Wednesday 19 September 2012

बदललेला गणेशोत्सव

वेळ असेल साधारण सकाळी १० ची ...घरात नेहमीपेक्षा जास्ती वेगाने गडबड चालू होती ... मधूनच एखादे भांडे खाली पडत होते त्याचा आवाज शांततेमुळे घरभर घुमत होता ... फोनवरून  गणपती चतुर्थी च्या शुभेच्छा घेण्यात आणि मोदकाच्या सारणात कोणता जिन्नस किती प्रमाणात घालायचा याचे मोफत मार्गदर्शन करण्यात आई व्यस्त होती ....देवाची पूजा करण्यात माझ्याकडून  कोणती चूक होत नाही आहे ना याकडे अंधुक झालेल्या नजरेतून टक लाऊन आजी पहात होती ... वेळोवेळी आमचे श्वान कोणत्यातरी "परक्या "व्यक्तीच्या आगमनाची वार्ता त्यांच्या पद्धतीने देत होते ... या सगळ्या सवयीच्या वातावरणात अथर्वशीर्षाचे पठण करत मी गणपतीची प्रतिष्ठापना करत होतो .... अचानक घरासमोरील मंडळाचा "डॉल्बी " काही सेकंद सुरु झाला आणि बंद झाला .... पूजा निर्विघ्न होईल या औटघटकेच्या आनंदात मी पुन्हा पूजेत मग्न झालो " नमो व्रातपतये ..नमो गणपतये ..नमो प्रमथपतये  ...... " आणि " चालावो ना नैनो के बाण रे ...... " मी थोडा आवाज वाढवून " नमस्तेस्तु लंबोदरा ......" " जान ले लो ना जान रे ....." यांत्रिक शक्तीसमोर मानवी मर्यादा कमी पडतात याची जाणीव होऊन टाकलेला निराशेचा सुस्कारा आजीच्या कानांनी अचूक टिपला आणि म्हणाली " आता टिळकांचा गणपती नाही राहिला बाबा ..... " ..... टिळक ....टिळक .... कोणता बरे तो दिवस ?? केसरी वाड्यात त्यांचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकला होता .... आता डॉल्बीचे गाणे बदलले होते " गो गो गो गोविंदा .... " ......तरीही मन पुन्हा केसरी वाड्याकडे धाव घेत होते ... गोंगाटात सुद्धा एक आवाज गर्जत कानावर पडला "..... ज्यांना शांततेत ऐकायचे नाही त्यांनी बाहेर जा " वा....लोकमान्यांचा आवाज ...नशीबवान होती ती पिढी ज्यांनी लोकमान्यांचा आवाज प्रत्यक्ष ऐकला त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा केला ...नाहीतर आम्ही ....ऐकत आहोत " बदनाम झालेल्या मुन्नीच्या हलकट जवानीला आणि वाट बघणाऱ्या रिक्षावाल्याच्या चिकनी चमेलीला " ....पण गणेशोत्सव ????
                                  " स मेधावान भवती ...यो मोदकसहस्रेण यजति ....." म्हणत असताना मन इतिहासाची पाने झपाझप उलटत होते ...आणि कोणत्या एका इयत्तेतील धड्याच्या काही ओळी आठवल्या " स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या मनात एकीची भावना रुजावी , आपण भारतीय आहोत याची जाणीव व्हावी आणि याचा उपयोग स्वातंत्र्ययुद्धासाठी व्हावा म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणपती उत्सव याची स्थापना केली " असेच होते का ?? बहुदा असेच काहीतरी शिकलो होतो ....कारण काळाच्या ओघात आपण अनेक सण साजरे करतो पण त्याच्यामागचे कारण /शास्त्र आपण रीतसर विसरतो किंवा सोयीनुसार बदलतो .... लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेला गणपती उत्सव आणि सध्या सुरु असलेला उत्सव यात किती फरक आहे याची प्रचीती ४ दिवसापूर्वीच आली होती .... वेळ रात्री ९.१५ ची असेल माझे रानडे मधील journalism lecture संपवून मी घरी जात होतो ... कोथरूड मधील अभिषेक हॉटेल समोरून एका मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा मधून काही गणेश मूर्तींची वाहतूक सुरु होती ...एकापेक्षा एक लोभस आणि सात्विक मुर्त्या पाहून मन हरखून गेले ...शेवटची मूर्ती न्याहळून त्याच्या शेजारी पहिले तर एक माणूस मूर्तीच्या डोक्यावर हात ठेऊन निर्लज्जपणे सिगारेट चे झुरके मारत होता..... राग अनावर झाल्याने " अबे बेहेन *** सिगारेट फेक " असे ओरडल्यावर " जब गणपतीको कोई प्रोब्लेम नही तो तेरेको क्या ?? " असे म्हणून दुप्पट वेगाने झुरके मारू लागला ....मनात विचार आला " कोठे गेले पावित्र्य ?? " ..... गणपतीची मूर्ती म्हणजे केवळ विक्रीची वस्तू मानणाऱ्या लोकांकडून आपण पावित्र्याची अपेक्षा करणे ही आपली चूक की पुण्य -पाप याच्या पलीकडे जाऊन केवळ पोटासाठी श्रद्धेचाही बाजार मांडणाऱ्या आपल्यातीलच काही व्यक्तींची चूक ??? चूक ....
                                  चूक .... नक्की कोणाची ?? एकी साठी उत्सव साजरा करा सांगणाऱ्या टिळकांची की अनेक मंडळे काढून आपल्यातील एकी दाखवणाऱ्या लोकांची ?? खड्ड्तातील रस्त्यांची शोभा वाढवण्यासाठी आणखी खड्डे काढणाऱ्या कार्यकर्त्यांची ? वर्गणी गोळा करण्यासाठी वेठीला धरणाऱ्या वसुलीखोरांची ? ध्वनिक्षेपकांचे डोंगर उभे करून धरणीकंप करू पाहणाऱ्या मंडळांची ? प्लास्टर च्या मोठ्या मुर्त्या आणून त्या नदी /तलाव यात विसर्जित करून आपले कर्तव्य पूर्ण झाले या आनंदात रममाण झालेल्या पण अनेक जलजीव /वनस्पती यांच्या मृत्यूस अप्रत्यक्ष कारणीभूत ठरलेल्या सामान्यांची/ मंडळांची ?? नाना -दादा -तात्या अशा गावगुंडांना काही हजार रुपयांसाठी स्वागत कमानीवर स्थान देणाऱ्यांची ? का एकही "सांस्कृतिक कार्यक्रम -व्याखानमाला " आयोजित न करता केसांचे कोंबडे वर करून मद्याच्या नशेत ,पान -मावा याच्या पिचकाऱ्या टाकत बीभत्स नाचायला परवानगी देणाऱ्या आयोजकांची ? की हे असांस्कृतिक -अशोभनीय   प्रकार शांतपणे पहात -सहन करत आणि स्वीकारत मूक पाठींबा देणाऱ्या आपली ?? कोणामुळे बदलले रूप गणेशोत्सवाचे ?? नाही सांगता येणार ....का सांगावे ?? आणि कशासाठी ?? कारण मीमांसा तेव्हाच करण्यात येते जेव्हा बदलाची इच्छा असते ..पण....पण बदल हवाय कोणाला ?? प्रत्येकाला हवय ते उत्सवाचे " व्यावसायीकरण " .... 
                                  आपण काय करत आहोत आणि कशासाठी याचे भान कोणासही राहिले नाही ....मला काय त्याचे ?? संस्कृती बदलत आहे ? बदलुदेत .....शास्त्र मोडत आहेत ?? मोडू देत .... मूळ संकल्पनेपासून आपण दूर जात आहोत ?? जाऊदेत .... मला काय त्याचे ?? अखेर "मी " अनादी आहे अनंत आहे .... देवाचा मी लाडका आहे ... मी कितीही चुका केल्या तरी त्यास माफी आहे कारण श्रद्धास्थानासाठी आज माझ्याकडे अनेक पर्याय आहेत आणि केलेली पापे धुवायला माझ्याकडे हजारांच्या अनेक नोटा आहेत .... आणि देव म्हणतो का ? " मला हे आवडते -ते आवडत नाही " हे तर सर्व जुन्या पिढीतील मूर्ख लोकांनी निर्माण केलेले थोतांड आहे ... काय कळत त्यांना ?? आम्ही तर आता "देवकण" शोधून काढला आहे ... लवकरच सृष्टी च्या उत्पत्तीचे रहस्यही शोधू .... नका शिकवू आम्हाला शास्त्र आणि रूढी ...उत्सव हा फ़क़्त आनंद घेण्यासाठी असतो आणि त्याचा आनंद आम्ही आमच्या पद्धतीने घेणार .... या विचारांना पुष्टी द्यायला गाणे वाजू लागले " कामावर जायला ....उशीर व्हायला ...... " .... गणपती उत्सव बदलला आहे कारण तो उत्सव साजरा करणारी माणसे आणि त्यांची मानसिकता बदलली आहे ...जाऊदेत ....मला काय त्याचे ..... " ओम नमस्ते गणपतये ..त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी ......... 

1 comment: