Tuesday 15 May 2012

भ्रष्टाचार माझी भूमिका .....



त्यांनी पदर ओढला म्हणून तिने पातळ सोडले खरा प्रकार एवढाच झाला या विंदा यांच्या विरुपिकेमधील एक ओळ खूपच बोलकी आहे " पदर कोठे संपतो आणि पातळ कोठे सुरु होते हे सांगणे कठीण आहे वाऱ्याला विचारा" असेच काहीसे देशात सध्या सुरु आहे ..आचार कोठे संपतो आणि भ्रष्टाचार कोठे सुरु होते हे निश्चितपणे कोणासही सांगता येत नाही एक म्हणतो १२१५ अ १९५० ब १९७५ क्ष तर दुसरा म्हणतो १२५० ब १५५० अ १९५०ज्ञ .... त्यामुळे अशा जटील प्रश्नाची उकल करायची असामान्य कामगिरी वाऱ्यावर सोपवण्यात येते ...शक्तिमान पण अबोल ,वेगवान पण लहरी आणि निष्पाप पण अबोल असा वारा काहीच बोलत नाही म्हणून कोणी म्हणतो ओढ्णारेच गुन्हेगार कोणी म्हणते अरे यार मजा आला तर कोणी म्हणते गुन्हा शोधणारेच गुन्हेगार या सगळ्या गुंत्यात  त्यांनी पदर ओढला का तिने पातळ सोडले ? खरा प्रकार काय झाला हा  विषय वाऱ्यावरच राहतो ...आणि भूमिका न घेतल्यामुळे अखेर  सोडणारे व ओढणारे मोकाट हिंडू लागतात .... या वाऱ्याच्या भूमिकेतच सध्या सामान्य माणूस वावरत आहे ... तो काही बोलतच नाही घेतलेली भूमिका व्यक्त करत नाही आणि व्यक्त केलेल्या भूमिकेवर ठाम राहत नाही त्यामुळेच भ्रष्टाचार आज आपल्या देशाला आतून पोखरत आहे ...या प्रचंड आणि अखंड देशात श्री कृष्णानी सांगितल्या प्रमाणे कोणीतरी महान पुरुष अवतार घेईल आणि या समस्येतून आपली सुटका करेल अशा भाबड्या आशेवर राहून मूकपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालून कधी काळी रोपटे असलेल्या भ्रष्टाचाराचा आज इतका मोठा वटवृक्ष झाला आहे की तो संपूर्णपणे उखडून टाकणे श्री ना जमेल का नाही याचीही शंका आहे ...कारण या वृक्षाची मुळे खोलवर रुजलेली असतात आणि पारंब्या जमिनीत रुजल्या की पुन्हा एक वृक्ष तयार होतो आणि अशा वृक्षांची मालिका तयार झाली आणि त्याची भव्यता दृष्टीस पडली की कधी काळी आपल्या बागेत आपल्या सोयी साठी आपणच लावलेल्या वृक्षाची आपल्यालाच भीती वाटू लागते ....
                          मराठी सारख्या समृद्ध भाषेत "अज्ञानात शहाणपण " अशी एक म्हण आहे ... अनेक वर्षे अनेक शतके हा भ्रष्टाचार चालूच आहे पण लोकांना याची जाण असूनही तीव्रता माहित नसल्याने "हापिसात गेलो आणि २ रुपये देऊन काम करून घेतले बघ " असे संवाद रंगवून सांगणारे आजोबा आणि " आज टेंडर पास करायला २ कोटी घेतले साहेबांनी " असे सांगणारा नातू ... म्हणजे काही पिढ्यांच्या अंतरात २ रुपये ते २ /२०/२०० कोटी हा प्रवास आताच्या पिढी कडे इतका पैसा आहे म्हणून आनंद साजरा करायचा का नैतिकता आणि मुल्ये यांचे किती वेगाने अधापतन झाले म्हणून द्वेषयुक्त हळहळ व्यक्त करायची असा संभ्रमावस्था निर्माण करणारा आहे ...गरिबीत जन्म झालेली कर्जात वाढलेली आणि चक्रवाढ व्याज फेडण्यात संपलेली पिढी आता संपली ..आता आहे ती गर्भ श्रीमंतीत वाढलेली भ्रष्टाचाराला सरावलेली आणि संस्कारापासून दूर गेलेली पिढी .. ये रे येरे पावसा तुला देतो पैसा पासून सबसे बडा रुपैया असा व्यावहारिक प्रवास भ्रष्टाचाराच्या गाड्यावर बसून वेगाने करणारी आणि त्याची खंत नसलेली जनता ..अण्णा हजारे यांनी या प्रश्नाला वाचा फोडून भ्रष्टाचाराची तीव्रता दाखवून दिली नसती तर भ्रष्टाचार हा विषय केवळ स्पर्धा आणि चर्चा यापुरताच मर्यादित राहिला असता ..कारण ज्याप्रमाणे जिभेच्या शेंड्यावर असलेल्या मधाचा थेंब चाखणे अशक्य तसे सरकारी अधिकाऱ्याच्या हाती असलेल्या सरकारी मालमत्तेचा अपहार न होणे असंभव ,ज्याप्रमाणे  जलाशयातील मत्स्य पाणी पितो का नाही हे माहित करणे अशक्य त्याप्रमाणे सरकारी लोकांना लाच घेणे अशक्य असे चाणक्य नीती सांगते ..१९४८ मध्ये झालेल्या जीप खरेदी मधील ८० लाखाच्या भ्रष्टाचारा पासून ते २०१२ मधील कोळसा खाणींच्या १०७०००० कोटींच्या भ्रष्टाचारा पर्यंत सामान्य माणूस फ़क़्त पाहत आला ,सहन करत आला आणि जमेल तितका हातभार लावत आला त्यामुळेच आज परदेशी बँक मध्ये भारताचा ५०० अब्ज डॉलर पैसा साचून आहे ...
                           हे होत असे पर्यंत सामान्य माणसाने म्हणजे मी काहीच कसे केले नाही ? हा आरोप किती वर्षे सहन करायचा ? न्याय मागायचा कोणाकडे ....आता न्याय मिळवण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात ३३ % राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी ,३० % पोलीस अधिकारी भ्रष्ट असतात ...नाही समजत मला "कॅग " चा अहवाल ..मला समजतो तो पैशाच्या इंधनावर चालणारा सरकारी पांगुळ गाडा, कायदे /नियम /हक्क असे जड शब्द नाही समजत मला ..मला समजतात ते प्रसाद,नैवेद्य ,गुळ खोबरे ,मिठाई असे शब्द ..काय करायचं आहे मला यु.पी .ए आणि एन .डी.ए मधला फरक जाणून ? सर्वच बरबटलेले  ..नाही समजत मला काळा पैसा आणि पांढरा पैसा यातील फरक  मला समजते  साहेबाला खुश करणारी नोटसुंदरी. . का हिशेब ठेऊ मी किती पैसा गेला आणि किती कोटींची जमीन कोणी लाटली याची मला चिंता आहे माझीच जमीन मलाच मिळण्यासाठी साहेब किती लाटतो याची ...सामान्य माणूस आहे मी . नका म्हणू मला स्वार्थी किंवा देशाची काळजी नसलेला ,नका दाखवू स्वप्ने हा पैसा हाती आला तर काय होईल याची कारण पाहिलेली स्वप्ने पूर्ण करायला पण पैसे चारावे लागतात .. पेपर मध्ये चापून येत असलेले घोटाळे आणि रक्कम पाहून हळ हळ व्यक्त करणारा पण उघडपणे बोलायला घाबरणारा ... सकाळी एखाद्या नेत्या विरोधात भूमिका घेतली तर संध्याकाळी माझे काय होईल या भीती मध्ये वावरणारा ... नका म्हणू मला पळपुटा किंवा भित्रा ..कारण दरवर्षी दारी आलेले पैसे नाकारून दबाव  झुगारून नव्या आशावादाने मी मतदान करतो पुन्हा अपेक्षाभंग पदरी पाडून घेण्यासाठी ..घाबरतो मी "खादी " ला आणि "खादी " ला ...सहन होत नाही आणि उघडपणे व्यक्त करता येत नाही अशा कात्रीत सापडलेला मी ..शासकीय कामासाठी माझे पालक अंगावरील सोने विकून कसे पैसे उभे करतात हे लाचारपणे पाहिलेला मी .. तुझ्या मताने काय होणार आहे ?पुढारीपणा करायची हौस आहे का ? अभ्यास नाही का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत भ्रष्ट यंत्रणेशी लढत असलेला मी ..असे कितेक "मी " या समाजात वावरत आहेत पण  हे सर्व "मी " एकत्र येऊन "आम्ही " होत नाही ही शोकांतिका आहे ..लोकांना संघटीत करू पाहणारे स्वत मात्र असंघटीत आहेत आणि मूळ भूमिकेपासून भरकटत आहेत हे दुर्दैव ..पण म्हणून "ठेविले अनंत तैसेची राहावे ...." अशी परिस्थिती आता राहणार नाही..काळोखाचा आणि निराशेचा  सागर कितीही अथांग असला तरी त्या सागरात प्रकाशाचे बेट निर्माण निर्माण करायची क्षमता माझ्यात आहे ...करण्या सारखे बरेच असते नसते ती फ़क़्त इच्चा शक्ती ...मी वाऱ्या सारखा शक्तिमान आहे ,वेगवान आहे ,जीवनावश्यक आहे फ़क़्त अबोल ,अदृश्य आणि लहरी आहे ...मी भारताचा एक सुजाण नागरिक आहे ...  ... मी लढणार ,मी झुन्झ्णार ,मी भांडणार ,मी लिहिणार ,मी व्यक्त होणार ,मी भूमिका मांडणार ,मी विरोध करणार आणि मी भ्रष्टाचार नाही करणार कारण आता मला आणि माझ्या भूमिकेला महत्व आहे ...कोणीतरी माझ्या भूमिका जाणून घ्यायचा प्रयत्न करतंय, कोणीतरी माझ्याकडून काही कार्य होईल अशी अपेक्षा ठेवतय ...कृष्णाचा अवतार कधी जन्म घेईल मला माहित नाही पण त्या दिव्य अवतारास जन्म घ्यावा वाटेल असे कार्य करणे माझ्या हाती आहे हे मला माहित आहे ...कारण कुसुमाग्रज म्हणतातच ..
लढाईच्या अंतिम क्षणी 
संसाराचा कोश तोडून 
सामान्याच असामान्य होतात 
लढाई जिंकतात 
आणि पुन्हा कोशात जाऊन 
सामान्य होतात 
विजयाची मिरवणूक ते परस्थ्पणे 
आपल्या घराच्या खिड्क्यातूनच  पाहतात 

3 comments:

  1. start is Excellent. has a very good flow till end.. superb

    ReplyDelete
  2. निराश होउ नकोस.
    एक माणुस काय करू शकतो याची अनेक उदाहरणे आहेत.
    प्रयत्‍न करत रहा ( अपेक्षा न ठेवता )
    सुरवात तर स्वतः पाहुनच करावी लागेल.

    ReplyDelete
  3. Certainly you have something which will keep people in check.........

    ReplyDelete