Wednesday 26 September 2012

वृत्तपत्रविक्रेता - एक दुर्लक्षित " सेलिब्रिटी "

घराचे किंवा ऑफिस चे टेबल ,टपरीवरचा मातकट बाक किंवा पंचतारांकित हॉटेल मधले अलिशान कोच ,रेल्वे चा डबा  किंवा फेरारीची सीट , कॉलेज चा कट्टा  किंवा फेसबुक ची वाल ,फेसाळता मद्याचा प्याला किंवा चहा /कॉफी चा घुटका , देशी तंबाखू चा झटका ते मार्लब्रोचा झुरका ,खेळाचे मैदान ते कलेचे दालन ...अशा भिन्न ठिकाणच्या ,भिन्न आर्थिक सामाजिक चौकटी असणाऱ्या  जागेत एक गोष्ट मात्र समान असते ती म्हणजे "वृत्तपत्र " ...हे वृत्तपत्र मध्यवर्ती ठेऊन सिनेमातील नटीच्या कमी झालेल्या कपड्यापासून ते वाढलेल्या शेअर मार्केट पर्यंत ,ऑलिम्पिक पासून सचिन च्या निवृत्तीपर्यंत ,एखाद्या उत्पादनाच्या यशापासून ते चित्रपटाच्या अपयशापर्यंत, राजकारणातील अर्थकारणापासून ते समाजकारणातील राजकारणापर्यंत ,दुष्काळापासून अतिवृष्टीपर्यंत ,दुध संघाच्या अध्यक्षीय निवडणुकीपासून ते अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत ,गुन्ह्याच्या काळ्या छायेपासून ते कलेच्या दालनापर्यंत अनेक असामान्य व्यक्तींच्या महानतेच्या कामगिरीची आणि सामान्यांच्या महानतेपर्यंतच्या प्रवासाची माहिती लिहिणारे संपादक -उपसंपादक - वार्ताहार आणि ते आवडीने वाचणारा वाचक वर्ग या दोहोंना जोडणारा दुवा म्हणजे " वृत्तपत्र विक्रेता " कायमच दुर्लक्षित राहतो .....
                                   आपली मानसिकताच अशी असते कि समाजातील केवळ प्रसिद्ध व्यक्तीचे जीवनच जाणून घ्यायची ,त्याचे अनुकरण करायची आपली इच्छा असते ...कारण सामान्यातले असामान्यत्व जाणून घ्यायला आपल्याला कधीच वेळ नसतो ... रोज सकाळी आपल्याला जगाची माहिती घरी आणून देणाऱ्या व्यक्तीचे जग कसे असेल याचा विचार आपल्याला कधीच करावासा वाटत नाही ...प्रत्येकाला संपादक व्हावे वाटते पण आपल्याच पेपर चा विक्रेता होणे कमीपणाचे वाटते ...असे का ?? केवळ पद म्हणजे सर्वस्व असते कि आपण आपल्या संवेदना इतक्या बोथट करून घेतल्या आहेत कि महागड्या गाडीतून उंची कपडे घालून फर्डे इंग्लिश बोलणारा माणूसच आपल्याला यशस्वी वाटतो आणि इतरांचे अस्तित्वही आपल्याला मान्य नसते ? असे अनेक प्रश्न माझ्या मनास पडले म्हणून अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे विचार आपल्या घरी आणून पोहोचवणाऱ्या काही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्याची पाने उघडायचा प्रयत्न केला .... आपल्या आयुष्याबद्दल कोणी काही विचारते आहे म्हणून भारावलेले अप्रसिद्ध सेलिब्रिटी वेळेचे आणि विषयाचे बंध मोडून बोलू लागले आणि मंत्रमुग्ध होऊन मी ऐकतच गेलो ....
                                   आपल्याला सकाळ सकाळी ६ ला लागतो पण तो पोहोचवणाऱ्या व्यक्तीची सकाळ  पहाटे ३-३.३० ला होते हे जाणून अंगावर काटाच आला ...बोचरी थंडी आणि कोसळणारा पाऊस यांची परवा न करता पेपर चे गठ्ठे उचलून त्याचे वर्गीकरण करून ते वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचवणे याचा समावेश कोणी " management " मध्ये करणार नाही किंवा बिझनेस स्कूल मध्ये व्याख्याने देण्यास बोलावणार नाही म्हणून त्यांचे महत्व कमी होणार आहे का ? बर इतके होऊनही त्यांना "सुटी " घ्यायची सोय नाही ... हक्काच्या १५ ओगस्ट, पाडवा इत्यादी सुट्या सुद्धा आपल्याला मान्य नसतात तर अवेळी घेतलेली सुटी म्हणजे दुसर्या दिवशी "बिन पाण्याची " असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा अजाणतेपणी माझ्या पेपर वाल्यावर खेकसलेले  प्रसंग आठवून खजील झालो ....यानाही मन आणि मान असतो याचा आपल्याला विसरच पडतो ...एका पेपर वाल्याची काय तमा बाळगायची ? हा नाही तर दुसरा ... पण याच लोकांचे आपल्याशी भावनिक बंध इतके मजबूत असतात कि अनेकदा अपमान करतात पण कधीतरी प्रेमाने बोलतात तेव्हा भरून येते असे त्यांच्या तोंडून ऐकल्यावर जगात अजूनही संवेदना जाग्या आहेत याची खात्री पटते ....आणि यांचे निरीक्षण तर इतके उत्तम असते कि आताचे तरुण काय वाचतात इथपासून ते खरी बातमी आता छापली जात नाही इथपर्यंत त्यांना सर्व माहिती असते म्हणून ते अगदी आग्रहाने सांगतात " जेव्हा पत्रकार होशील तेव्हा खरे काय तेच लिही ....लोकांचा विश्वास असतो तुमच्यावर " काय बोलणार ??? पण बोलायची संधी दिली तर न ?? " मान्य आहे ..आता सगळी वर्तमान पत्रे उद्योगपती - राजकारणी यांच्या हातात असतात पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ? " .... कोण अडाणी म्हणेल यांना ?? म्हणजे मराठी पेपर पेक्षा इंग्रजी पेपर मध्ये माहिती जास्ती असते आणि त्यातल्या त्यात हिंदू हा उत्तम इंग्लिश पेपर आहे असे विश्लेषण करणाऱ्या माणसाला आपण काय म्हणणार ?? मला तरी शब्द नाही सापडले .....आणि अगदी "ऑडी " मधून उतरलेला माणूसही १-२ रुपयांसाठी घासाघीस करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो हे ऐकल्यावर तर मी निरुत्तरच झालो ....अनेक आठवणी अनेक अनुभव हे लोक सांगत होते आणि मी ऐकत होतो ...सगळेच लिहिणे शक्य नाही आणि तुम्हाला वाचणेही शक्य नाही पण ...
                                   काय असते आयुष्य एखाद्या वृत्तपत्र विक्रेत्याचे ?? एखाद्या वृत्तपत्रा प्रमाणे ....रोज आले तर किंमत नसते आणि एखादे दिवशी  आले नाही तर अचूक समजते ....जितके आवडीने वाचू तितकी किंमत आणि अधिकाधिक माहिती समजत जाते ...पण दुर्दैवाने आपल्याला पाने उलगडण्यात जास्ती रस असतो आयुष्य उलगडण्यात नाही ... अनेक वृत्तपत्रविक्रेते निरपेक्ष वृत्तीने कार्य करत असतात ते आपल्याला कधी दिसत नाही ,त्याचे कौतुक करावेसे वाटत नाही त्यांचे आयुष्य जाणून घ्यावेसे वाटत नाही .... म्हणूनच फिचर रायटिंग ची assignment " मुलाखत " अशी आली तेव्हा ठरवले .....कि ज्ञात सेलिब्रिटी ची मुलाखत सर्व  घेतील  पण त्यांना सेलिब्रिटी बनवण्यास अप्रत्यक्ष कारणीभूत असलेल्या दुर्लक्षित सेलिब्रिटीची मुलाखत आपण घ्यायची ...अखेर पत्रकारिता म्हणजे काय ... असामान्यातील सामान्यत्व आणि सामन्यातील असामान्यत्व हुडकणे ...

1 comment:

  1. I EXPERIENCED IT....MAN THAT IS SOME HARDWORK....

    ReplyDelete