Tuesday 8 May 2012

सत्यमेव जयते


दिवाळीमध्ये आपण जेव्हा फटाके आणायला बाजारात जातो तेव्हा सर्वात आधी विचारणा होते कि " मोठ्या आवाजाचा बॉम्ब आहे का ?" यामागचे कारण म्हणजे भल्या पहाटे लोक उठायच्या आधी आपण बॉम्ब लाऊन दिवसाची दणकेबाज सुरुवात करण्यात किंवा झोपलेल्या लोकांना उठवण्यात जी मजा आहे ती बाकी कशातही नाही ...किंवा सर्वत्र बॉम्ब उडत असताना माझ्या बॉम्ब चा आवाज सर्वात जास्ती आहे म्हणून माज करण्यातही एक वेगळाच मान आहे ..त्यामुळेच बॉम्ब एकच असूनही विक्रेते त्याचे वेष्टन अधिकाधिक आकर्षित करून त्यास कधी सद्दाम तर कधी लादेन चे नाव देऊन इतर विक्रेत्यांपेक्षा आपले उत्पादन जास्ती विकायचा प्रयत्न मनापासून करतात ... असेच काहीसे "सत्यमेव जयते " या बॉम्ब चे झाले आहे ...बाजारात येण्यापूर्वीची कमालीची प्रसिद्धी ,आमचाच आवाज सर्वात मोठा आहे असा पिटलेला डंका ,अमीर खान चे वलय ,बॉम्ब नक्की कसा फुटणार याबाबत पाळलेली कमालीची गुप्तता ,प्रेक्षकांची ताणून ठेवलेली उत्सुकता , जाहिरातींचा केलेला भडीमार , दिल पे लगेगी तभी तो बात बनेगी अशी ओळ घेऊन तापवलेले रान ,सोशल मिडिया चा अचूक वापर अशा वातावरणात अखेर रविवार दिनांक ८ मे २०१२ रोजी ठीक ११ वाजता फुटला .... दिवसाची दणकेबाज सुरुवात करण्याचा मान , झोपलेल्या लोकांना उठवल्याचे श्रेय आणि सर्वात मोठा आवाज असल्याचा बहुमान त्याने मिळवला .... 

                             रियालिटी शो म्हणून प्रसिद्ध होणाऱ्या कार्यक्रमात वास्तव हुडकण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अशी समाजाची मानसिकता असते ..त्यात भारतात म्हणजे जे अमेरिकेत किंवा युरोपात होते तेच आणि तसेच भारतात होते ..नाही होतेच ..तेच वास्तव असते हे गृहीत धरून अनेक "गल्लाभरू " कार्यक्रमांची निर्मिती करण्यात येते ..यात न समाजाचा फायदा न देशाचा ते अगदी बाळ मोठे झाल्यावर त्याच्या खेळण्यांचे /खूळखुळ्याचे जे होते म्हणजे धड ठेववत नाही आणि धड टाकवत नाही ..अंती घरात फक्त अडगळ होते तसे काहीसे या शो चे होते ..खाण्या पासून गाण्या पर्यंत आणि करोडपती करण्यापासून ते पती /पत्नी हुडकून देण्यापर्यंत ... एकमेकांचे जोडीदार पळवण्यापासून ते जोड्या जुळवा पर्यंत कोणताही विषय यांना "वर्ज्य " नाही ..सर्वत्र यांचा मुक्त संचार सुरु असतो आणि भारतीय प्रेक्षक त्यांच्या मागे माना डोलावत राहतो ... के .बी .सी  पासून स्प्लीटस व्हिला पर्यंत या शो चा जो प्रवास झाला आहे आणि होत आहे त्यातून प्रसारमाध्यमे नक्की काय "शो " करत आहेत आणि आपण कोणते "शो " पहात आहोत यावर विचार करायला कोणासही वेळ नाही कारण एक काळ होता जेव्हा रामायण /महाभारत यासारख्या मालिका सुरु झाल्या कि रस्ते रिकामे व्हायचे आणि त्यावरून मालिकांचे यश समजून यायचे पण आता टी.आर .पी . वरिष्ठ झाल्याने प्रेक्षक कनिष्ठ झाला आहे ..आपल्या हाती काय पाहावे /काय पाहू नये /कोणत्या शो ची  गरज आहे किंवा नाही यासारख्या गोष्टींवर बोलणे नाही ..आपल्या हाती आहे तो फ़क़्त "रिमोट " ....मूकपणे पहायचे ..काही काळ गुंतायचे ...कंटाळा आला कि पुढचा शो ...प्रेक्षक म्हणून आपले कर्तव्य संपले ..याहून अधिक विचार करायची आपल्याला मुभा नाही .. या शो मधून पुढे आलेल्या कलाकारांचे पुढे काय होते यावर विचार करायला आपल्याला वेळ नाही आणि तो वेळ द्यायला माध्यमे तयार नाहीत ...याच कारणाने असा "गल्लाभरू " प्रकारचा शो न करता "सामाजिक जाणीव " असलेला एखादा शो आला कि इतके दिवस आपण काय पहात होतो याचे दुक्ख ,माध्यमे काय दाखवत होते याचा राग आणि आता आपण काहीतरी वेगळे पहात आहोत याचे समाधान अशा भावना एकाचवेळी दाटून येतात ..अर्थात सत्यमेव हा काही सामाजिक विषयावर भाष्य करणारा प्रथम आणि अंतिम शो नाही पण प्रभावी शो आहे हे मान्य केलेच पाहिजे ..काही वर्षापूर्वी "किरण बेदी " यांचा असाच एक कार्यक्रम यायचा पण अपेक्षित  "टी .आर .पी "नसल्याने तो गुंडाळण्यात आला ...असो ! सध्या तरी सत्यमेव ने प्रथम भागातून समाजाला जागे केले आहे हे मान्य केलेच पाहिजे ........
                          प्रथम भागात हाताळण्यात आलेला विषय हा अत्यंत स्तुत्य आणि पांढरपेशी मेंदूस झिणझिण्या आणणारा होता ... सामान्य माणसास हे प्रकार नवीन नसतात कारण तो यातूनच मार्ग काढत असतो पण मर्स च्या काचेतून आणि २० व्या मजल्यावरून जग पाहणाऱ्या माणसास "असेही जग असते ?" असा प्रश्न कधी पडलेलाच नसतो ...त्यामुळे असा प्रश्न स्वतास विचारायला लावायचे पुण्याचे काम या शो ने केले आहे ..स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न देशास तथा महाराष्ट्रास काही नवा नाही ...नवीन आकडेवारी आली कि विषमता पाहून हळहळ व्यक्त करायची ..चर्चासत्रे आयोजित करायची ..मोर्चे काढायचे आणि हवा खाली बसली कि पुन्हा " मुलगा होऊदे " म्हणून नवस बोलायचे हे प्रकार काही नवीन नाहीत ...UNFPA यांच्या आकडेवारीनुसार २००१-२००७ या ७ वर्षात भारतात ६ लाख स्त्री गर्भाची हत्या करण्यात आली आहे हे प्रमाण महाराष्ट्रात ५५ हजार इतके आहे ..या हत्या होण्यास कारणीभूत असलेली लिंगनिदान केंद्रे (सोनोग्राफी सेंटर ) महाराष्ट्रात ७९३९ आहेत पैकी पश्चिम महाराष्ट्रात ७५ %आहेत ...पुण्यासारख्या ३२ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात ४१० केंद्रे आहेत..इतक्या व्यापक प्रमाणात केंद्रांची आवश्यकता आहे का ? जिल्ह्याच्या ठिकाणी /तालुक्याच्या ठिकाणी अशा मोजक्या ठिकाणी याची सोय करून काही प्रमाणात हि समस्या आपण निश्चित कमी करू शकतो ...१९९४ साली वाजत गाजत आणलेल्या PNDT ACT ( pre-natal diagnostic techniques act ) योग्य अंमलबजावणी आणि ultra sound sonography तंत्राच्या आगमनाने इतर कायद्यांप्रमाणे कागदावरच राहिला ..२००१ च्या जनगणनेत संपूर्ण देशासाठी बालक लिंग गुणोत्तर होते ९२७ तर महाराष्ट्र होता ९१७ वर ...२०११ च्या जनगणनेत देश आहे ९१४ वर तर महाराष्ट्र आहे ८८३ वर (बीड ८००) ...म्हणजे महाराष्ट्राने काय आणि किती गमावले असा प्रश्न राज्यकर्त्यांना कधीच पडणार नाही आणि बिनकामाच्या प्रचार पुस्तिकेत " आम्ही स्त्री भ्रूण हत्या थांबवू " अशी कामाची घोषणा कधीच येणार नाही ...अर्थात या सर्व प्रकारास केवळ आणि केवळ डॉक्टर जबाबदार आहेत असे म्हणणे चुकीचे आहे ..कारण डॉक्टर विमा कंपनीच्या एजंट प्रमाणे घरोघरी जाऊन "काय काढताय का एखादी पोलिसी " सारखे " काय बघायचे का पेढा आहे का बर्फी " असे काही करतात असे माझ्या तरी ऐकिवात नाही ..समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत पांढरा कोट घालून काळे काम चालूच राहणार ...असे खेदाने म्हणावेसे वाटते ...अमीर म्हणतो तसे मुलीचा गर्भ राहणे यात "आई किंवा गर्भातील मुलगी यांचा दोष नसतो" हे भारतीय मनसिकतेस पटणे आणि पचणे अत्यंत अवघड आहे ...
                            समाज कितीही पुरोगामी झाला तरी आधीच्या वैचारिक गुलामगिरी मधून मुक्त होत नाही हेच या घटनांवरून स्पष्ट होते ..समोर आलेले प्रत्येक उदाहरण भीषण असते असेही नसते तर ते प्रातिनिधिक असते ..याहून भीषण पण अव्यक्त अशा अनेक उदाहरणांचे आणि व्यथांचे ...संघर्षाचे आणि त्यागाचे .....२१ साव्या शतकाच्या बाता मारत असताना आणि महाशक्ती व्हायची मिजास मारत असताना गर्भाना मारणे म्हणजे लढायला बाहेर पडलोय पण माझ्याकडे तलवार आहे पण ढाल नाही असे झाले ... मुलास तलवारीची आणि मुलीस ढालीची उपमा दिली आणि दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या केल्या तर कितीही मोठा योद्ध असला तरी त्याचा पराभव निश्चित आहे ..कारण आघात करणे सोपे असते पण आघात झेलणे , आघात सोसून पुन्हा नव्या उभारीने आघात करायला शक्ती देणे हे कठीण काम असते ...पण लक्षात कोण घेतो ?? असाच एखादा शो येतो ..समाजात जागृती निर्माण करायचा प्रयत्न करतो ...समाजही आता आपण लढलेच पाहिजे असे म्हणून शड्डू ठोकून मैदानात उतरतो ..अशोक गेलहोत सारखे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील समस्या निवारण्यासाठी शो च्या एन्कर ला भेटायची इच्छा व्यक्त करतात ,कांचीचे शंकराचार्य गर्भपातावर बंदी घालण्याच्या कायद्याची मागणी करतात ,अलाहाबाद मध्ये गर्भपात करणाऱ्या डॉक्टर मंडळीना अटक होते , अनेक राजकीय -सामाजिक -चित्रपट सृष्टी मधील कलाकार मंडळी आपली "तज्ञ " मते ट्विट करतात ..प्रसारमाध्यमे त्या मतांना आणखी वलय देतात आणि इतकी सगळी "स्टार" मंडळी उतरली आहे मग आपला काय उपयोग म्हणून सामान्य माणूस ठोकलेला शड्डू मागे घेतो ... आणि पुन्हा असाच शो येईल आणि समाज शहाणा होईल असा आशावाद बाळगून आणलेले उसने  अवसान झुगारून पुन्हा "मला मुलगा /नातू /भाचा /पुतण्या कधी देतेस " म्हणून होऊ घातलेल्या मातेस छळू लागतो ...

No comments:

Post a Comment