Saturday 30 November 2013

तरुणांचा आदर्श कोण ??

वलयांकित क्षेत्र हे बहुदा कलंकीत 'च ' असते असे सर्वसामन्यांचे ठाम मत असते . त्यामुळे अशा क्षेत्रात आपली मुले -मुली स्वहस्ते पाठवायला तो अजूनही बिचकतो . . या वलयांकित क्षेत्राला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा सर्वतोपरी प्रयत्न करतो . . हा द्वेष बोलण्यातून सुद्धा जाणवतो . आमची ती संस्कृती त्यांचे 'कल्चर ' . आमची 'जीवनशैली ' आणि त्यांची 'लाईफ स्टाईल ' . आमची 'मुल्ये ' आणि त्यांचे 'मॉरल्स ' . इत्यादी . या वलयांकित क्षेत्रातील लोकांनाही खाजगी सुसंकृत आयुष्य असते असे मानायला पापभिरू कुटुंबे तयार नसतात . . या क्षेत्रात वर जाताना पैशा सोबत बरेच काही द्यायला लागते असा सार्वत्रिक गैरसमज असतो . सिनेमा अन बातम्या यामुळे तो अधिक बळकट होतो . या बरेच काही ला अनेक पर्याय आहेत . कुछ पाने के लिये कुछ 'खोना ' पडता है . इस हाथ से ले उस हाथ से 'दे ' . अजून बरेच काही . या सर्व शब्दांचा लसावी काय तर काहीतरी कमवत असताना काहीतरी '  गमवावे ' लागते . इथे काहीतरी गमावणारी 'स्त्री ' असेल तर तिचे काहीतरी गमावणे सामाजिक चिंतेचा अन चिंतनाचा विषय होतो . जेव्हा काहीतरी गमावलेली स्त्री जाहीरपणे म्हणते , ' आपण केवळ एकनिष्ठता अन आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी लढत आहोत .' तेव्हा पत्रकारीतेसारख्या वलयांकित क्षेत्रामध्ये सतत प्रकाशझोतात वावरणाऱ्या , नैतिकतेचा अन सामाजिक मुल्यांचा झेंडा आपल्याच खांद्यावर आहे या अविर्भावात वावरणाऱ्या , त्या 'क्षेत्रात ' येऊ पाहणाऱ्या काही शे मुला मुलींच्या 'आदर्श ' असलेल्या व्यक्तींची कलंकित मानसिकता देशासमोर येते अन प्रश्न उभा राहतो  तरुणांचा आदर्श कोण ??

                       
  भारत जेव्हा प्रतिगाम्यांच्या प्रभावाखाली होता , तेव्हा देशातील अन देशाबाहेरील प्रत्येक गोष्टीत अन गोष्टीवर बोलायचा त्यांना 'जन्मजात ' हक्क मिळायचा . कालांतराने हा हक्क अधिकाधिक कट्टर होत असे . . समाजातील इष्ट -अनिष्ट , सव्य -अपसव्य , नैतिक -अनैतिक , नैसर्गिक -अनैसर्गिक , धार्मिक -अधार्मिक , आस्तिक -नास्तिक ,दैवी -पाशवी , राजकीय -सामाजिक , आर्थिक -सामाजिक , सरंजामिक -लोकहितवादी , धोरणीक -अधोर्णिक , लौकिक -अलौकिक , वास्तव -अवास्तव , मानवीय -अमानवीय अशा या जगात अन भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात घडणाऱ्या घटनेवर बोलायचा , भांडायचा , टीका करायचा , निर्णय घ्यायचा अन हातातील सत्तेचा वापर करून आपल्याला हवे तेच पदरी पाडून घ्यायचा शिरस्ता होता . त्याच हक्काने अन आवेशात आज प्रसारमाध्यमांचे 'मोजके ' प्रतिनिधी वावरत आहेत . ?? पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ आजपर्यंत तरी मानतात . इतर कोणता स्तंभ सापडला नाही म्हणून 'समतोल ' साधायला पत्रकारितेचा 'टेकू ' लावला अशातला भाग नाही . तर इतर तीन स्तंभात समतोल रहावा , शासनावर -शासनकार्त्यांवर , लोकांवर -लोकशाहीवर , उद्योगपती - त्यांच्या उद्योगावर , शासकीय धोरणे - धोरणामागची सोनेरी तोरणे या सर्वांवर 'वचक ' रहावा म्हणून पत्रकारितेचा समावेश केला (असावा ) .
                             
पूर्वीची पत्रकारिता 'चमकू ' नवती . . काहीतरी करून चमकायचेच या मानसिकतेने अन स्पर्धेने केलेले शाब्दिक डोंबारी खेळ नवते . वैयक्तिक नातेसंबंध -हितसंबंध यापेक्षा पत्रकारितेच्या मूल्याला काहीतरी कोठेतरी स्थान होते . . माझे बाबा मला सांगायचे , पूर्वी 'बाय लाईन ' चे इतके आकर्षण नवते . उत्तम बौद्धिक अन शाब्दिक प्रभुत्व असलेले विद्वान समाजाला बदलण्याच्या तळमळीने लिहित जायचे , जी व्यक्ती इतकं सारं लिहिते ती कशी असेल हे आम्हाला दुखद निधनाच्या बातमीतील छोटासा फोटो पाहून समजायचे . यातील खरे -खोटे कितपत ते माहीत नाही मला पण तसेच असावे . आता माझे  मित्र आहेत जे लेख छापून आला म्हणून चेहेऱ्याने आनंदी असतात पण बाय लाईन ( लेखासह लेखकाचे नाव ) मिळाली नाही म्हणून मनात भ ची बाराखडी म्हणत असतात . . कारण आता प्रत्येकाला आकर्षण आहे ' प्रकाशझोतात ' यायचे . त्यात टिकायचे . याच हव्यासापायी अनेक पत्रकारांच्या लेखणीची शाई राजकारणी , उद्योगपती किंवा 'प्रभावशाली ' व्यक्तींच्या मर्जीच्या 'प्रभावाखाली ' असते . इतरवेळी टीव टीव करणारे कोणी दर्डावले की म्याव म्याव करायला लागतात . . त्यामुळे निपक्षपाती , पूर्वग्रहदुषित नसलेले , सम्यक , नमक हलाली न करणारे , पत्रकारितेच्या मूल्यांना जपत समाजाला मूल्य शिकवणारे लिखाण 'क्वचितच ' वाचायला मिळते . भारतीय समाजाला 'खळबळीची ' उपजत आवड आहे . . अगदी जेवणापासून ते जीवनापर्यंत प्रत्येक गोष्ट 'मसालेदार ' हवी . दोन मित्र भेटले की हमखास एकमेकांना विचारतात . ' काय काय ? काय खळबळ ' मग ही खळबळ मटक्याच्या आकड्याची असो , सुपारीच्या तुकड्याची असतो , यात्रेत कापलेल्या मोठाल्या बोकडाची असो , गावात नवीनच आलेल्या पाखराची असो वा गुत्त्यावर ढोसलेल्या बाटल्याची असो . खळबळ ही पाहिजेच . . . . भारतीय समाजाला आवड असलेल्या याच खळबळीचे बाजारीकरण करायला तरुण तेजपाल यांनी १९९९ साली ' तहलका ' स्थापन करून आधी मनोज प्रभाकर नंतर बंगारू लक्ष्मण यांना 'शूट ' करून 'स्टिंग ऑपरेशन ' चा पाया रचला . . . 

             
 दिवस १६ डिसेंबर २०१२ . शहर -दिल्ली . घटना - एका युवतीवर सामुहिक बलात्कार . समस्त प्रसारमाध्यम वर्ग तसेच बुद्धीजीवी वर्गास पडलेली ' भारतातील स्त्री जीवनाचे भविष्य ' याची रास्त  चिंता . चर्चा . . महिलांना संरक्षण देण्यास तसेच त्यांच्या समस्या भारतापुढे आणण्यात  आपण किती एक पाऊल पुढे आहोत याची जीवघेणी स्पर्धा . बलात्कारी व्यक्तीला फाशी झाल्यावर सर्व माध्यमांनी केलेला जल्लोष . प्रसार माध्यमांच्या रेट्या मुळे प्रकरण तडीस लागल्याची जनमानसात प्रतिमा . जगाला नैतिकता अन संस्कारांचे बाळकडू पाजण्याचा एलेक्त्रोनिक मिडियाचा हक्क 'रिन्यू ' . 
              दिवस २० नोव्हेंबर २०१३ . शहर -गोवा . घटना - एका युवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न . . संशयित ( अजून न्यायालयात अधिकृत रित्या गुन्हा सिद्ध झाला नाही म्हणून ) आरोपी - तहलका डॉट कॉम या संकेतस्थळ तथा मासिकाचा संपादक तरुण तेजपाल . .  

या दोन घटनांचा दुवा साधायला पिडीत तरुणीचे एक वाक्य आहे - ' ' we had often spoken of 'what turns men into beasts' at Tehelka edit meetings . you yourself have commissioned several stories on this . '' 

 काय बोलायचे ?? कोणाला बोलायचे ? समाजात वावरून ,सामाजिक प्रतिष्ठा , समाज जीवन ,  मान मरातब मनोसक्त उपभोगुन आम्ही या समाजातले नाहीच अशा अविर्भावात पृथ्वीच्या वर अन ओझोन थराच्या खाली आपले वेगळेच 'बौद्धिक ' जग वसवणाऱ्या या धेंडाना काय सांगायचे ? जगाला सल्ले देणारे अन नैतिकतेचे धडे गळा फाटे पर्यंत किंवा हात तुटे पर्यंत देणारे जेव्हा आपल्या बाबतीत घडलेल्या घटनेला 'छोटीशी गोष्ट ' किंवा 'यावेळी अंदाज चुकला ' असली छछोर पालूपदे लाऊन अत्यंत हिडीस अन निर्लज्ज पद्धतीने समोर आणतात त्यांच्या वासनांधतेचा , कलंकित मानसिकतेचा , टपरी अन छपरी विचारांचा का आदर्श ठेवायचा तरुणांनी ?? 

                    र . धो . कर्वे एका ठिकाणी म्हणतात ' प्रत्येकाला कामशांतीचा हक्क आहे हे एकदा कबूल केले, की प्रत्येकाला आपल्या शक्तीप्रमाणे ती करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, हे ओघानेच आले. मात्र कामशांती ही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे त्याकरता त्या व्यक्तीची संमती असली पाहिजे, कारण इतरांना त्रास होता नये हा नीतीचा नियम समाजात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मान्य केलाच पाहिजे.  विवाहित स्त्रीपुरुषांवर परस्परांव्यतिरिक्त कोणाशीही संबंध न ठेवण्याचा निर्बंध असतो. या निर्बंधाचा अर्थ काय, याचा विचार केल्यास असे दिसते, की विवाहाने त्यांचा परस्परांवर किंवा निदान परस्परांच्या शरीराच्या काही विशिष्ट भागांवर, मालकी हक्क उत्पन्न होतो, पुष्कळ समाजांत हा मालकी हक्क फक्त स्त्रियांवरच उत्पन्न होतो, आणि पुरुषांना हा निर्बंध लागू असतो तेथेदेखील सत्ता पुरुषांच्या हाती असल्यामुळे ते तो धाब्यावर बसवतात. ' याच मुद्द्याला अनुसरून जेव्हा पिडीत तरुणी म्हणते - 'आपण केवळ एकनिष्ठता अन आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी लढत आहोत ' तेव्हा बडबड करणाऱ्या वाचाळवीर पोपटांचा फोलपणा सहज लक्षात येतो . एकीकडे स्त्री शक्ती अन मुक्तीचा उदो उदो करणारे तुझ्या प्रियकराची माफी मागायचा आगाऊपणा करून पुन्हा स्त्री अस्मिता पुरुषी अस्तित्वाला बांधायची . शोमा चौधरी स्वतः एक स्त्री असूनही झालेले प्रकरण संशयास्पद पद्धतीने हाताळायचे म्हणजे सभ्यतेचा बुरखा पांघरून आतून नागव्याने हिंडण्या सारखा प्रकार आहे ! 

                  सदर प्रकरणात काय होईल ते होईल . तो बलात्कार आहे की विशाखा सूची नुसार लैंगिक शोषण आहे हे सिद्ध होईलच . प्रसारमाध्यमांची प्रतिमा मलिन झाली त्याचे काय करावयाचे ? अर्थात एक तरुण तेजपाल म्हणजे संपूर्ण प्रसारमाध्यमे नाहीत . परंतु एक माणूस म्हणजे (त्याच्या समूहापुरता ) प्रसारमाध्यमांचा मानबिंदू वगैरे असतो हा युक्तिवाद आपण इकडे आणायला नको . 'आधी केले मग सांगितले ' हे साधे सोपे तत्व सर्व 'तरुणांनी ' अंगी बाणवले पाहिजे . स्त्री तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा आपण तिला सुरक्षित ठेवू . या आपण ला लिंगभेद नाही . . . तरुण तेजपाल हा  उच्चभ्रू , वलयांकित ,बुद्धीजीवी वगिरे वर्गाचे प्रतिनिधी मानला तर मुलीच्या मैत्रिणीवर हात टाकणाऱ्या या तरुणाचा आदर्श आपण ठेवायचा का आपले लेखन , विचार ,अभिव्यक्ती , समतोल दृष्टीकोन अन विश्लेषण , शालीनता अन सात्विकता या महान गुणांद्वारे तारुण्य ओसरल्यावरही आपल्या विचारांनी कायम चिरतरुण राहणाऱ्या व्यक्तींचा आदर्श आपण ठेवायचा हा निर्णय आपलाच !! 


कर्वे यांचा उतारा http://ekregh.blogspot.in/2012/12/blog-post_24.html?spref=fb येथून कोपी पेस्ट केला आहे 

1 comment: