Sunday 6 May 2012

जीवघेणे प्रेम ...

प्रेमामध्ये अजब शक्ती असते असे मानले जाते ...ज्यांनी केले आहे त्यांनी अनुभवले असेल ...ज्यांनी  अजून अनुभवले नाही त्यांनी ऐकले असेल ...आपल्या जोडीदारास त्रास होतो आहे पहिले कि सच्चा प्रेमी कसा पेटून उठतो याचे प्रत्यंतर अनेकांना आलेले असेल ..मुळात प्रेम सोपे नसतेच कधी ...युद्ध आणि प्रेम यात फरक तो काय ? न धड विजयाचा आनंद साजरा करता येत न धड पराभवाचे दुक्ख करता येत कारण जिंकणारी पण आपलीच व्यक्ती आणि हरणारी पण आपलीच ...आधी स्वतःशी युद्ध कि त्याला/तिला विचारू कि नको ....त्यानंतर मन आणि बुद्धी मधील युद्ध हो म्हणू कि नको ... नंतर समाजाच्या नजरांशी युद्ध " वडील किती चांगले आणि हे बघा लफडेबाज "....घरच्यांशी युद्ध " हाच/हीच मिळाली होती का आख्ख्या जगात ?" अधून मधून चालू असणारी जोडप्यातील शीत युद्ध आणि खोटे खोटे ब्रेक अप ...या सर्वातून जात असताना अंगी एक मानसिक आणि शारीरिक कणखरता येते कि या सर्व पातळीवर माझ्यासाठी  लढत असलेल्या जोडीदाराची जबाबदारी माझी आहे ...त्याचे/तिचे समाजापासून संरक्षण करायचे कर्तव्य माझे आहे ... भावनिक खच्चीकरण करणाऱ्या कितीही घटना घडल्या तरी आधार देण्याचे काम माझे आहे आणि कितीही संकटे आली तरी त्याला/तिला पाठीशी घालून त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य माझ्यात आहे ... कारण कोणाचे तरी माझ्यावर प्रेम आहे ,विश्वास आहे ,आपुलकी आहे ,अपेक्षा आहेत आणि कोणाचेतरी आयुष्य माझ्या आयुष्याशी जोडलेले आहे !! हे सर्व होत असताना विवेक जागृत असणे खूप महत्वाचे असते ... प्रेमाच्या धुंदीत आणि तारुण्याच्या मस्तीत काही अशा चुका होतात कि नंतर पश्चाताप करण्यापलीकडे हाती काही रहात नाही .....
                               दोन एक दिवस झाले असतील ...भास्कर समूहाचा दिव्य मराठी वृतपत्र वाचत असताना एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले ...आणि ती बातमी पुण्यातील असल्याने डोळ्यात आणखीनच भरली ... प्रत्येक शहराची एक सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख असते आणि त्याला साजेसे .अनुरूप वर्तन त्या शहरातील लोकांनी करावे अशी नैसर्गिक अपेक्षा समाजाची असते ..पण काही घटना अशा घडतात कि हेच का ते शहर असा प्रश्न आपणास पडू लागतो कारण पुणे आणि पटना यात केवळ राज्यांचा ,सीमेचा ,काही किलोमीटर चा आणि काही तासांचा फरक नसून मानसिकतेचा आणि संस्कृतीचा फरक आहे ..म्हणूनच पुण्यात काही असभ्य घटना घडतात तेवा सच्च्या पुणेकर माणसास कोणी चितळ्यांच्या बाकरवडीस आणि आंबा वडीस "भंकस " म्हंटल्यावर जितक्या वेदना होतात तितक्याच वेदना भावनाप्रधान माणसास अशा बातम्या वाचून होतात ...सायंकाळची वेळ होती ...पुणे विद्यापीठात सर्वत्र साम सुम झाली होती ...दोन प्रेमी जीव कोणत्यातरी झाडाच्या मागे विसावले होते ...प्रेम व्यक्त करायच्या अनेक भाषा असतात त्यातील समाजाची नावडती पण प्रेमी युगुलांच्या आवडत्या भाषेत प्रेम व्यक्त होऊ लागले ...जागेचा .जगाचा आणि समाजाचा विसर पडून प्रेमात आकंठ बुडालेल्या जीवना सुरक्षा रक्षकाने हटकले ... संधीचा फायदा घेऊन ५००० रुपयांची मागणी केली पण अखेर प्रकरण ५०० रुपयांवर मिटले ... युगुल बाईक पर्यंत गेल्यावर प्रेमवीर माझ्याकडे पेट्रोल टाकायला पैसे नाही आहेत १०० रुपये मला द्या म्हणून सुरक्षा रक्षकाकडे मागयावास गेला असता त्याने देण्यास नकार दिला ...आताच्या पिढीस "नाही " हा शब्द ऐकायची सवय नसल्याने " त्याची सटकली " आणि सरळ त्या रक्षकास बंदुकीच्या गोळ्या घालून त्यांनी पोबारा केला ....त्यांनी प्रेम केले तिने प्रेम केले ....यात त्याचा जीव गेला !!
                                 प्रेम करणे हा काही गुन्हा नाही ..आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात काही क्षण एकांतात व्यतीत करणे यासम दुसरे सुख नाही ...आता एकांत किती आणि कोणत्या प्रकारचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ... कारण काही जणांचे मंद वाऱ्यात चांदण्याच्या प्रकाशात  प्रिय व्यक्तीच्या सहवासात आणि रोमांटिक संवादात  फ़क़्त हातात हात घेऊन बसल्याने समाधान होते तर काही जणांचे ........असो !! काहीही असले आणि कसेही असले तरी समाजाचे काही नियम आपण पाळलेच पाहिजेत ...कोठे ,कसे ,केव्हा आणि काय वागावे आणि बोलावे यावरून माणसाचे "शिक्षण आणि संस्कार " ठरत असतात . यास प्रज्ञापराध असेच म्हणता येईल ...आपण जे वागत आहोत ते चुकीचे आहे हे माहित असते पण त्यास थांबवणे जमत नसते ...दोघांच्या प्रेमात एकाचे आयुष्य उध्वस्त झाले ,दोघे भावी संसाराच्या आणाभाका घेत असताना एकीचा संसार मोडला गेला ... काय माहित किती दिवस ते जोडपे एकत्र राहील पण अनेक वर्षे एकत्र राहणाऱ्या एका जोड्प्यामधील जोडीदार कायमचा निघून गेला ..क्षणिक आनंदासाठी आणि वासनायुक्त प्रेमासाठी एका स्त्रीच्या आयुष्यात कायमच्या यातना लिहिल्या गेल्या ... दुसर्याचे आयुष्य उध्वस्त करून त्यावर आपल्या सुखाचे इमले बांधणाऱ्या प्रेमी युगुलास माझ्या लेखी तरी काही किंमत नाही ....

1 comment:

  1. किंमत द्यायसारखी लायकी पण नाहिये त्याची !!!!!!!!

    ReplyDelete