Tuesday 5 November 2013

मातीचा किल्ला : भाग तीन

अभिव्यक्ती म्हणजे काय ? अभिजात म्हणजे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी असतील त्यांनी मातीचा किल्ला पहावा . किल्ला हे   माणसाला समृद्ध करणारे , त्याच्या निरीक्षण आणि आकलन शक्तीला वास्तवात उतरवणारे , , वास्तवाहून चार पावले पुढे जाऊन विचार करणारे ,कल्पनेला सत्यतेच्या कोंदणात बसवणारे , येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे , खर्ची पडलेल्या अनेक पिढ्यांच्या कर्तुत्वाची गाथा सांगणारे शिल्प असते . मग तो सह्याद्रीच्या निबिड अरण्यात ,घनदाट जंगलात वर आलेल्या कातळावर घडवलेला अभेद्य गड असो किंवा परसात केलेला काही फुटी मातीचा किल्ला असो , आकार बदलला तरी भाव बदलत नाही . मातीचा किल्ला करणे म्हणजे आपलंच असं स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते . राजेपण जरी शिवाजीचे असले तरी त्यास ते मिळवण्यास सहाय्य कण्याची एक समृद्ध धडपड असते . हि धडपड गेली साडे तीनशे चारशे वर्ष अखंड सुरु आहे . सह्याद्रीच्या कातळात आणि शहराच्या सिमेंटात अजूनही शिवरायांचे स्मरण होते . . पूजा होते . . साधना होते . .  राजेंनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून प्रार्थना होते . ही 'परंपरा ' अनेक पिढ्यांपासून सुरु आहे . याच परंपरेतला एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळीत घडवला जाणारा 'मातीचा किल्ला ' . . .

                           केवळ दगडांचे दगडावर थर रचून आणि त्यावर माती लाऊन किल्ला तयार होत नाही . काहीतरी आकार निश्चित तयार होतो पण तो सार्थकी लागत नाही . हे सार्थकी लागणं किल्ल्याच्या बाबतीत अत्यंत  महत्वाचे असते . कधी रायगडला जा , पावनखिंडीत जा , गेला बाजार शानिवारावर जा . . आयुष्याचे सार्थक झाल्या सारखे वाटते . तिकडील प्रत्येक भिंत , माती , राहिलेले अवशेष एक वेगळाच इतिहास सांगतात . आपण 'योग्य ' गोष्टीसाठी वापरले गेल्याने आयुष्याचे 'सार्थक ' झाल्याचा अभिमान बाळगतात . मिरवतात . आपणही मग मुठभर माती हातात घेऊन कपाळाला लाऊन घेतो . आपल्यासाठी आपल्याच लोकांनी आपल्याच परक्या सारख्या लोकांचे सांडलेले रक्त त्या मातीत हुडकायचा प्रयत्न करतो . हिंदवी स्वराज्य डोळ्यात सामाऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो . असा वारसा असलेला किल्ला ' करून टाकला ' या सदरात कधीही मोडत नाही . किल्ला रचण्या सोबत तो घडवायचा सुद्धा असतो . प्रतिकृती बनवण्याचे काम तुलनेने सोपे असते . विविध कोनातून काढलेले फोटो डोळ्यासमोर ठेवले आणि त्यास कष्टाची जोड दिली की प्रती  किल्ला बनून जातो . कल्पनेतल्या किल्ल्याला वास्तवात आकृती देणे हे मात्र श्रमाचे काम असते . कारण इथे समोर केवळ दगडे ,विटा ,माती असते अन त्यातून आपल्याला काय घडवायचे आहे त्याचे मनात चित्र तयार असते . . मातीत अंकुरु पाहणाऱ्या अभिव्यक्तीचे , अभिजाततेचे , सर्जनशीलतेचे ते बीज असते . . राजेंनी जरी साडे तीनशे किल्ले बनवले असले तरी त्यांच्या बाळगोपाळ मावळ्यांनी लाखो किल्ले घडवले आहेत . . इटुकले पिटुकले , सहज भेदता येतील असे , अनुकूल भौगोलिक जागेवर अन परिस्थितीत बनवलेले त्यास साडे तीनशे किल्ल्यांचे महत्व एका दृष्टीने नाही . पण . . . . रस्त्या रस्त्यावर , गल्लो गल्लीत , घरा घरात , गावा गावात , मना मनात शिवशाही रुजवण्याचे सामर्थ्य मात्र निश्चितच आहे . . .
                              या किल्ला करायच्या पद्धतीत आता बराचसा फरक पडला आहे . मी एकदम लहान असताना उभी दगडे रचून , आडव्या फरशा घालून त्यावर चिखलाचे थर चढवून किल्ला बनवायचो . मी थोडा मोठा झाल्यावर दगड रचून त्यात आडव्या काठ्या घालायच्या आणि वरून मातीत भिजवलेले पोते घालायचे म्हणजे हवा तसा आकार मिळवता येतो , माती कमी लागते अन वेळ वाचतो . या दोन पद्धतीने मी किल्ला केला . आता तो कसा करतात मला माहीत नाही . येता जाता मी करत असलेल्या किल्ल्यांच्या निरीक्षणातून एक गोष्ट जाणवते , किल्ले बनवायची पद्धत जरी बदलली असली तरी किल्ला अजून तसाच आहे . हिरकणी बुरुज , पायथ्याशी रामदास स्वामी यांची दोन उभ्या विटा वर एक आडवी वीट या पद्धतीने केलेले मंदिर , गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज अफजल खान यांच्यातील युद्धाचा एक पुतळा , दोन बुरुज करून त्यावर ठेवलेल्या तोफा असे स्वरूप कितेक वर्षे कायम आहे . त्यात काळानुरूप नाविन्य येत नाही . व्यायसायिक किल्ला निर्माते काहींबाही करतात पण  ती मूळ किल्ल्याची  नक्कल असल्याने त्याची नकळत मूळ किल्ल्याच्या भव्यतेशी तुलना  होते अन समोरील मातीचा किल्ला खुजा वाटायला लागतो . अर्थात हवा तसा इतिहास बदलून पाहिजे तसा किल्ला बदला असे माझे म्हणणे नाही . . .
                            शिवरायांचे आयुष्य केवळ किल्ले उभे करणे आणि जिंकणे यापुरते मर्यादित नवते . तो केवळ स्वराज्य निर्मितीतीला एक भाग होता . अर्थात या किल्ल्यांवरच स्वराज्य मजबूत उभे राहिले हा युक्तिवाद सुद्धा मान्य . शिवरायांचे आयुष्य म्हणजे एक अभेद्य ,चिरेबंदी किल्ला होता . त्यातील सर्व प्रसंग हे त्यांच्या संस्कारी पण कणखर मनाचे प्रतिक होते . हेच प्रसंग निवडून त्यावर आधारित किल्ले आता व्हायला हवेत . अगदी स्वराज्याची रोहीडेश्वर मंदिरात शपथ घेतल्या पासून ते आगरायेथून सुटका होई पर्यंत . तो प्रसंग सामरिक असो वा मुत्सदिक त्यांचे सादरीकरण झाले पाहिजे . नवीन कल्पना आणि संकल्पना रुजल्या , रुळल्या आणि स्वीकारल्या पाहिजेत . . परंपरा जपत असताना कुठेतरी नवीन पायंडे पाडले पाहिजेत . . शिवाजी आपल्याला केवळ माझ्या किल्ल्यान्पुर्ते मर्यादित रहा असे सांगत नाही तर त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घ्यायला सांगतो . . तेच प्रेरणादायक प्रसंग आपण मांडले पाहिजेत . . . ते किल्ल्या इतके भव्य दिव्य नसतील , पसरलेले नसतील पण कधीतरी आकार आणि विस्तारा पेक्षा आशयाला आणि खोलीला महत्व दिलेच पाहिजे . . बरोबर न ?

रवींद्रनाथ टागोर म्हणतातच ,
                      त्या अनोळखी प्रदेशात केव्हातरी
                                             तुझा संदेश आजही दऱ्या खोऱ्यात गुंजतो आहे
                                             तुझे नेत्र आजही अनागातला न्याहाळत आहेत
                                              ते स्वप्न काय असेल ?
                                               हे मानवी देहधारी साधुपुरूषा
                                               तुझी तपस्या ,ध्येय ,कार्य
                                                जणू चिरंतनाला आव्हान देत आहे !! ""
क्रमशः 

आधीचे भाग - 

मातीचा किल्ला : भाग एक - http://spaandaan.blogspot.in/2013/10/blog-post_31.html

मातीचा किल्ला : भाग दोन - http://spaandaan.blogspot.in/2013/11/blog-post.html

No comments:

Post a Comment