Friday 25 May 2012

बाबूमोशाय ....


आई. पी .एल चा चालू असलेला धुडगूस , दोन षटका दरम्यान अगम्य जाहिराती दाखवण्याचा घातलेला घाट , त्यात वाढीव म्हणून पॉवर प्ले चा वैताग हे चालू असताना एका जाहिरातीने कमालीचे लक्ष वेधून घेतले ...काळ्या रंगाचा सूट घातलेला माणूस धीमी पावले टाकत चालत आहे ,ओळखीच्या आवाजात " फेन्स क्या होते हे मुझसे पूछो ..प्यार का वो तुफान मोहोबत कि वो आंधी वो जसबा वो जुनून ...हवा बदल सकती है लेकीन फेन्स ......" असे म्हणत त्याचे आगमन होते आणि काळजाचा ठोका चुकतो ...flash back मध्ये दाखवलेला हाच माणूस आहे का असा प्रश्न पडतो ...अंधारातून एखाद्या व्यक्तीस एकदम उजेडात आणले तर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव उमटतील त्याच भावांनी आणि चीर परिचित शब्दांनी " लेकीन फेन्स हमेशा मेरे रहेंगे .." असे म्हणत  काळजाला पुन्हा हात घालतो ....क्षण भर सावरेपर्यंत " बाबूमोशाय ....मेरे फेन्स मुझसे कोई छीन नही सकता ...." असे म्हणून डोळ्यात अश्रुंचे दोन थेंब आणि ओठावर "ये क्या हुवा .....? " या ओळी ठेऊन निघून जातो ...एकेकाळी संपूर्ण जंगलावर राज्य केलेल्या पण आता सत्तांतर झाल्याने   विस्मृतीत गेलेल्या सिंहाने आपले अस्तित्व व सत्ता अजूनही कायम आहे हे पटवून देण्यासाठी सारे बळ एकवटून केलेल्या गर्जनेसारखी हि जाहिरात वाटते .... एका रुबाबी ,राजा आणि स्वप्नातील राजकुमाराचे काळाच्या ओघात काय अधोगती होते याचे प्रत्यंतर हि जाहिरात पाहताना आले ....
                           तसे राजेश खन्ना या व्यक्तीबद्दल काही लिहायचा मला अधिकार नाही..कारण त्याचे स्टार डम ,त्याचा रुबाब त्याची क्रेझ मी पाहिलेली नाही ...त्याची गाणी ओठावर असली तरी मोजकेच सिनेमे पाहण्यात आलेले आहेत ..आणि काळाचे अंतर तर इतके कि माझे बाबा त्यांच्या कॉलेज च्या काळात "मेरे सपनो कि रानी...." असे म्हणत आपल्या स्वप्न सुंदरीचा शोध घेत असतील ... "अच्छा तो हम चलते है ...." म्हणून अनेक तरुणींनी प्रियकराने आपल्याला थांबवावे म्हणून नाटक केले असेल ...तर " गुलाबी आंखे जो तेरी देखी ..." म्हणून अनेक तरुणांनी आपल्या प्रेमाचा गुलाबी रंग आणखी खुलवला असेल ... भाव न देणाऱ्या मुलीस " गोरे रंग पे न इतना घुमान कर ...." म्हणून हिणवले असेल तर " रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना ....." म्हणत अनेकांनी प्रणयास वेगळी धुंदी दिली असेल ..प्रेमभंग झाल्यावर " चिंगारी कोई भडके ...." म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या असतील ... "जय जय शिव शंकर ..." म्हणत भन्नाट नाच केला असेल , " हमे तुमसे प्यार कितना ..." म्हणत प्रेम व्यक्त केले असेल , " शायद मेरी शादी का खयाल ...." म्हणत अनेकांनी गोड बातम्या सांगितल्या असतील ..पण काका म्हणतो ना " जिंदगी एक सफर है सुहाना यहा काल क्या हो किसने जाना.... " तसेच काहीसे झाले आणि बॉलीवूड चा पहिला सुपर स्टार राजेश खन्ना विस्मृतीत गेला ...अमिताभ च्या झंझावातात आणि नंतर खानावळीच्या तुफानात पुरता वाहून गेला ...आपले अस्तित्व टिकवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न त्याने केले आणि दुर्दैवाने केवळ तेच पाहणे आमच्या नशिबी आले ..
                            सदा स्मितहास्याची उधळण करत असणारा आणि आपला वाटणारा चेहेरा ,संवाद ओठातून नाही तर चेहेऱ्यामार्फत रसिकाच्या मनात पोहोचवायची कला , ठराविक पण प्रसिद्ध केशरचना ,हातवारे करायची विशिष्ट पद्धत , जबरदस्त पटकथा ,अप्रतिम अभिनय ,आर .डी- किशोर कुमार यांची साथ ,आनंद बक्षी यांचे बोल ,मुमताज ,आशा पारेख ,शर्मिला टागोर ,स्मिता पाटील ,झीनत अमान ,शबाना आझमी ,हेमा मालिनी यांसारख्या अभिनयसंपन्न रूपगर्वितांची साथ ...सोबतीला " पुष्पा " यामुळे आखरी खत,दो रास्ते ,आराधना ,खामोशी ,कटी पतंग ,आनंद ,गुड्डी ,मर्यादा ,अंदाज ,दुश्मन ,बावर्ची ,अनुराग ,नमक हलाल यासारखे १९६७-१९७५ दरम्यान ३५ तर १९७९-१९९१ दरम्यान ३४ गोल्डन जुबिली सिनेमे देणारा सुपरस्टार राजेश खन्ना, इत्तेफाक आणि रघुकुल मधून छोट्या पडद्यावर येणारा काका , १९९१-१९९६ काँग्रेसी सांसद म्हणून वावरलेला राजेश वैयक्तिक आयुष्यात असमाधानीच राहिला ...आधी अंजू महेंद्रू मग डिम्पल मग टीना मुनीम आशा ललना आयुष्यात येऊनही तो एकटाच राहिला ... डिम्पल -राजेश यांचा फसलेला विवाह चर्चिला जात असताना "कुछ तो लोग कहेंगे ..लोगोंका काम है केहना .." म्हणत पुढे जात राहिला आणि एकापेक्षा एक अप्रतिम कलाकृती देत राहिला ...कारण रसिकांचे अमर प्रेम त्याच्यावर कायम होते ... " हमे और जिने कि चाहत ना होती ...." असे त्याचे आणि रसिकांचे एकमेकांवर प्रेम होते ...पण २००९ साली जीवन गौरव स्वीकारताना काका म्हणाला होता " इज्जते शोहरते उल्फते चाहते सब कुछ इस दुनियामे रेहता नही...आज मै हु जहा वहा कल कोई और था...ये भी एक दौर है वो भी एक दौर था ...." अमिताभच्या आगमनाने राजेश असा काही विस्मृतीत गेला कि ये भी एक सुपरस्टार है ....कल कोई और था असे म्हणायची तसदीही रसिकांनी घेतली नाही...
                               म्हणूनच जेव्हा त्याचा वयस्क ,निराशेने भरलेला ,कापऱ्या आवाजातला आणि रुबाब लोप पावलेला चेहेरा टी.व्ही .वर पहिला तेव्हा जाणीव झाली कि आपण नक्की काय विस्मृतीमध्ये टाकले ...सिनेमा सृष्टीस अभिनयाचा "आईना " दाखवून अभिनायावरील आपले "अमर प्रेम " सादर करून रसिकांना आपली "आराधना " करायला लाऊन अद्वितीय "आनंद " देणाऱ्या एका कलाकारास आपण अडगळीत टाकले ...आणि अप्रतिम अभिनयास आपण मुकलो ...एक नट सदासर्वकाळ आपली सत्ता टिकवून ठेऊ शकत नाही हि गोष्ट मान्य आहे ..काळ बदलला कि रसिकांचा कल बदलतो ,निर्मात्यांची भूक वाढते ,अभिनयाच्या आणि सादरीकरणाच्या परिभाषा बदलतात ,सिनेमाच्या व्याख्याही बदलतात आणि आशा बदलाशी जुळवून घेणे हे नटासाठी कठीण कार्य असते ..पण हाच नियम "नटश्रेष्ठा" साठी लागू होतो का ?? म्हणूनच राजेश खन्ना म्हंटले कि आनंद मधील मृत्यू शय्येवर झोपलेला आनंद आठवतो ...आणि त्याचा हृदयास छेद देणारा संवाद कानात वाजू लागतो " बाबूमोशाय जिंदगी और मौत तो उपरवले के हात है जहापना उसे ना आप बदल सकते है ना मै ...हम सब तो रंगमंच कि कठपुतलीया है जिसकी डोर उपरवालेकी उंगलीयोमै बंधी है कब कौन कैसे उठेगा ये कोई नही बता सकता...." म्हणूनच वाटते ...सर्व काही आहे बाबूमोशाय कडे ...गरज आहे ती फ़क़्त चाहत्यांच्या प्रेमाची ...आणि ते बाबूमोशाय रंगमंचावर असताना त्याला मिळायची ...नाहीतर ..." एक दिन सपनोंका राही ...चला जाये सपनोंके आगे कहा ......" असे झाले तर रसिक मन आपल्याला शांत बसून देईल का ??

2 comments:

  1. mast...." इज्जते शोहरते उल्फते चाहते सब कुछ इस दुनियामे रेहता नही...आज मै हु जहा वहा कल कोई और था...ये भी एक दौर है वो भी एक दौर था ...." nice lines....
    keep it up....

    ReplyDelete
  2. laaich bhari rao...ekdum sahi lihilays
    -manali

    ReplyDelete