Wednesday 6 November 2013

उरले केवळ चार डाव !

सचिन च्या निवृत्तीची घोषणा ऐकल्यावर मी अस्वस्थ झालो . जसा जसा तो क्षण जवळ येत आहे तसा मी बेचैन होत आहे . माझे ,आपले कोणीतरी निवृत्त होत आहे असे वाटतंय . मन जुन्या दिवसात ,जुन्या आठवणीत रामतंय . मला शाळेतले दिवस अजूनही आठवतात . 'आई निवृत्त झाल्यावर /सुट्टीवर गेल्यावर ' काय होईल ? हा निबंध मी आईकडूनच लिहून घ्यायचो . माझा आवडता खेळ /खेळाडू यावर पटकन छानसा निबंध लिहून टाकायचो . कारण त्यावेळी आई मला कळली  नवती पण क्रिकेट आणि सचिन मला समजला होता . . लहानपणापासून मला मोठे करणाऱ्या , बाबांच्या अंगावर उड्या मारायला लावणाऱ्या , बहिणींशी पैजा लावायला लावणाऱ्या , अरे किती दंगा करतोस म्हणून आईचा मार खायला लावणाऱ्या सचिनच्या निवृत्तीला उरले केवळ चार डाव  . . . ! 

               आज कोलकाता सजलंय . सचिनच्या १९९ व्या कसोटीचे स्वागत करायला आतुरलंय . एडन गार्डन ने अनेक अविस्मरणीय सामने अनुभवले आहेत . क्रिकेट जगातला दिले आहेत . पण असा 'हृद्य ' सामना अनुभवायची अन  जगाला द्यायची ईडनची कदाचित पहिली अन शेवटची वेळ असेल . . सचिनमय झालेल्या वातावरणातून सचिनला काढून टाकण्याचे काम इडन ला करायचे आहे . केलेली रोषणाई , सजावट , उभारलेले होर्डिंग , सजवलेले मैदान , भावनाधीन प्रेक्षक यांच्या साक्षीने  ठेऊन इतिहास रचणाऱ्या माणसाला इतिहासाच्या पानात कोरून ठेवायचंय . आज सुरु होणारा सामना दोन संघातला नाही . तर अनेक भावनांमधला आहे . असणे आणि नसणे यातला फरक अनुभवण्यातला आहे . क्रमांक चार वरील क्रमांक दहा शेवटचा पाहण्या साठी आहे . (कोलकाता वासियांसाठी ) . या भावनांच्या जत्रेस केवळ भारत आणि वेस्ट इंडीज मधला पहिला कसोटी सामना असे संबोधून चालणार नाही . त्यास सचिनच्या अखेरच्या चार डावातले दोन डाव म्हणून संबोधले पाहिजे . कसोटी क्रिकेट अजून बरेच आहे . . पण सचिन उरलाय केवळ चार डावांपुरता . . . ! 
               
खेळ हा खेळाडूपेक्षा मोठा असतो असे म्हणतात . काही खेळाडू याला अपवाद असतात . खेळामुळे ते नाही तर त्यांच्यामुळे खेळ ओळखला जातो . माझे विधान कदाचित धाडसी असेल पण ते माझ्या पुरते आहे , सचिनने भारतीय क्रिकेटला चेहरा दिला . याचा अर्थ सचिन आधी कोणी 'महान ' फलंदाज झालाच नाही असे नाही . उत्कृष्ठ फलंदाजांची महान परंपरा आपल्या देशाला आहे . सचिनला देशाने आपले मानले . दूरचित्रवाणीच्या प्रसारामुळे सचिन घराघरात पोहोचला . फोडाफोडी करणारा फलंदाज डोळ्यासमोर ठेऊन अनेक काचाफोड फलंदाज गल्लो गल्लीत उदयाला आले . फलंदाजीच्या , तंत्राच्या , शैलीच्या नवीन व्याख्या लिहिल्या . विक्रमांचे विक्रम करून इतर फलंदाजांना आव्हान दिले . आवाहन दिले . प्रेरणा दिली .कोट्यावधी  भारतीयांना आणि अब्जावधी क्रिकेट रसिकांना अभिमानाचे क्षण दिले . यशाच्या शिखरावर असताना खेळाडूने कसे  वागावे या नैतिकतेचे अप्रत्यक्ष धडे दिले . अनेक खेळाडूना घडवले . अनेक खेळाडूंना घडताना पाहिले . स्वतः मध्ये काळानुरूप बदल केले . काळाने स्वतःत घडवून आणलेले बदल स्वीकारले . हे सारे एका सचिन ने केले . . 
             आज सचिन नेहमीप्रमाणेच अपेक्षांचे ओझे घेऊन मैदानात उतरेल . मैदानावरील अन मैदानाबाहेरील प्रेक्षक नेहमीप्रमाणे सचिन सचिन म्हणून घोष करतील . नेहमीच्या चपळाईने तो क्षेत्ररक्षण करेल . नेहमीच्या पद्धतीने तो फलंदाजी साठी उतरेल . नेहमीप्रमाणे देवासाठी देव पाण्यात घातले जातील . . . पण हे संघासाठी नसेल तर ' सचिन 'साठी असेल . . . मानाने कारकीर्द मिरवणाऱ्या तेंडल्याच्या कारकीर्दीचा अखेर सुद्धा मानाने व्हावा . . शतकांचे महाशतक करणाऱ्या खेळाडूने आता शेवटच्या दोन्ही कसोटीत शतके ठोकावीत . गेले काही महिने धावांसाठी सुरु असलेली धावाधाव संपून धावांची आणि शतकांची नेहमीची टाकसाळ उघडावी ही साऱ्यांचीच 'रास्त ' अपेक्षा आहे . यापुढे शतक झाल्यावर आकाशाकडे  पाहणारा अन लगेच गार्ड   घेणारा सचीन ईडन गार्डन ला दिसणार नाही कारण आता उरलेत केवळ चार डाव . . . ! 

No comments:

Post a Comment