Sunday 9 September 2012

थिल्लर -चिल्लर पार्टी


सिगरेटचा धुरात असे काय असते की ज्याने तरुणाई मोहरते ? मद्याच्या फेसाळत्या प्याल्यात असे काय असते की ज्याचे आकर्षण असते ? कर्कश्य आवाजात लावलेल्या गाण्यात असे काय असते जे नेहमीच्या गाण्यापेक्षा वेगळे असते ? तंग कपडे घालून एकमेकांना खेटून नाचण्यातून असे काय मिळते जे मैत्रीतून मिळत नाही ? सिगारेट ,मद्य , गाणी ,नाच यासारख्या  गोष्टीत नेमके काय असते ज्यामुळे तरुणाई समाज ,संस्कार , नितीमत्ता आणि नियमांच्या चौकटी मोडल्याचा रुबाब मिरवत शेकडोंच्या संख्येने एकत्र येतात आणि समाजासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात ?? पुण्यात एका आठवड्यात उघडकीस आलेल्या (२) चिल्लर आणि एका थिल्लर ( मिडिया ने केलेले नामकरण ) पार्टी मुळे सांस्कृतिक पुणे खरच सांस्कृतिक राहिले आहे का ?? हा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेस आला आहे ....
                                  जुन्या पिढीतील लोकांशी बोलताना दर ५-१० मिनिटांनी एक वाक्य हमखास ऐकायला मिळते " आमच्या वेळी अस न्हवत अगदी काल- परवा पर्यंत या वाक्याचा कंटाळा यायचा पण आता या वाक्याचा हेवा वाटतो .... तरुणपण आणि तारुण्याचा आनंद घ्यायच्या संकल्पना इतक्या झपाट्याने बदलत आहेत की अगदी २३ वर्षाचा मी सुद्धा आता म्हणू लागलोय "आमच्या वेळी अस न्हवत " .... काही तरुणांच्या  भ्रामक  समजुतीमुळे जेव्हा अक्ख्या तरुणाइस बेजबाबदारपणाच्या पिंजऱ्यात उभे केले जाते तेव्हा मनास क्लेश होतो ...मुळात कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण त्यांच्या वागण्याने जर समाजासमोर काही प्रश्न उपस्थित होत असतील तर चार संस्काराचे आणि नैतिकतेचे सल्ले देणे भाग पडते ... ११-१२ मधील जवळपास ७०० मूले-मुली आणि वाघोलीतील ३०० च्या आसपासचे "आयटीवीर " यांनी नक्की काय मिळवले ?? या प्रकारास केवळ तरुणाचे आडमुठे वय , टी.व्ही .- सोशल मिडिया यांचा वैयक्तिक आयुष्यात झालेला खोलवर प्रवेश , पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण हीच कारणे जबाबदार आहेत का ? या आकर्षणाचे मूळ तरुणांच्या बदलत चाललेल्या मानसिकतेत आहे ... " धोपट मार्ग सोडू नको " म्हणणारी पिढी आता "ब्रेक द रुल्स , हु केअर्स " या ब्रीदवाक्याचे अनुकरण करू लागली आहे ...पालकांनी -समाजाने घालून दिलेले नियम तोडण्यात अनेक तरुण/ तरुणी धन्यता मानू लागले आहेत.. आधीची पिढी का घडली आणि आताची पिढी का बिघडली याचे  कारण सध्याच्या "कुटुंब व्यवस्थेत " दडलेले आहे.. मुलांवर संस्कार करण्यास त्यांच्या मानसिकतेत होणारे बदल टिपण्यास आताच्या बहुतांशी पालकांना वेळ नसतो आणि ज्यांच्याकडे अनुभवासह वेळ प्रचंड असतो अशा आजी -आजोबांसाठी सिमेंट च्या घरट्यात जागा नसते ... त्यामुळे वेळ निघून गेल्यावर समजते की आपण खाऊ ला दिलेल्या पैशातून आपले लाडके पिलू चकणा खात आहे ...त्यामुळे केवळ वरवरच्या कारणांना महत्व देऊन तरुणांना बेजबाबदार ठरवणे चुकीचे आहे ...कारण यातीलच काही तरुण आडमुठ्या वयात जागतिक विक्रम करतात, टी.व्ही . वर जाऊन एखादी स्पर्धा जिंकून येतात ,सोशल मिडिया चा वापर करून समाजउपयोगी कामे करतात आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून फादर्स, मदर्स डे उत्साहाने साजरे करतात .... त्यामुळे मुलाला / मुलीला आडमुठ्या वयात आपली असलेली गरज, नैसर्गिक संवाद  , त्यांच्या वास्तविक गरजा , मला मिळाले नाही ते यांना मिळूदेत  या मानसिकतेतून  पुरवठा होत असलेला पैसा , त्या पैशाचा होत असलेला विनियोग आणि ५ होकारामागे २ नकार याची सांगड घातली  घातली गेली पाहिजे ...
                                      पालक -समाज -कुटुंब व्यवस्था यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून संपूर्ण तरुण वर्ग "निर्दोष " सुटला का ? तर नक्कीच नाही ...तारुण्याचा आनंद घेण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातील कोणत्या मार्गाची निवड आपण करतो याचा विचार केला पाहिजे ....समाजात -बाजारात जे जे उपलब्ध आहे त्याचे आपण अनुकरण केलेच पाहिजे असे काहीच नसते ..केवळ केसांच्या विविध रचना केल्या , तंग कपडे घातले , सिगारेट -मद्याचा आधार घेऊन काही शिव्या हासडल्या म्हणजे आपण "कूल" आहोत असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे ... स्वतःस आधुनिक / अत्याधुनिक सिद्ध करण्यासाठी अशा पार्टी इत्यादीची गरज नसते तर गरज असते वैचारिक प्रगल्भतेची आणि तात्विक बैठकीची ... पण इतका सखोल विचार करायचे हे वय नसते ..कोणी सांगायला आले की " काय डोक्याची मंडई करतो ** " असे म्हणून त्यास पिटाळले जाते ... केवळ एकदा कोणत्यातरी व्यसनमुक्ती केंद्रास भेट देऊन तेथील लोकांची अगतिकता पहावी , एखाद्या कर्करोगाच्या रुग्णालयास भेट देऊन मद्याचा -सिगारेट चा झालेला परिणाम पाहावा , " वेस्टेड ( मार्क जोन्सन ) " सारखी पुस्तके वाचावीत म्हणजे तरुणपण हे सिगारेटच्या धुरात , मद्याच्या पेल्यात , कर्कश्य संगीताच्या ठेक्यात संपवण्याइतके स्वस्त नसते याची जाणीव होईल ...

No comments:

Post a Comment