , अन्याय , कर्मठपणा , ब्राह्मण्यवाद याचा दर्प म्हणे 'पुणे ' या शब्दातून येतो . .  अधोरेखित करायचा मुद्दा असा की पुणे शहरातून पेशव्यांनी स्वराज्याची पेशवेगिरी केली असली तरी त्या शहरावर पेशव्यांची मालकी नाही . ते पुण्यात यायच्या आधीपासून पुणे शहराचे अस्तित्व होते . . कालांतराने पेशवे व त्यांच्या वंशजांनी पुणे शहराची यथाशक्ती वाढ व विकास केला . मराठ्यांच्या राजकारणाची अन अस्तित्वाची पुणे ही 'अप्रत्यक्ष ' पण कार्यरत राजधानी बनल्याने पेशव्यांचे पुणे अशी ओळख 'नंतर ' निर्माण झाली . पुण्याने केवळ पेश्वेच दिले का ? पुण्याची ओळख केवळ पेशव्यांच्या अवती भोवतीच मर्यादित आहे का ?छत्रपती शिवाजी , हरिभाऊ आपटे , न्या . रानडे , रमाबाई रानडे , आनंदीबाई जोशी , आगरकर , टिळक , गोखले ,कर्वे , भांडारकर ,सावित्रीबाई फुले ,ज्योतिबा फुले  प्रबोधनकार , एस . एम . जोशी , आचार्य अत्रे , पंडित भीमसेन जोशी  इत्यादी अनेक महान व्यक्तिमत्वांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून पुण्याची ओळख आहे . इतरत्र न जाता केवळ 'फर्ग्युसन कोलेज ' मधून पदवी घेतलेल्या अन जगभरात पुण्याचा अन पर्यायाने पुणे विद्यापिठाचा डंका वाजवणाऱ्या व्यक्तींची यादी केली तर शानिवारापासून ते पार्वती पर्यंत कागद अंथरायला लागेल . ही पुण्याची ओळख नाही ? पुण्यास देशाची सांस्कृतिक राजधानी तसेच आशियाचे ओक्सफ्रर्द्द म्हणतात ही पुण्याची ओळख नाही ? संशोधन क्षेत्रातल्या सर्वाधिक संस्था , चाकण सारख्या औद्योगिक प्रकल्पात सर्वाधिक गुंतवणूक , प्रत्येक क्षेत्रातील उत्तमोत्तम महाविद्यालयांचे जाळे ही पुण्याची ओळख नाही ?? अजूनही अठराव्या शतकात वावरणाऱ्या लोकांना ही ओळख पटणार आणि मानवणार नाही . . पण त्यांच्या दुर्दैवाने अन आमच्या पिढीच्या सुदैवाने हीच पुण्याची ओळख आहे . .
पेशव्यांचे पुणे हा ओळखीचा इतिहास झाला . . ज्याला जसा पटेल रुचेल झेपेल तसा त्याने तो वर्तमानात आठवावा पण ' सर्वसमावेशक पुणे ' ही पुण्याची आजची ओळख आहे . . या शहराला आणि शहरात कोणीही उपरा नाही . . 

            मध्यंतरी जगातील उत्तम विद्यापिठाची यादी प्रसिद्ध झाली होती . जगातील सर्वात मोठ्या लोकशाही , क्रमांक दोन ची लोकसंख्या , विकसनशील देशाच्या यादीतील प्रथम पाच मध्ये असणारा जीडीपी इत्यादी असणाऱ्या अन महासत्ता व्हायची स्वप्ने बघणाऱ्या देशातील एकही विद्यापीठ सर्वोच्च २०० ,मध्ये सुद्धा असू नये ?? याला काय म्हणायचे ते प्रत्येकाने ठरवावे . प्रत्येकाच्या मताचा लसावी काढला तर समान उत्तर मिळते ' देशाची शिक्षणा बद्दल असलेली उदासीनता ' . . . . शिक्षणाच्या दर्जा बद्दल उदासीन असलेली मंडळी  शिक्षणाची नवीन दुकाने अन डिग्री वाटणाऱ्या पंचतारांकित टपऱ्या उघडण्यात मात्र अतीउत्साही असतात . म्हणूनच
भारतीय विद्यापीठात लक्ष्मी नांदते पण सरस्वती मात्र 'व्हिसा ' च्या रांगेत ताटकळत उभी असते . मी एका स्पर्धेला गेलो असताना एक खूपच सूचक वाक्य कानावर पडले ' बापाच्या खिशाकडे बघून प्रीन्सिपोल हसला . . पोरगा नोटांच्या मदतीने वर्गात जाऊन बसला ' हे आहे का महासत्तेचे भविष्य ?? माझ्या वडिलांच्या काळात मोकळी जागा दिसली की साखर / सहकारी तत्वावर चालणारे कारखाने टाकायचे . आता मोकळी जागा दिसली की छापखाने टाकतात . डिग्री छापुन देणारे . . . प्रवेश घेणारा घेत जातो प्रवेश देणारा देत जातो . . एके दिवशी घेणाराच देणारयाच्या भूमिकेत वावरायला लागतो .  . केवळ नामांतर अन अस्मितेचे राजकारण करून बसफोड ,रेल्वे थांबव , टायर पेटव असले उद्योग करणारी तरुणाई अन त्यांची माथी भडकावणारी रोगराई ' शिक्षणाचा दर्जा '  यावर विचार कधी करणार ?? बहुतेक कधीच नाही . . . कारण विचार करायला जे लागते ते फोडाफोडी करायला लागत नसावे  . . . . 

                 सरकारी कोणतीही गोष्ट असली म्हणजे भारतीयांच्या मनात एक उदासीनता असते . जसे 'सिव्हिल ' ला गेला म्हणजे आता परत येणार नाही अशा ठाम समजुतीने घरचे तिरडी बांधायला घेतात तसेच युजी इकडे झाल्यावर पीजी इकडे करण्यात अर्थ नाही म्हणत अनेक 'हुशार ' अर्थ मिळवायला बेंकचे उंबरठे झिजवतात . काही मोजक्या संस्था भारतात उत्तम कार्य करत आहेत पण त्या जगाच्या पातळीवर कोठे आहेत यावरही विचार झालाच पाहिजे . जगाच्या पातळीवर भरारी मारण्याची स्वप्ने बघत असलेला आपला देश अजूनही पायाभूत सुविधांशी झुंजतो आहे .
शिक्षक , विद्यार्थी , सुविधा , संशोधन  ,समन्वय , आर्थिक मदत तोकडी असल्याने आपण जागतिक पातळीवर उघडे पडत आहोत . भारतातील शिक्षण यावर वेगळा लेख होऊ शकेल त्यात जायला नको पण 'जे आहे ते पुरेसे नाही ' यावर सर्वांचे एकमत असायलाच हवे . बदल हा झालाच पाहिजे यावर तर बहुमत असायला हवे . या बदलांची सुरुवात जर नावापासून होत असेल तर त्याचा स्वीकार केलाच पाहिजे . त्या नावाला , त्या नावाभोवती असलेल्या वलयाला आणि वलायाच्या पलीकडे असलेल्या साधनेला आपण 'न्याय ' देऊ शकू का यावर चिंतन झाले पाहिजे . . . 

                   
सावित्रीबाई असो किंवा अन्य कोणताही 'सुधारक ' असो त्यांच्या नावाकडे जाती धर्माच्या पलीकडे बघायला हवे . कारण त्यांचे कार्य 'मर्यादित ' नवते . ते समाजासाठी होते . समूहासाठी नवते . सुधारकांच्या नावाने किंवा त्यांच्या कार्याच्या उजळणीने नैराश्यातून मार्ग काढायची प्रेरणा मिळते . इतिहास घडवण्याची जिद्द अंगी येते . या लोकांनी समृद्ध केलेल्या क्षेत्राचा आपण एक लहानसा घटक आहोत या जाणीवेने अंगी जबाबदारी येते . त्यामुळे त्यांच्या 'कार्याला ' सलाम करणारे , कृतज्ञता दाखवण्याच्या , येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याच्या हेतूने एखाद्या संस्थेला त्यांचे नाव देण्यास कोणाचीच हरकत नसावी . पण त्या नामकरणाच्या अडून कोणी राजकारण करत असेल , आमचे तुमचे यासारखे दुही पसरवणारे विचार प्रसवत असेल , आपल्या अस्तित्वासाठी अन श्रेयवादासाठी नावाचा वापर करत असेल तर त्यास यथाशक्ती विरोध प्रत्येकाने केलाच पाहिजे . . 
.
                  एखाद्या संस्थेला नावाने प्रसिद्धी मिळते का संस्था प्रसिद्ध झाल्यावर त्याचे नाव होते हा चर्चेचा किंवा कदाचित वादाचा मुद्दा असू शकेल . पुणे विद्यापीठासोबत अन्य काही ठिकाणांचे नामांतराचे प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लागतील . ते लागुदेत . कारण समाजास खऱ्या आदर्शांच्या स्मरणाची नितांत आवशयकत आहे . हा नामांतर सोहळा पार पडला कि ' शिक्षणाच्या अन विद्यापीठातील सोयी सुविधांच्या दर्ज्या कडेही ' तत्काळ लक्ष द्यावे . . .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे 'नाव ' जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत झळकूदेत . हाच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यथोचित सन्मान असेल . . . कारण नावात काही जरी नसले तरी 'वारसा ' असो , जबाबदारी असते . . पुढच्या पिढ्यांनी ती समर्थपणे अन पवित्र भावनेने  पेलली तरच त्या व्यक्तीच्या नावाचे सार्थक होते . . नाव उच्चारल्यावर अभिमानाने मान ताठ होते . . . . जाती धर्म भाषा प्रांताच्या सीमा ओलांडून एका व्यक्तीच्या 'नावा ' खाली लोक एकत्र येतात . . कारण अशावेळी ते नाव म्हणजे जबाबदारीचे अन कार्याचे प्रतिक असते . . समाजाला अभिमान अन आनंद देणारे एक अमर कारण असते . .

No comments:

Post a Comment