Friday 28 September 2012

जरा याद करो कुर्बानी ..

आजचा शुक्रवार कसा बसा ढकलला की शनिवार- रविवार सुट्टी सोमवारी बुट्टी मारली की मंगळवारी पुन्हा गांधी जयंतीची सुट्टी .....सही ..... कल्ला यार सलग ४ दिवस सुट्ट्या ... कूच तो तुफानी करते है यार ... कोठे जायचं ? अलिबाग ? महाबळेश्वर -लोणावळा काय ग १-२ दिवसात होते ..एक काम करू ..गो गोवा .... मी तर ताणून झोपणार बघ ... घरी जाऊन येतो ४ दिवस...परत दिवाळी शिवाय सुट्टी नाही ... थांब बे .. घरी जाऊन काय स्वयपाक करायला शिकणार आहेस का ? हि बघ मुलगी असून हिला काही येत नाही करायला ....ए गप हा .... प्लान करा रे काहीतरी ...राडा करू ४ दिवस .... अशी चर्चा प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर सध्या ऐकू येत आहे ..कितीसे वय ? १६-२२ या वयात कोणी .... भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे , त्यासाठी आपण त्याग केला पाहिजे , सरफरोशी की तमन्ना ... मेरा रंग दे बसंती चोला असे कोणी म्हणत असेल ?? त्यासाठी आयुष्याचे समर्पण करत असेल ?? ए काय रे चिकट ..काहीपण फेकतो काय बे ?? उगाच सकाळी सकाळी डोक्याची मंडई  करू नकोस .... शाहीद कपूर ची लफडी आणि शाहीद आफ्रिदीचे रेकॉर्ड तोंडपाठ असलेल्या तरुणाईला "शहीद भगत सिंग " कसा माहित असणार ?? म्हणूनच २७/०९/२०१२ हा भगतसिंग यांचा जन्मदिवस यंदाही  विस्मृतीत  गेला .....
                                       भारताच्या स्वातंत्र्याबद्दल टोकाची मते असणारे २ गट नेहमीच मला अस्वस्थ करतात ...पहिला म्हणजे " स्वातंत्र्य मिळवून असे काय मोठे साध्य केले " म्हणणारा आणि दुसरा म्हणजे " स्वातंत्र्य हे ठराविक लोकांच्याच प्रयत्नाने मिळाले " असे आग्रहाने म्हणणारा .... म्हणजे स्वातंत्र्य आणि क्रिकेट या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत माहित असूनही तुलना करायचा मोह आवरत नाही ... एखादा सामना धोनी ने ६ चेंडूत १० धावा करून जिंकून दिला तर आधी ज्यांनी उत्तम फलंदाजी/गोलंदाजी  केली  ज्यांनी विजयाचा पाया रचला त्यांनी काहीच केले नाही ..सामना जिंकून दिला धोनी ने अशी बहुतांशी लोकांची मानसिकता असते तसेच स्वातंत्र्य लढ्याचे आहे ... स्वातंत्र्य लढा म्हणजे एक धगधगणारे अग्निकुंड होते आणि ते सतत प्रज्वलित राहील यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणाची -आयुष्याची आहुती त्यात दिली आहे परंतु त्यांची आठवण ठेवण्याची तसदी आपण घेत नाही ...जेव्हा जेव्हा मी स्वातंत्र्याबद्दल वाचतो तेव्हा जहाल आणि मवाळ गट असे दोन नेहमीच वाचायला मिळतात .. अहिंसा हि काळाची गरज आहे आणि त्याचा पुरस्कार सर्व पातळीवर केला पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे .... पण या सत्याची कास धरताना आपण जहाल मतवाद्यांवर अन्याय तर करत नाही न ? याचाही विचार आपण केला पाहिजे ... जहाल मतवादी अहिंसेचे पुजारी न्हवते का ?? त्यानाही अहिंसा -शांतता हवीच होती म्हणूनच उठावे आणि कोणालाही मारत सुटावे असे अमानुष फतवे कधीही निघाले नाहीत .. स्वातंत्र्य हे युद्ध होते आणि युद्धात जशी प्राणांची आहुती द्यावी लागते तसेच काही प्राण घ्यावेही लागतात .. मग हे चूक की बरोबर ? तर याचे उत्तर "हेतू " मध्ये आहे .... आपल्या देशाचे -धर्माचे -जातीचे महत्व वाढवण्यासाठी किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेली हिंसा केवाही निंद्य पण राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलेले युद्ध हे पवित्रच मानायला हवे ...त्यामुळे अकारण कोणी जहाल मतवाद्याना "हिंसक " म्हणते तेव्हा मनास प्रचंड क्लेश होतो ..आणि "व्यर्थ गेले का बलिदान ?" असा प्रश्न पडू लागतो, इतिहासाच्या पुस्तकात असतात म्हणून २-४ नवे तरी आपल्याला माहित असतात नाहीतर असे कोणी होते का आपल्या देशात ??? अशी वेळ आपल्यावर आली असती ...अर्थात मवाळ नेते आणि त्यांचे अनुयायी यांच्यावर कोणताही राग नाही किंवा असूया नाही पण स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या प्रत्येकाला समान महत्व मिळाले पाहिजे इतकीच इच्छा आहे ...
                                       शहीद भगतसिंग यांच्या बद्दल अधिकार वाणीने लिहिण्याइतका मी मोठा नाही ... त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला त्या मार्गावरून जायचे माझ्यात धारिष्ट्य नाही ... त्यांनी जो त्याग केला तो मी करू शकत नाही कारण माझे तारुण्य हे मजा करण्यासाठी आहे .... वडिलांनी घेऊन दिलेल्या महागड्या बाईक वर बसून सुंदर मुली फिरवण्याचे , इंग्लिश सिनेमे -गाणी यांचे पारायण करायचे , पिझा -बर्गर आणि तत्सम विदेशी पदार्थ खायचे हेच तर माझे वय आहे ... हो मलाही शरीर कमवायचे आहे कारण कॉलेज क्वीन ला इम्प्रेस करायचे आहे , मलाही देशाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे कारण परीक्षेत मला पास व्हायचे आहे , हो मलाही तुमच्या सारखे व्हायचे आहे कारण नाटकात तुमची प्रमुख भूमिका मला करायची आहे .... भगतसिंग अहो तुम्ही पडद्यावरच छान वाटता ....प्रत्यक्षात तुमचे आणि तुमच्या विचारांचे अनुकरण करणे अशक्य आहे कारण तेवढी मानसिक खंबीरता आमच्यात नाही ... फेसबुक स्टेट्स आणि स्काइप वरच्या फुटकळ गप्पा यापुरतेच आमचे आयुष्य मर्यादित आहे ...आम्ही जोमाने अभ्यास करतो कारण अमेरिकेतील नोकरी आम्हाला खुणावत असते ..आणि जिथे भारतात तुम्ही चालत नाही तर अमेरिकेत काय चालणार ? आणि तिकडचे कायदे खूप कडक असतात हो .... षंढ ??
                                      षंढ म्हणालात का तुम्ही मला ?? हो ....आहे मी षंढ ...कारण  बंड  करायची ताकद आम्हाला कोणी कधीच दिली नाही ...आम्ही शिकले आणि गिरवले ते केवळ "सहनशक्तीचे " धडे ...डोळ्यासमोर अनुचित प्रकार होत असताना  आमचे रक्त तापत नाही ... देशात घोटाळ्यावर घोटाळे होत असताना आम्हाला स्वतःच्या हिकमतीवर काही करावेसे वाटत नाही , देशाचे काही भले व्हावे असे पोकळ बोलण्यापलीकडे आमची मजल जात नाही ...मग आम्ही तुमचे अनुकरण का करावे ?? कारण तुमचा जन्मदिवस साजरा केला तर  तुमचे " My life has been dedicated to the noblest cause, that of the freedom of the country. Therefore, there is no rest or worldly desire that can lure me now " असे विचार आमच्या कानावर पडतील ....आपण किती कर्तव्यशून्य आहोत याची आम्हाला जाणीव होईल आणि स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवाच्या निखाऱ्यावर आपटायला होईल म्हणूनच आम्ही तुमची "कुर्बानी याद करत नाही ".....  पण खरेच मनाच्या कोपर्यातून अनेकदा वाटते .... " जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुर्बानी ..." 

1 comment:

  1. त्या आणि इतर असंख्य महापुरुषांच्या (जे लढता लढता आपल्या मातृभूमीसाठी धारातीर्थी पडले) स्मृतीप्रीत्यर्थ आपल्या देशामध्ये एकहि स्मारक (War Memorial) नाही....आपण त्यांच्याइतका त्याग जरी करू शकत नसलो, तरी आपल्या आणि आपल्या बांधवांसाठी त्यांच्या स्मृतीची धगधगती ज्वाला ज्यामुळे पेटेल असं एक तरी स्मारक, जे या देशात नाही, ते असावं यासाठी प्रयत्न तर करू शकतो....

    ReplyDelete