Wednesday 9 May 2012

पोरकट विरोध

तसे कालच अमीर खान आणि त्याचा नवीन शो "सत्यमेव जयते " यावर लिहिल्यावर आज पुन्हा त्याच विषयावर लिहिणे म्हणजे तोच -तोच पणा वाटेल अनेकांना पण आजच्या दिवसात मी जे काही पहिले ,वाचले आणि अनुभवले ते भयंकर होते ... आपण जसे आहोत तसा समाज असला पाहिजे किंवा आपल्या विचारसरणीशी मिळतीजुळती माणसे आपल्या आजूबाजूस असली पाहिजेत अशी अनेक सामान्य लोकांची सामान्य अपेक्षा असते .. लहानपणापासून "आपण चांगले वागले कि समोरचाही चांगला वागतो " अशी शिकवण आपल्याला दिली जाते पण ज्या तत्वांच्या आणि सिद्धांताच्या बुरुजात आपल्या विश्वाचा आणि मुल्यांचा गड सुरक्षित आहे असा आपणास विश्वास असतो तेच बुरुज त्रयस्थपणे परिस्थितीचा विचार केला कि वेगाने ढासळू लागतात आणि आपण आपल्या मुल्यांसह आणि संस्कारासह उघड्यावर पडतो किंवा पडलो आहोत असा समोरच्याचा गैरसमज होतो .. आपल्यासमोर चालू असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला पटलीच पाहिजे असा अट्टाहास कोणाचाही नसतो ..पण विरोध करतानाही त्याला तत्विक्तेचा आधार हवा हे सत्य अतिरेकी विचाराचा माणूस दरवेळी विसरतो आणि चांडाळ चौकटीमध्ये आपली हवा आणि जगामध्ये आपले हसू करून घेतो ... आज अमीर खान च्या बद्दल प्रतिक्रिया पाहताना ( विविध फेसबुक ग्रौप वरील ) मला असाच अनुभव आला .. मी कोणत्या लोकात वावरत होतो याचा खेद वाटला ....त्यांच्या विरोधाचे मुद्दे असे ....

मुद्दा १.... " अमीर खान मुसलमान आहे हि त्याची चूक आहे " 

मुसलमान लोक हे देशाचे शत्रूच असतात आणि ते कधीही देश हिताचा विचार करूच शकत नाहीत म्हणून त्यांचा द्वेष करून आपण फार मोठे धर्मवीर आहोत असे दाखवण्याची अनेकांना खुमखुमी असते ... आम्हाला काय सुधारणेशी आणि बदलाशी मतलब मग तो कोणी हिंदू करो व मुस्लीम व अन्य धर्माचा त्याने केलेले कार्य कमी होते का ? म्हणजे त्यांना समाजासाठी काही करायचे आहे ..समाजसेवा करायची आहे ..समाजातील वाईट गोष्टींबद्दल बोलायचे आहे आणि जागृती करायची आहे अशा प्रत्येक व्यक्तीने जन्माआधी सेटिंग करून हिंदू धर्मात जन्म घ्यावा आणि नाही जमले तर धर्मांतर करावे ... कारण तरच विरोध होणार नाही ....

मुद्दा २- " अमीर खान ने २ लग्ने केली मग त्याला नैतिकता सांगण्याचा अधिकार आहे का ?"

कोणी आणि कोणाशी लग्न करावे हे सांगणारे आपण कोण ? त्यांचा धर्म त्यांना बहुपत्नी करायचा अधिकार देतो ..आणि अनैतिक कार्य नैतिकतेच्या पांघरुणाखाली करणारे अनेक महाभाग सगळीकडे असतात ... त्याने २ लग्ने केली म्हणजे तो नालायक कसा होतो ? तसे असेल तर प्रत्येक द्वितीय लग्न करणाऱ्या व्यक्तीस समाजाने बहिष्कृत करून नवा पायंडा पडला पाहिजे ... एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात आपण किती खोल शिरायचे हे आपणच ठरवले पाहिजे .. आणि लग्न -समाज जागृती यात काय तर तम भाव आहे हे अजून मलातरी समजलेले नाही 

मुद्दा ३- "तो एका शो चे काही कोटी घेतो मग हि कसली समाजसेवा ?"

त्याचा तो धंदाच आहे .. म्हणजे त्याच्या उत्पन्नाचे हे साधन आहे ...पैसा प्रत्येक जण मिळवतो पण तो कसा आणि कोणत्या मार्गातून मिळवतो यास महत्व द्यायला आपण कधी शिकणार ? आणि आलेल्या एस.एम.एस चे सर्व पैसे ते दान करणार आहेत ...त्याने मोफत शो केला असता तर त्याची जाण समाजाने ठेवली असती का ? कधीच नाही .... अमीर खान हा माणूस समाजाविषयी आणि भारताविषयी नेहमीच आग्रही राहिलेला माणूस आहे ..मेधा पाटकर यांचे आंदोलन असो वा अण्णा यांचे प्रत्येक कार्यात याने पुढाकार घेतला आहे ..आणि अगदी विरोधकांचे म्हणणे मान्य केले कि तो ते सर्व नाटक करतो ..पण नवीन सुरुवात कधी होऊच शकत नाही का ? आणि ती आपण स्वीकारणार नाही का ?

असे अनेक मुद्दे आहेत परंतु कोणी काय बोलावे यास बंधने नसतात पण आपण काय लिहावे यास नक्कीच असतात ...कारण बोलणाऱ्या व्यक्तीचे तोंड कोणीच बांधू शकत नाही पण लिहिणाऱ्या व्यक्तीचे हात जबाबदारीने आणि विवेकाने बांधलेले असतात ..समाजात नवी सुरुवात होत असताना ,जागृती होत असताना आणि हळूहळू वातावरण तापत असताना फालतू आणि फुटकळ मुद्दे घेऊन पुढे पडलेले अर्धे पाऊल आणखी १० पावले मागे नेऊन ठेवायचे पुण्याचे काम करण्यात काही लोकांना कोणता आनंद मिळतो हे मज न कळे.... याचा विरोध केला तर "धर्मांतर कर इत्यादी " नेहमीची टकळी पुन्हा वाजायला लागली ...आपण काही करायचे नाही आणि जो करतो आहे त्याला करू द्याचे नाही तोपर्यंत बदल होणे नाही......चालू राहणार तो फ़क़्त  पोरकट विरोध 

1 comment:

  1. मुद्दे संपले की लोक अश्या फालतू विषयांतरे करतात, जाउ दे त्यांना सुबुध्दी येऒ.

    ReplyDelete