Friday 14 September 2012

काकस्पर्ष ..... ( उशिरा पाहिलेली ) अप्रतिम कलाकृती ......


कोण्या एका नदीचा काठ ,संथपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह , काठावर शांततेत उभे असलेले नातलग, काळ्याठिक्कर कातळाने बनलेल्या घाटाच्या पायरीवर पांढऱ्या शुभ्र भाताचे ठेवलेले पिंड आणि पिंडास अधिकच शुभ्र करणारे दधी ,गती प्राप्त व्हावी म्हणून पिंडापासून काही अंतरावर  अपुऱ्या इच्छा पूर्ण करेन असे आश्वासन देऊन उभा असलेला वारस , काही काळासाठी मंत्रपठण थांबवलेले गुरुजी आणि पिंडाच्या भाताकडे काहीश्या अधाशी नजरेने पाहत थांबलेली  श्वानाची टोळी या सर्वाना एकाचीच प्रतीक्षा असते .... " कावळ्याची " ... आणि पिंडास " काकस्पर्षाची " ....जवळपास सर्व हेच चित्र दिसते  , प्रसंगी दर्भाचा काकही तयार असतो पण   ज्यावेळी आपल्या भावाच्या पिंडास काकस्पर्ष होत नाही म्हणून  दर्भाचा पर्याय उपलब्ध असताना भलतेच आश्वासन देऊन एका काकस्पर्षासाठी एका मुलीचे संपूर्ण आयुष्य पणाला लावत असेल , तिच्या भावना -भविष्य यापेक्षा आपल्या भावाच्या मुक्तीचा अधिक विचार करत असेल ,  आणि मृतात्माही विशिष्ट अश्वसानासाठी अट्टाहास धरत असेल तर पुरुषी मनोवृत्तीतून , कर्मठ विचारसरणीतून , सामाजिक दबावातून आणि एका स्त्री आयुष्याच्या त्यागातून एक हृदयस्पर्शी अप्रतिम कलाकृती उभी राहते ..... " काकस्पर्ष - एक विलक्षण प्रेम कहाणी "
            कोकणातील कोण्या एका लहान गावात राहणारे ब्राह्मण कुटुंब आणि त्या कुटुंबप्रमुखाचा प्रस्थापित कर्मठ समाजजीवनाशी सुरु असलेला लढा म्हणजे काकस्पर्ष !! बालविवाह किंवा बाल जरठ विवाह अशी नावे , त्यांचा इतिहास आणि त्यावर बंदी आणण्यासाठी कोणत्या समाजसुधारकांनी कधी काय कार्य केले हे शाळेत इतिहासात अनेकदा वाचले ... मध्यंतरी बालिका वधू या मूळ विषयापासून अनेक मैल भरकटलेल्या मालिकेतून काही अंशी त्याची प्रचीती आली. काकस्पर्ष मध्ये लहान वयात लग्न झालेल्या मुलीच्या पतीचा अकाली मृत्यू झाल्यावर मुलीची स्वप्न ,अस्तित्व आणि सामाजिक जीवन यावर कशी बंधने येतात याचे समर्थपणे चित्रण केले आहे ...तोंडातील संवादाला जेव्हा चेहेरा साथ देतो तेव्हा केलेला अभिनय हा अभिनयाच्या पलीकडे कोठेतरी जाऊन पोहोचतो ... विशेषकरून प्रिया बापट हिचा अभिनय तर कौतुकास्पद आहे ...समाजातील अनिष्ट रूढी ना घाबरणारी , त्यास विरोध करणाऱ्या सचिन खेडेकर यावर एकतर्फी प्रेम करणारी , तिच्या विवाहित  पुतण्याच्या खोलीतून येणारे  आवाज चोरून ऐकणारी उमा फारसे बोलत नसली तरी तिची नजर बरेच काही बोलून जाते आणि आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करते ... त्यातील  संवाद तर अक्षरशः मनास यातना देतात ... लग्न करून घरी आलेल्या पुतण्या ( सक्षम कुलकर्णी ) नमस्कार करायला येतो तेव्हा तिच्या लग्नाचा प्रसंग ,चेहेऱ्यावर व्यक्त झालेला आनंद , प्रथम रात्रीची सुखद वेळ आणि त्याच रात्री झालेला पतीचा मृत्यू असा आठवणींचा पडदा झरकन दृष्टीसमोरून सरकून जातो चेहेर्यावरील भाव क्षणात बदलून हसऱ्या चेहेऱ्यामागे दडलेल्या अपार दुक्खाने " आता समजले की आत्यांना आशीर्वाद द्यायला इतका वेळ का लागला " हा संवाद बोथट झालेल्या संवेदना जाग्या करतो तर आपल्या पुतण्याच्या खोलीतून येणारे कामयुक्त आवाज उत्सुक्तापूर्ण आनंदाने चोरून ऐकताना सापडलेली उमा आणि खेडेकर यांनी सोडलेले बोलणे यावर मार्मिक भाष्य करणारा संवाद .... पांढऱ्या साडीतील उमा विहिरीच्या रहाटा वर बसलेली असताना तिच्या पुतणीचे येणे " पहिल्या रात्री काय असते  ?? कितीदा गार पाण्याने अंघोळ करून थंड व्हायचे ... " असा संवाद आणि पाठोपाठ विहिरीत पडणारी घागर डोळ्यात पाणी आणते ... सर्वच पातळीवर चित्रपट उत्तम जमल्याने  एक संपूर्ण कलाकृती पहिल्याचा आनंद मिळतो ....
                        अशी परिपूर्ण कलाकृती मी इतक्या उशिरा का पहिली याचा अजूनही मला खेद वाटतो ...अनेक दिवस चित्रपटगृहात असताना सर्वत्र बोलबाला असतानाही मी तो का पहिला नाही ? याचे कारण आता आठवत नाही आणि आठवायचा फारसा प्रयत्नही आताशी मी करत नाही .... कारण केलेल्या चुकीची मीमांसा करताना दुक्ख जास्ती  होते ... बाईचा जन्म म्हणजे यातना असे का म्हणतात त्याचे काही अंशी उत्तर हा चित्रपट पाहून मिळाले ... नेहमीच वाचन /विचार करत असताना मला प्रश्न पडतो कि कामशास्त्राची उत्पत्ती भारतातली त्याचा हेतू जरी उत्तम संतती असा असला तरी तत्कालीन सर्व ग्रंथात स्त्री शरीराचे अप्रतिम वर्णन केले आहे ..विविध उपमांचा वापर करून आणि कल्पनाशक्तीच्या वारूला चौफेर उधळायची परवानगी देऊन अद्वितीय लेखन झाले आहे पण त्याच स्त्रियांच्या अंतरंगाचा विचार झाला आहे का ? किंवा झाला असेल तर पुढच्या पिढीने तो स्वीकारला आहे का ??आपल्या शारीरिक आणि संसारिक गरजा भागवण्यासाठी स्त्रियांचा मुक्तपणे वापर करणारा समाज त्यांना मुक्तता देण्या बाबतीत बांधील का होतो ?? स्त्रियांचे अस्तित्व -हक्क -भावना कायमच नाकारून त्यांना परावलंबी जीवन देण्यात आले ...नटसम्राट नाटकातील एक संवाद आठवतो " TO BE OR NOT TO BE that is the question  जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे ...या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदान ? का फेकून द्याव देहाच लक्तर मृत्युच्या काळ्याशार डोहामध्ये ...आणि करावा सर्वांचा शेवट एकच एकाच प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचाही ..मृत्युच्या महासार्पान जीवनाला असा डंख मारावा कि नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही ...पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागल तर ?? तर ??इथेच मेख आहे ..नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणूनच आम्ही सहन करतोय जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीव पणान अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन  उभे राहतो खालच्या मानेन आमच्या मारेकर्यांच्या दाराशी ...." असेच स्त्रियांचे होत असेल ??

                           सचिन खेडेकर च्या तडाखेबंद संवादाने चित्रपटाचा गाभा व्यक्त होतो ... त्याने उमाला सामाजिक जीवनापासून दूर का ठेवले  / त्याचेही उमावरील प्रेम कधी का व्यक्त केले नाही आणि यास कारणीभूत असलेला काकस्पर्ष हा प्रसंग उत्तम जमलाय पण माझ्या दृष्टीने चित्रपट तेथे संपत नाही ...तर तेथे सुरु होतो ... केवळ आपल्या पत्नीच्या शरीराचा उपभोग घेता आला नाही म्हणून महादेवाचा आत्मा अडकला असेल आणि इतर कोणत्याही पुरुषाचा स्पर्श तुझ्या पत्नीला होणार नाही या आश्वासनावर मुक्त होणार असेल तर उमेचे काय ?? महादेवाने बाळगलेली इच्छा उमेने बाळगली असती तर कोणी ती पूर्ण होण्याचे आश्वासन दिले असते का ? उमेचे नियम महादेवास लावले असते का ?? आयुष्यात कोणतेच सुख  मिळालेल्या उमेला गती मिळेल ? किंवा तिच्या पिंडाला काकस्पर्ष व्हावा म्हणून कोणी तसदी घेईल ? भावाच्या वेळी "पळवाट " असलेला दर्भस्पर्ष उमेच्या वेळी "शास्त्रसंमत " म्हणून वापरला जाईल ... उमेचे केशवपन का नको ? कारण तिला "परपुरुषाचा " स्पर्श होईल म्हणजे कोणत्या स्त्री ने केले असते तर चालले असते का ? ज्या स्त्रीने आयुष्यात कधी सुख उपभोगले नाही , शारीरिक -मानसिक सुखापासून अतृप्त राहिली , पुरुषस्पर्शा विना तडफडली , अपत्यासुखा साठी झुरली , समाजातील द्वेषाने घाबरली आणि अंती ज्याच्यावर प्रेम होते त्यानेही झिडकारली अशा उमेच्या पिंडाला काकस्पर्ष होईल ?? होतो -नाही याची काळजी कोणाला ? कारण गती हवी महादेवास ( पुरुषास ) मोक्ष हवा महादेवास ....उमेचे काय ?? पुरुषी अहंकार माथी मारण्याचे आणि वासना शमवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे उमा ... अशा कितेक उमा आपल्या अतृप्त इच्छांसाठी अजूनही घुटमळत असतील ...काक्स्पर्षाची वाट पहात असतील ....

No comments:

Post a Comment