Saturday 19 May 2012

चित्रामागचे व्यंग !!


 "..इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोष दिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्याला आधी इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सीमारेखा कोणती याचे तारतम्य हवे .घाव असा असावा कि ,मरणाराने मरता मरता मारणाराचा हात अभिनंदनासाठी हाती घ्यावा .शेतातले काटे काढताना धान्याची धाटे मोडणार नाहीत याची खबरदारी  घ्यावी  लागते ..व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे  स्वरूप प्रथम पारखता आले पाहिजे .व्यंगचित्रकाराने प्रथम हसवले पाहिजे .थट्टेमागे आकस आला ,कुचाळी आली कि ते व्यंगचित्र निर्मल पाण्यात रंग न कालवता गटार गंगेच्या  पाण्याने काढल्याची घाण येते .उत्साहाच्या आणि गम्मत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडायच्या भरात आपणा  सर्वांच्या हातून मर्यादेचे उल्लंघन होते ..." व्यंगचित्रात व्यंग राहू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ते अत्यंत मार्मिकपणे भाई १४ ऑगस्ट १९६३ रोजी ठाकरे बंधूना  लिहिलेल्या पत्रात सांगतात ... पण लोकांच्या मानसिकतेत जर व्यंग असेल  तर सर्व नियम पाळूनही व्यंगचित्रकार कसा बदनाम होतो याचे अनेक लेख सध्या जवळपास सर्वच वृत्तपत्रे छापत आहेत आणि संसदेस ६० वर्षे पूर्ण झाल्याचा बेगडी आनंद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देऊन साजरा केला जात आहे .... येणाऱ्या भयावह आणि साचेबंद भविष्यकाळाची एक झलक सध्या दाखवली जात आहे ..
                                 प्रत्येक देशाच्या लोकांची एक मानसिकता असते ,एक जीवनशैली असते ..कितीही प्रयत्न केला तरी ती बदलता येत नाही आणि मतांच्या राजकारणामुळे ती बदलायची कोणाची पवित्र भावनाही नसते ...लहान असताना इसापनीतीमध्ये मेंढ्यांची एक गोष्ट वाचली होती ...त्या गोष्टीमध्ये मेंढ्यांचा एक कळप प्रमुख असतो आणि त्याच्या मागे इतर सर्व मेंढ्या चालत असतात ...आपल्या भविष्याची आणि आयुष्याची दोरी त्यांनी त्या प्रमुखाकडे  दिलेली असते ...आणि केवळ "अनुकरण " करणे यापलीकडे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे किंवा आपल्यालाही काही मते /विचार आहेत याचा इतरांना विसर पडलेला असतो ..त्यामुळे प्रमुख नदीत गेला तरीही त्याच्या मागे आणि खड्ड्यात पडला तरीही त्याच्या मागे ...उत्क्रांती होऊन अनेक वर्षे झाली ..झाडावरून माणूस  घरात आला तरी त्याची मागास मानसिकता अजून बदलली नाही ...आपल्याला सोयीचा वाटतो असा कळप  निवडणे ...कळपाच्या प्रमुखास आपला भाग्यविधाता ठरविणे आणि त्याच्या मागून अंध पणे वाटचाल करणे ...इष्ट काय आणि अनिष्ट काय यावर विचार करण्याची सारासार विवेक बुद्धी आपण गमावून बसतो आणि त्यामुळेच आपली बुद्धी खरच विकसित झाली आहे का असा प्रश्न बुद्धीस पडू लागतो ..कोणताही समाज /देश पुढे जाण्यात किंवा सुधारण्यात चुका दाखविणाऱ्या व्यक्तींचा आणि त्या चुकांचा त्रयस्थपणे विचार करून ,त्यातून मार्ग काढून पुढे जाणाऱ्या व्यक्तींचा मोठा हात असतो ...पण दुर्दैवाने काही देशांना असे "हात " मिळतात कि परकीय शक्तींविरुद्ध दोन "हात " करण्यापेक्षा स्वकियांशी चार "हात " करण्यात धन्यता मानतात नको तिकडे बोट चेपे पणा करून कातडी बचाऊ धोरण स्वीकारतात त्यामुळे "हाताच्या " केवळ एका चित्राने प्रबोधन करणाऱ्या एका कलाकृतीस ,कलाकृती घडवणाऱ्या व्यक्तीस स्व "हाताने " दुबळ्या आणि पराभूत "हत्तीच्या " पायाखाली देण्याची नामुष्की येते ...
                              आजूबाजूस ज्या कौतुकास्पद किंवा निंदनीय घटना घडत असतात त्या समाजासमोर विवेकाने आणि पूर्वग्रहदुषित वृत्ती टाळून आणणे हे पत्रकाराचे काम असते ...आणि भोवतालची परिस्थिती एका छोट्या कॉलम मध्ये चित्रित करून पेपर ची जागा ,छाप खान्याची शाई, लेख लिहिण्यासाठी करावा लागणारा शाब्दिक खेळ आणि वाचकांचा वेळ वाचवणे हे व्यंग चित्रकाराचे कसब असते ..असेच महान व्यंगचित्रकार शंकर यांच्या आंबेडकर यांचेवरील चित्रावरून सध्या लोकसभेत काहूर माजले आहे ..भारताची घटना लिहायचे काम बाबासाहेब आंबेडकर अतिशय  संथगतीने  करत असताना नेहरू त्यांना घटना लवकर लिहिण्यासाठी आग्रह करत आहेत असा धागा पकडून शंकर यांनी १९४९ मध्ये आंबेडकर गोगलगायीवर ( ज्याचे नाव संविधान असे आहे ) बसून पुढे जात आहेत आणि मागून नेहरू हंटर  उगारून गती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा आशयाचे चित्र प्रसिद्ध झाले होते ..यावर आंबेडकर यांनी गती संथ असल्याचे मान्य करून घटना लवकर पूर्ण करायचे आश्वासन देऊन विषय संपवला होता पण कुसुमाग्रज म्हणतात तसे महापुरुषास मरण दोनदा असते एकदा वैऱ्याकडून आणि दुसऱ्यांदा भक्तांकडून ...अनेक वर्षांनी अखेर बाबासाहेबांचे भक्त जागे झाले आणि महापुरुषाचा पराभव करण्यास झटू लागले ...सदर व्यंगचित्र NCERT (national council of education research and training ) कडून संमत होऊन CBSC च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे ..५ वर्षापासून आणि सुमारे १५ राज्यात हे पुस्तक शिकवले जात असताना आजच यावर आक्षेप घेण्याचे कारण काय ? आणि हि पुस्तके कोणत्याही "ग्रेड छापखान्यात " सुदैवाने छापली जात नाहीत ..२००५-२००७ या काळात पुस्तके तयार करण्यात आली ..सदर पुस्तके तयार करताना सरकारी सदस्य ,विविध राज्यांचे प्रतिनिधी ,शैक्षणिक तत्ज्ञ यांच्या सल्ल्याने तयार करण्यात आली होती आणि नंतर NATIONAL MONITORING COMMITTEE  समोर ठेऊन २००६ सालापासून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली ..सदर कालखंडात कोणाशी आक्षेप घ्यावा वाटला नाही ..खुद्द आंबेडकर यानाही त्यात काही आक्षेपार्ह्य वाटले नाही तर ज्यांनी घटना लिहिली त्या घटनेचा अनादर करून कामकाज बंद पाडायचे कारण काय ?
                            राजकारणात तुमचे राजकारण कसे आहे याहून तुमचे राजकीय "उपद्रव मूल्य " किती आहे यावर बरीचशी "माया " आणि सत्तेची "ममता " अवलंबून असते ..त्यामुळेच मधूनच काहीतरी "आठवले " असे वाटते ...आणि मग हे सर्व मिळून कपि(ल) स उड्या मारायला भाग पडतात ...उत्तर प्रदेश मध्ये आलेले दारूण अपयश ,महायुती मध्ये प्रवेश करूनही न मिटलेला शनी दोष आणि सच्चा आंबेडकर प्रेमी कोण याची चाललेली चढाओढ यामुळे मायावती यांनी संसदेत हा मुद्दा उकरून काढला ...कारण नसताना दलित समाजास मानापमानाच्या गोगल गायीवर बसवून आपल्या जखमी  हत्तीच्या तुटलेल्या सोंडेने ओढायचा यशस्वी डाव खेळून गेल्या ..मतांच्या राजकारणासाठी आपण काय करू शकतो आणि वैचारिक दृष्ट्या आपण अजूनही किती मागास आहोत याचा पुरावा जणू या गोंधळाने दिलेला आहे .. पळशीकर यांच्या पुणे येथील कार्यालयावर झालेला भ्याड आणि निंदनीय हल्ला हे जर आंबेडकर चळवळीचे प्रतिक असेल तसेच हा दलित समाजाचा चेहेरा असेल तर मतांचे राजकारण थोडाकाळ बाजूला ठेऊन कडक पावले उचलली पाहिजेत ...व्यंग म्हणजे हसवणे /थट्टा असा मर्यादित अर्थ आणि संकुचित विचार घेऊन पुढे जात असताना असे "राडे" होणे स्वाभाविक आहे ..त्यातून सपा आणि बसपा यांच्यात खरे आंबेडकर प्रेमी कोण हे सिद्ध करण्यासाठी चालू असलेली चढाओढ तसेच त्यांच्या प्रवक्त्यांकडून येत असलेली विधाने हि आधीच असंघटीत असलेल्या आंबेडकरी जनतेला आणखी असंघटीत करणारी आहे ..भारतात अभिव्यक्ती स्वतंत्राचा बळी देण्याची हि काही प्रथम किंवा अंतिम घटना नाही ..आणीबाणी च्या वेळी इंदिरा गांधी यांनी सर्व प्रसारमाध्यमांना आपल्या "हातात " ठेवले होते ..आणि याच वेळी अभिमानी शंकर यांनी आपले "शंकरस विकली " बंद केले होते ...समाजात जे काही अनुचित चालू आहे आणि ज्यात सत्य आहे ते समोर आणणे हे पत्रकाराचे कर्तव्यच आहे..ममता यांनी घातलेला गोंधळ तर अगदीच ताजा आहे  ..ठराविक जाती /धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतील म्हणून काही लिखाण /प्रबोधन झाले नाही तर देशासमोर वेगळ्या प्रकारच्या समस्या उभ्या राहतील ..
                            कोणत्याही व्यक्तीमध्ये कधीच व्यंग नसते ...शारीरिक व्यंग असणे हा सहानुभूतीचा विषय असतो पण मानसिक व्यंग असणे चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असतो ..कारण शारीरिक व्यंग त्या व्यक्ती पुरते मर्यादित असते पण मानसिक व्यंग संपूर्ण समाजास व्यापून टाकते .. असे मानसिक /परिस्थितीनुरूप आलेले व्यंग/कमतरता  हुडकून त्यावर भाष्य करणे म्हणजे गुन्हा असतो का ? आंबेडकर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व एका चित्रामुळे बदनाम होण्यासारखे आहे का ? त्यांनी त्यांच्या हयातीत सदर व्यंग चित्रावर दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या वैचारिक ,बौद्धिक आणि मानसिक उंचीची साक्ष देते तर सध्या त्यांचे नाव घेऊन हौदोस घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वर्तनातून वैचारिक क्षुद्रतेची , असंस्कारी तत्वांची आणि प्रबोधनाच्या अभावाची साक्ष देते ..भारतात शंकर ,बापू ,सुधीर दार, आर .के ,ठाकरे यांसारख्या महान व्यंग चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून प्रस्थापित करंट्या समाज व्यवस्थेला जागे करण्याचे कार्य कितेकदा केले आहे ...अजून काही वर्षांनी असेच कोणी उठून दंगा केला आणि १ -१ चित्र असेच तडीपार होत गेले तर हाती काय राहील ? त्यामुळे न व्यंग आंबेडकर यांचे अंगी होते ,न शंकर यांचे अंगी होते , न सदर चित्रात आहे .......व्यंग आहे ते समाजाच्या मानसिकतेत !!
                                                                            .

No comments:

Post a Comment